लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे याकरता पाच सोप्या टिप्स.
१. येता जाता सतत फराळाचे पदार्थ तोंडात कोंबू नका. हे पदार्थ पचायला जड असल्याने सकाळच्या वेळीच खाणे इष्ट.
२. दिवाळीचा फराळ करताना अधून मधून कोमट पाणी प्या; जेणेकरून हे पदार्थ पचण्यास मदत होईल आणि वजनात भर पडणार नाही.
३. बाजारातील मिठाई आणि चॉकलेट यांच्यापासून दूर रहा. घरी बनवलेल्या फराळाच्या पदार्थांनी होणार नाही इतके नुकसान या पदार्थांमुळे होत असते. (दिवाळीत मधुमेहींनी तर विशेष काळजी घ्या.)
४. चण्याच्या डाळीच्या पिठाचा कमीत कमी वापर करा. शक्य तिथे मुगाची डाळ वापरा. लाडू करतानादेखील बेसनापेक्षा रवा, मिश्र डाळीचे पीठ असे तयार करा.
५. नियमिटपणे व्यायाम आणि भूक नसताना काही न खाता भूक लागेपर्यंत अधून-मधून गरम पाणी पिणे या दोन मार्गांचा अवलंब या काळात केलात तर वजन वाढण्याची भीती राहणार नाही.
त्यातही हा फराळ आपापल्या प्रकृतीला लक्षात घेऊन केला तर किमान त्यानंतर होणारे त्रास शक्य तितके दूर ठेवण्यास मदत होईल.
१. वात:
अनारसे, शंकरपाळे, घेवर, ओल्या नारळाच्या करंज्या, दुधापासून घरीच बनवलेले गोड पदार्थ, रवा/ गव्हाचे पीठ/ डिंक यांचे लाडू इ.
२. पित्त:
ओल्या वा सुक्या नारळाच्या करंज्या, रवा/ मिश्र डाळी/ मूग यांचे लाडू, अनारसे, शंकरपाळे इ.
३. कफ:
शेव, चिवडा, कडबोळी, तिखट शंकरपाळे, (बेसनाऐवजी मुगाच्या डाळीचे पीठ वापरावे)
हे पदार्थ तारतम्याने घ्यावे इतकीच अपेक्षा आहे. थोड्क्यात; वातप्रकृतीच्या व्यक्तीला कडबोळी आवडत असली तरी त्यांनी ती वातप्रकृतीला चालणाऱ्या पदार्थांच्या तुलनेत कमी प्रमाणात खावीत; खाऊच नये असा अर्थ नाही. आपली प्रकृती कोणती आहे हे आपल्या जवळच्या वैद्यांकडून जाणून घ्यावे. या विषयीची अधिक माहिती #घरोघरी_आयुर्वेद या माझ्या पुस्तकात दिलेली आहे. (पुस्तक सर्व प्रमुख विक्रेते आणि बुकगंगा वर उपलब्ध.)
दीपावलीच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा!!
– © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply