अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये लिहिलेली ही कविता
आली दिवाळी आली दिवाळी
दिव्या दिव्यांच्या लावून ओळी
रंगा रंगाने खुलवु रांगोळी
आली दिवाळी आली दिवाळी… ।। १ ।।
लाडू करंजी ती कडबोळी
शेव चिवडा अन् शंकरपाळी
काटेरी चकलीची मजा निराळी
आली दिवाळी आली दिवाळी… ।। २ ।।
अभ्यंगस्नान पहाटेच्या वेळी
उटण्याचा आलेप गंध दरवळी
सुरसुऱ्या फुलबाजी झाल्या उतावळी
आली दिवाळी आली दिवाळी… ।।३।।
चांदण चुरा सजला आभाळी
दिव्यांची आरास आसमंत उजळी
आकाश कंदिल समृद्धी उधळी
आली दिवाळी आली दिवाळी…।।४।।
आली सोनपावलांनी लक्ष्मी सांजवेळी
सौख्य, समृद्धी हौस ही आगळी
पाडव्याचा सण पतीला ओवाळी
आली दिवाळी आली दिवाळी…।।५।।
भाऊ आला माझा मंगलवेळी
लाविते टीळा चंदन भाळी
स्वप्नांना त्याच्या मिळो यशाची झळाळी
प्रेमाचे नाते जपते ही दिवाळी
आली दिवाळी आली दिवाळी… ॥६॥
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply