“ज्ञानेश्वरीतील संगीत शास्त्र -एक चिकित्सक अभ्यास “ या अबोली अमोल सुलाखेंच्या PhD परीक्षेला विद्यापीठातील संगीत – नाटय विभागात उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योग अमोल सुलाखे नामक “धबधबा ” मित्राने अलवार घडवून आणला. हे सादरीकरण वेगळेच होते. नेहेमीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नव्हते. निवेदनाला साथ होती -पार्श्वभूमीच्या पूर्व -ध्वनीमुद्रित तानपुऱ्याची ! साहित्य आणि संगीत क्षेत्रातील निवडक दिग्गज उपस्थित होते.
सुरुवातीला तिच्या चेहेऱ्यावर स्वाभाविक ताण स्पष्ट दिसत होता. तब्येत किंचित नरम /आवाजाची हवी तितकी साथ नव्हती. पण त्यावर मात करीत निवेदन जसे पुढे सरकले तसतसा तिच्या देहबोलीत आमूलाग्र बदल होत गेला. विशेषतः ओवी आणि अभंगांचे गायन करीत असताना श्रोत्यांकडून मिळणारी दाद तिचा आत्मविश्वास वाढविण्यास पूरक ठरली. हळूहळू हाताशी ठेवलेल्या कागदांची गरज कमी झाली.
नेमके संदर्भ ,प्रचंड संशोधन आणि तयारी यांच्या बळावर तिच्या चेहेऱ्यावर मध्येच स्मित झळकून जायचे. आपली परीक्षा आहे याचा जणू तिला विसर पडला आणि मैफिल रंगविण्याचा आविर्भाव तिच्यात आपसूक आला. किंवा वर्गात तल्लीनतेने ती शिकवत आहे असं वाटू लागलं. बघता -बघता तासभर होउन गेला. मध्येच एका परीक्षकाने तिला आवरते घेण्याची सूचना केली, तेव्हा सात्विक संतापाने तिने त्यांनाही सुनावले – ” मॅडम ,शेवटचे पाच मिनिट राहिलेत. please ! ” मध्येच खोकल्याची ढास लागली. हातासरशी अमोलने तिला गरम पाणी दिले. समेवर येत तिने निवेदन संपविले. दोन -तीन प्रश्नांना खुबीने उत्तरे दिली. ताण ओसरत चालल्याचा खुणा दिसल्या, किंचित रिलॅक्स झाली ती शेवटाकडे येताना ! मनावरील अदृश्य ओझे उतरत चालले होते. मैफिल आवाक्यात आली होती. समोर कृतार्थ आई, पतीच्या चेहेऱ्यावरील कौतुक ,कन्येच्या नजरेतील अभिमान सारं सारं तिला भिडलं होतं. “याच साठी केला होता अट्टाहास !”
मी विचारलं – ” या संशोधनाने तुम्हाला संशोधक म्हणून /गायिका म्हणून /वादक म्हणून ( ती भारतातील नामवंत सरोद वादक आहे)/ व्यक्ती म्हणून काय मिळाले ? तुमच्यात काय भर पडली ? काय बदल झाला ?”
आता कृतज्ञ डोळ्यांनी दगा दिला. कोंडलेल्या भावना ओल्या झाल्या. “ज्ञानोबा माऊली माझ्या आयुष्यात खूप उशीरा आली आणि मला व्यापून उरली आहे. त्यांच्याविना मी इतकी वर्षं का आणि कशी जगले हेच प्रश्न मलाही पडतात. सारं काही व्यवस्थित होईल असा मला धीर आला. कितीतरी मदतीचे हात आले आणि मी तरून गेले. ”
या उत्तरानंतर आणखी एक आश्चर्य आमची वाट पाहात होते – ओव्या आणि अभंगांचे गाऊन सादरीकरण ! विविध रागांमध्ये माउलींच्या रचना तिने सादर केल्या आणि नंतर त्यांचे सरोदवर प्रात्यक्षिक करून दाखविले. विभागातील विदयार्थी आणि शिक्षकांसाठी (आमच्यासह) ती मेजवानी होती.
“माऊली”च ती ! कायम मदतीचा हात देऊन तारून नेणारी ! विभागातल्या एखादया कोपऱ्यातून आम्हा सर्वांकडे शांतचित्ताने पाहात असणारच !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
फारच सुंदर व कमी शब्दात सर्व भावना समजल्या. माझी बहिण म्हणून मला तिच्या बद्दल आदर आहेच हे वाचून आणखी वाढला.
Thanks a lot ! Replied over e-mail.
Dr N H DESHPANDE
अगदी खरे आहे त्या माऊलीच्या कृपेनेच तिला हे सर्व पूर्ण करता आले .अनेक अडचणी आल्या पण तिने चिकाटीने प्रबंध पूर्ण केला. याचा तिची आई म्हणून मला अभिमान आणि आनंद वाटतो. तिला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. भावना आपटे
Thanks a lot ! Your invisible blessings were on her head. We could sense it. Replied on mail.