नवीन लेखन...

दिवाळीचे बदलते संदर्भ

दिवाळी म्हणजे आठवते ती लवकर उठवणारी आई.उठा उठा दिवाळी आली,मोती साबणाची वेळ झाली असे सांगणारे आजोबा..दिवाळी सणाचे स्वरूप काळानुसार आणि समाजातील बदलांनुसार खूप बदलले आहे. पारंपरिक दिवाळीचा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वावर आधारित होता, तर आधुनिक दिवाळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.

१. पारंपरिक स्वरूप: पारंपरिक दिवाळीमध्ये कुटुंब, समाज आणि धार्मिक विधी यांना विशेष महत्त्व होते. घरातील स्वच्छता, लिपी पूजन, लक्ष्मी पूजन, रांगोळ्या काढणे, दिवे लावणे आणि फटाके उडवणे यांचा एकत्रित आनंद साजरा होत असे. लोक आपल्या कुटुंबीयांसोबत उत्सव साजरा करत असत. या सणात धार्मिक आणि आध्यात्मिक आयामाला जास्त महत्त्व दिले जात असे.

२. आधुनिक बदल: आधुनिक काळात, दिवाळी उत्सवाचे स्वरूप काहीसे बदलले आहे. या बदलांमध्ये मुख्यतः तंत्रज्ञान, जीवनशैली आणि पर्यावरणपूरक विचार यांचा समावेश आहे.

फटाके: पूर्वीपेक्षा आता फटाके फोडण्याबाबत लोक जास्त जागरूक झाले आहेत. पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार करून अनेक ठिकाणी फटाक्यांचा वापर कमी झाला आहे. फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याची नवीन पद्धत लोकप्रिय होत आहे.

इको-फ्रेंडली सण: आजच्या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूकता वाढली आहे. त्यामुळे लोक प्लास्टिकच्या ऐवजी मातीचे दिवे, नैसर्गिक रंगांनी रांगोळ्या आणि पर्यावरणपूरक सजावट वापरतात.

ऑनलाईन शॉपिंग: आधी बाजारात जाऊन खरेदी करणे ही दिवाळीची एक मोठी परंपरा होती, पण आता ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. त्यामुळे खरेदी सोपी आणि सुलभ झाली आहे. पूर्वी दुकानात जाऊन कपडे खरेदी करणे एक सोहळा होता कपडे घेऊन शिंप्याकडे शिवायला टाकणें व त्याची वाट पाहण्यात आनंद होता. आता ॲमेझॉन घरपोच काहीही पाठवतं.

तंत्रज्ञानाचा वापर: सोशल मीडियाच्या उदयामुळे, लोक व्हर्च्युअल दिवाळी साजरी करतात. शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मेसेजेस नुसते फॉरवर्ड केले जातात भावना नाही.परदेशात राहणाऱ्या व्यक्तींनीही व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणे शक्य झाले आहे.

आर्थिक महत्त्व: दिवाळी आता एक मोठा व्यावसायिक सण झाला आहे. मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर मिळतात, त्यामुळे हा सण आर्थिकदृष्ट्या व्यापारी क्षेत्रासाठी खूप महत्वाचा ठरला आहे. अशाप्रकारे, दिवाळी सणाचे पारंपारिक स्वरूप टिकून असतानाच, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदललेल्या जीवनशैलीनुसार त्यात अनेक बदल झाले आहेत. सामान्यांच्या आवाक्यात नसलेली एखादी वस्तू या निमित्ताने धाडस करून घेतली जाते.

ऋण काढून क्षण व सण साजरे करणे हे दिवाळीचे वैशिष्ट आहे. सामान्यांच्या जीवनात हे चार दिवस खूप महत्त्वाचे असतात गरिबी दुःख दारिद्र दूर ठेवून माणसे चार दिवस आनंदाला आमंत्रण देतात व स्वतःला विसरून आनंदी राहतात. नात्यांची उजळणी करणारा हा सण आहे. पाडवा, भाऊबीज यामुळे नात्यांना उजाळा मिळतो. प्रेम असतंच पण येणाऱ्या पिढीला आनंदाचा वारसा कसा टिकवायचा व वृद्धिंगत करायचा याचा वस्तू पाठच दिवाळी देते. दुःखं, चिंता, कष्ट चार दिवस विसरायला लावणारा हा आनंदाचा परमोच्च क्षण आहे.

पूर्वी दिवाळीचे वेध दिवाळीच्या आधी महिना पंधरा दिवस लागायचे. सगळ्यांची आकाश कंदील तयार करण्याची जय्यत तयारी चालू व्हायची, त्यासाठी बांबू आणून त्याच्या कामट्या करणे मग त्या एकमेकांना दोऱ्याने बांधून सुंदर आकाशकंदील तयार व्हायचा. श्रमातून साकारलेला आकाश दिवा एक वेगळंच समाधान देऊन जात असे. त्यात लाईट नाही तरआत मध्ये पणती ठेवायला एक चौकोन तयार केला जात असे. अशा तऱ्हेने निरनिराळ्या आकाराचे आकाशकंदील जसे विमान, पंचकोनी चांदणी, षटकोनी चांदणी तयार केले जायचे. त्यानंतर त्याला पारदर्शक रंगीत कागद किंवा ताव चिकटवला जाई. अशा घरी केलेल्या आकाशकंदील यामुळे मुलांची कलात्मकता, निवड व निर्णय क्षमता याच कस लागत असें.आणि त्यामुळे एक आत्मिक समाधान मिळायचे.त्यात खूपच मजा यायची आणि आनंद मिळायचा. जसजशी दिवाळी जवळ येऊ लागते तसतसे फटाक्यांचे दुकाने थाटली जात, खिशात अगदी कमी पैसे असलें तरी टिकल्याची डबी घेऊन टिकल्या फोडत बसायचा छंद लागायचा. त्यावेळी टिकल्याचा रोल अस्त्वित्वात आलेला नव्हता टिकल्या ची एक छोटी गोल डबी असायची त्यावर खारुताईचे चित्र असायचे. आत लाल कुंकवाच्या टिकलीच्या आकाराऐवढ्या टिकल्या असायच्या ह्या टिकल्या फोडण्यासाठी एक सपाट पट्टिसारखी एक बंदूक असायची. काही जण स्वयंपाक घरातील चिमट्यात टिकली ठेवून तो चिमटा दगडावर जोरात आपटला की टिकली फुटायची, नाहीतर सगळ्या टिकल्या एका कागदावर ओतून तो कागद पेटवून देत असत. मग सगळ्या टिकल्या एका मागोमाग पटापट फुटायच्या. काही शूर वीर बोटाच्या चिमटीत टिकली ठेवून फरशीवर जोरात घासून टिकल्या फोडायचे, त्याचे मात्र खूपच अप्रूप वाटायचे. एका गोळ्यातून नाग अवतरायचा. दिवाळी आणखी जवळ येवू लागली की घरात बायकामुलींची धांदल उडायची. संपूर्ण वातावरण दिवाळी येणार या कल्पनेने भारावून जात असे. कुंभार पणत्या करण्यात मग्न होत असत. त्यावेळी रंगीबेरंगी कलात्मक पणत्यांचा जन्म झालेला नव्हता. कुंभार दारोदार फिरून साध्याचं पणत्या अगदी शेकड्याने विकत असतं. हळू हळू दिवस पुढे सरकत जायचे, तसतशी दिवाळी कधी येईल असे होऊन जायचे. बहिणी, मुली रांगोळ्यांची पुस्तके शोधून कोणत्या दिवशी कोणती रांगोळी काढायची हे ठरवून ठेवीत.त्यावेळी आजसारखे रांगोळीचे छापे नव्हते त्यामुळे मुलींच्या कलेचे कसब पणाला लावले जाई. शेजारच्या अंगणातील रांगोळीचे सुद्धा कौतुक केले जायचे.रांगोळीचे ठिपके सरळ रेषेत यावे म्हणून एका चौकानी कागदाला सरळ उभे आडवे ठिपके उदबत्ती ने छिद्रे पाडून एक ठिपक्यांच्या कागद तयार केला जायचा, बहीण भाऊ मित्र अगदी खेळीमेळीने दिवाळीच्या तयारीला लागत.सर्व मिळून किल्ले बनवत. वाट पाहता पाहता दिवाळी जवळ यायची. वसुबारसच्या दिवशी दारापुढे गाय आणि वासरू आणून त्याची पूजा केली जायची. आता आता शहरात गाय दुर्मिळ झाल्या असून चौकात एखादी गाय मानली जाते व तिथे सर्व येऊन गायीची पूजा करतात. आज शहरात धार्मिक विधी झाल्यानंतर नैवेद्य महिला देण्यासाठी आसपास गाय मिळत नाही निर्माल्य फेकण्यासाठी नदी मिळत नाही.धनत्रयोदशी ही बहुतेक व्यापारी मंडळी वही पूजन, दागिने ठेवून पूजा करतात आणि मग त्यानंतर लक्ष्मीपूजन पहाटे अभ्यंग स्नानापासून सुरवात व्हायची. आई सर्वांना पहाटे उठवून देई, काही वेळ पहाटे उठायचे जीवावर यायचे कारण पांघरूण काढताच अंगात थंडी भरायची, पण उठल्यावर मात्र खूप मजा यायची. जो कोणी सूर्योदय झाल्यावर अंघोळ करेल तो नरकात पडेल ही समजूत मनावर पक्की ठसलेली असायची. अध्यात्मातल्या, पोथी मधल्या काही कथांचा धाक असायचां. कुटुंबाला धाकात ठेवणारी माणसे पूर्वी होती.मन खूपच निष्पाप, निर्मळ होते. दिवाळीत सूर्योदयापूर्वी अंघोळ केलीच पाहिजे नाहीतर नरकात जाणार ह्या समजुती वर ठाम विश्वास होता. मग पहाटेच्या त्या कडाक्याच्या थंडीत गरम पाण्याने अंघोळी व्हायच्या. आंघोळीच्या अगोदर पाटावर बसवून पाटाभोवती रांगोळी काढून अंगाला तेल लावले जाई. तेल म्हणजे खोबरेल तेलात चार थेंब अत्तर किवा सुगंधी तेल मिसळले जाई. आई पाटावर बसवून हाता पायांना तेल लावून पाठीला, छातीला तेल लावून देई, छातीला तेल चोळताना खूपच गुदगुल्या होऊ हसू यायचं तेव्हा मात्र ” गप्प बैस” हे ऐकावे लागायचे. मग त्यानंतर अंघोळीला बसायचे, अंगाला उटणे लावल्याशिवाय अंघोळ होतं नसे, अर्धी अंघोळ झाली की आई ताम्हणात निरांजन घेऊन आम्हाला कुंकू लावून ओवळत असे, त्यावेळी थंडीने दात कडकड वाजत असे. बाथरूम बाहेर एखादे लहान भावंड हातात फुलबाजी लावून ओवाळत म्हणत असे “, दिन दीन दिवाळी गाय म्हशी ओवाळी, गाइम्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या…..” असे गाणे म्हणत.पण अभ्यंग स्नान फक्त मुले करायची. अंघोळ करून बाहेर येताच शेव, चकली तळण्याचा खमंग वास घरात दरवळत असे, मग काय फराळावर ताव मारायला सूरवात व्हायची. शेव, चकल्या भरभर संपवून शंकरपाळी खिशात कोंबून बाहेर धूम ठोकायची.

आजूबाजूचे प्रत्येक घर पूर्वी दिवाळीच्या फराळाला बोलवत असे व त्यानिमित्ताने हसणें, खेळणे व गप्पा होत असतात आता घराघरात बाहेरून विकतचे पदार्थ आणल्यामुळे ही प्रथा कमी होत चालली आहे. न फुटलेले फटाके वेचून दारू काढणे अन् टिकल्या फोडण्यात दिवस भरकन निघून जायचा.मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी मजा यायची. सर्व बहीण भावांडाना समोर बसवून फटाके वाटले जायचे. त्यात जास्त करून लवंगी फटाके, फुलबाज्या, कोठ्या, भुईचक्कर जास्त असायचे. लवंगी फटाक्याचीलड नुसती पहायची, तर त्यातले सगळे फटाके मोकळे करून एक एक फटाका फोडण्यात मजा यायची. काही जण मात्र सुतळी बॉम्ब, रॉकेट फोडायचे. सुतळी बॉम्ब लावताना उदबत्ती ने पेटवयचा कारण फुलबाजीने तो पेटला आहे की नाही हे समजायचे नाही. सुतळी बॉम्ब फोडतांना सर्व चिल्ले पिल्ले कानावर हात घट्ट धरून ठेवीत, अन् तो फुटेपर्यंत सस्पेन्स असायचा. रॉकेट एका काचेच्या बाटलीत ठेवून उडविले जाई पण ते नेमके तिरपे उडून समोरच्या घराच्या भिंतीवर धडकायचे. लक्ष्मी पूजेनंतर दुसरा दिवस पाडव्याचा. तरीही त्या दिवशी सकाळी फुसके फटाके वेचून त्यातली दारू कागदावर काढून ती पेटवायची हा उद्योग असायचाच. पाडव्याला आई ठेवणीतल्या साडीतील एखादी छान साडी नेसून, गजरा माळून तयार व्हायची, त्यावेळी ती साक्षात लक्ष्मीचं भासायची. संध्याकाळी बाबांना ओवाळताना त्यांनी तबकात टाकलेले शंभर रुपये पाहून तिच्या ओठावर जे स्मित हास्य उमटायचे ते आयुष्यात कधीच न विसरणारे.आता जाणवते किती अल्पसंतुष्ट आणि समाधानी होती तेव्हाची पिढी! आज आम्हाला भरपुर मिळाले तरी समाधान होतच नाही. त्यानंतर भाऊबीज यायची . खणाचे परकर पोलके घालून ताई ओवाळायची तिच्या तबकात बाबांनी दिलेली दहाची नोट टाकायची, मग दुसऱ्या भावाने तीच नोट परत तबकात टाकायची. ते पैसे घेऊन ती आनंदाने पळायची, त्यावेळी तिला त्या दहा रुपयाचे मोल किती आहे हे देखील समजायचे नाही. किती साधे, सोपे अन् सरळ दिवस होते. नव्हती स्पर्धा, नव्हता दिखावा होते फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम…… आज मात्र मुलांच्या, नातवांच्या हरवलेल्या बालपणाची खंत वाटते.आज आपण प्रत्येक सणातला आनंद ,उत्सुकता ,मजा घालवून बसलो आहोत. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा किती आनंद भरलेला असतो हे आपण शोधतच नाही. खाण्यामध्ये ज्यांच्या रोजच दिवाळीचे पदार्थ असतात, ऑनलाइन कधीही कपडे मागवणारे यांना दिवाळी अशी वेगळी वाटतच नाही.

दिवाळी साजरी व्हायला पाहिजे ती माणसांनी एकत्र येऊन नातेसंबंधांची,भेटीची दिवाळी व्हा यला हवी. दिवाळीत अनेक घरांमध्ये भौतिकता आहे पण नात्यांची नैतिकता कुठे आहे? कोणीच कोणाला जुमानात नाही.

आनंद वाटायला माणसें हवी असतात, भिंती नव्हें. वृद्धाश्रमात नाती फुलत नाहीत. नात्यांना घर हवं. घरघर नको. क्षणांचं लाजरेपण, साजरेपण म्हणजे दिवाळी. माणसांचं एकत्र येणं, हसत खेळत राहणं, विनोदामध्ये चिंब भिजणं हीच दिवाळी असते.चार क्षण विसाव्याचे, समाधानाचे जगणं म्हणजे दिवाळी. यशामागे धावणे म्हणजे दिवाळी नव्हें. समाधानाच्या थांब्यावर दिवाळी असते आणि ती अनुभवायची असते.

दिवाळी ही मनामनांची असते. कोणावर तरी प्रेम बसणं, कुणाच्या तरी आठवणीत आपण असणं, हीच खरी दिवाळी असते.

लाखो तारे आसमान मे

एक मगर ढूंढे ना मिला

देख के दुनिया की दिवाली

दिल मेरा चुपचाप जला.

अवतीभवती प्रचंड माणसांची गर्दी आहे पण ज्याच्याशी वेव्हलेन्थ जुळेल असं कोणी नाही.

घरात माणसे एकत्र राहतात म्हणण्यापेक्षा एकत्र आली आहेत म्हणून राहत आहेत. प्रत्येकाचें प्लॅन्स वेगळे वेगळे आहेत. कोणी कोणाला सांगत नाही. माणसां माणसां मधील संवाद म्हणजेच दिवाळी पण माणसेच एकमेकापासून दुरावली आहेत. माणसांमधील नातेसंबंध दुरावलें आहेत.

दिवाळीचे स्वरूप जरी बदलले तरी माणसांमध्ये जोपर्यंत हुरूप आहे तोपर्यंत ती साजरी होणारच.

डॉ. अनिल कुलकर्णी

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 30 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..