डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी. डीएनए हा पेशीतील अतिशय महत्त्वाचा आणि अति कार्यरत असा बहुआयामी रेणू आहे. पेशीतील प्रथिनांच्या बांधणीत याचा मोठा सहभाग असतो.
डीएनए म्हणजे जशी न्युक्लिओटाइडची साखळी तशी प्रथिने अमिनो म्हणजे आम्लांची साखळी. डीएनएतील न्युक्लिओटाइडच्या क्रमावर प्रथिनांचे स्वरूप अवलंबूनअसते. न्युक्लिओटाइडचे मिळून एक कोडॉन बनते. असे एक कोडॉन सांकेतिक भाषेत एक विशिष्ट अमिनो आम्ल दर्शविण्यासाठी जबाबदार असते.
प्रथिनातील अमिनो आम्लांच्या क्रमावर प्रथिनांचे स्वरूप अवलंबून असते. म्हणजे जर डीएनएमधील न्युक्लिओटाइडचा क्रम बदलला तर त्यापासून बनणाऱ्या प्रथिनातील अमिनो आम्लाचा क्रम बदलेल व त्यापासून बनणाऱ्या प्रथिनांचे रासायनिक स्वरूप पण बदलेल. (जसे गरज आणि गजर, यात अक्षरे तीच आहेत पण क्रम बदलल्यामुळे अर्थ बदलला आहे.) कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांपासून हा अमिनो आम्लाचा रेणू बनतो. ही अमिनो आम्ले आपल्या पेशीत बनू शकतात तसेच आपण खाल्लेल्या प्रथिनयुक्त आहाराच्या पचनातून पण मिळतात. एकूण २२ प्रकारची अमिनो आम्ले असतात. यातील १० अमिनो आम्ले आपले शरीर बनवू शकत नाहीत, म्हणून त्यांना आपण आवश्यक अमिनो आम्ले म्हणतो.
मांसाहारातून ही सर्व अमिनो आम्ले आपल्याला मिळू शकतात, मात्र शाकाहारातील गहू, तांदूळ इ. तृणधान्ये अथवा डाळी आणि कडधान्ये मात्र ही सर्व अमिनो आम्ले आपल्याला देऊ शकत नाहीत. पण त्यामुळेच आपण आपल्या आहारात वरणभात किंवा पोळी व आमटी असे तृणधान्ये आणि कडधान्य असा दोघांचा समावेश करणे गरजेचे आहे. कारण ज्या अमिनो आम्लांची कमतरता तृणधान्यात असते, ती अमिनो आम्ले कडधान्यात असतात. या अमिनो आम्लांच्या कमतरतेमुळे शारीरिक थकवा, मानसिक मरगळ, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, त्वचा आणि केसांचा पोत बदलणे असे परिणाम दिसू लागतात. याकरिता आपला आहार सकस असण्याची गरज आहे.
-डॉ. मृणाल पेडणेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply