नवीन लेखन...

दिवाळीची पोस्त

एका गावात एक नवीन पोस्टमन आला होता. तो पत्र वाटत वाटत गावात फिरत होता. एका घराशी येऊन थांबल्यावर त्याने आवाज दिला ” रजिस्टर पत्र आहे.”

कोणीच दार उघडले नाही. त्याने दोन तीनदा पुन्हा पुकारा केला. तरीही कोणी दार उघडले नाही. तो जोरात ओरडला “कोणी आहे का घरात? दार उघडा. रजिस्टर पत्र आहे.”

आतून आवाज आला “दादा, दरवाजा खालून पत्र सरकवा.” पोस्टमन जरा रागाने म्हणाला “रजिस्टर पत्र स्वत:च घ्यावे लागेल. सही लागते त्यावर. दार उघडा.”

काही वेळाने दार उघडले. आत्तापर्यंत पोस्टमन चांगलाच कावला होता. दार उघडल्यावर बघतो ते काय ! दारात दोन्ही पाय नसलेली एक अपंग मुलगी कुबड्यांचा आधार घेऊन उभी होती. तिला पाहून पोस्टमन वरमला. तिच्या हातात पत्र देऊन, सही घेऊन तो पुढे निघाला.

पोस्टमनची आणि त्या मुलीची हळूहळू चांगली दोस्ती जमली. दिवाळी जवळ आली होती. पोस्टमनला काय द्यावे याचा विचार ती मुलगी करत होती. तिला एक युक्ती सुचली. पत्र घेण्यासाठी दार उघडल्यावर तिला रोज दिसायचे की पोस्टमनची पावले मातीत उमटली आहेत. एक दिवस पोस्टमन गेल्यावर तिने त्याच्या पावलांचे माप घेतले. गावातल्या चांभाराकडे जाऊन त्या मापाच्या छान चपला बनवून घेतल्या. आत्तापर्यंत पोस्टमन अनवाणी येत असल्याचे तिने पाहिले होते.

दिवाळीची पोस्त मागण्यासाठी पोस्टमन जेव्हा तिच्या दारात आला तेव्हा तिने एक बॉक्स त्याच्या हातात दिला. “घरी गेल्यावर मगच हा बॉक्स उघडा दादा.” असे तिने त्याला बजावले.

घरी गेल्यावर पोस्टमनने बॉक्स उघडला. त्यातल्या चपला पाहून त्याचे डोळे पाणावले. या मुलीने आपल्या मापाच्या चपला कशा बनवून घेतल्या असतील याचे कोडे त्याला उलगडले नाही. आजवर त्याला मिळालेल्या दिवाळीच्या पोस्तमध्ये सर्वात सुंदर पोस्त त्याला या मुलीने दिली होती. त्याची अडचण समजून त्याला त्याच्या मापाच्या चपला दिल्या होत्या.

दिवाळी संपल्यावर पोस्टमन आपल्या बॉसकडे गेला व म्हणाला “मला थोडे कर्ज हवे आहे. रक्कम थोडी मोठी आहे.” बॉसने त्याच्याकडे पाहिले. “एवढे मोठे कर्ज तुला कशासाठी हवे आहे? ” त्याने आश्चर्याने विचारले.

पोस्टमनने घडलेली चपलांची हकीकत सगळ्यांना सांगितली. ती ऐकून सगळेचजण हेलावून गेले. पोस्टमन म्हणाला “तिच्या दयाळूपणाची परतफेड ‘म्हणून मी तिला जयपूर फूट द्यायचा विचार करतो आहे. ” सर्वांनाच ती कल्पना फार आवडली. पोस्टमनला कर्ज देण्याऐवजी सर्वांनी आपापल्या शक्तीप्रमाणे पैसे जमा करुन पोस्टमनला दिले. त्यातून त्याने त्या मुलीसाठी जयपूर फूट बनवून घेतला.

ही गोष्ट ऐकताना आपलेही मन हेलावून जाते. जगात असेच जर घडत राहिले, चांगुलपणाचा प्रतिसाद त्याहून अधिक उदात्तपणाने मिळाला तर या जगाचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. आपण मात्र सतत सूड भावनेने विचार करत रहातो, वागत रहातो. चांगुलपणाला आपल्या आयुष्यात थाराच देत नाही. या गोष्टीने तरी आपल्या मनातली करुणा जागृत व्हावी एवढीच इच्छा.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..