तेच दिवाळीचे दिस
तोच आनंद उल्हास
परि बाबा-आई माझे
मज दिसले उदास…..
कसे जुळावे गणित
नव्या खाऊ कपड्यांचे
अन् खुलेल मानस
सान कोवळ्या जीवाचे
इथे वाढती असोशि
तिथे मन कासावीस
तेच दिवाळीचे दिस….
कधी आईचा दागिना
कधी एखादा ऐवज
जाई सावकारा हाती
खुल्या मनाने सहज
अन् सजली दिवाळी
मला हवी तशी खास
तेच दिवाळीचे दिस…
आज काही नाही उणे
तरी उरलेच देणे
आई-बाबांनी दिलेले
सहजची मुकपणे
मग ओलावती डोळे
मनी उरतात भास
तेच दिवाळीचे दिस…
आणि आई- बाबा माझे
होते दिसले उदास…
…..मी मानसी
Leave a Reply