नवीन लेखन...

ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग १

“ज्ञानमूर्ती कै. गोविंद तळवळकर” – विसाव्या शतकातील निर्भीड आणि व्यासंगी अतुलनीय वृत्तपत्र संपादकाची व्यक्तिरेखा आणि जीवनपट”

भाग १

सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर.

(आम्हा घरी धन शब्दांचिच रत्ने ।)

शब्दांचिच शस्त्रे यत्न करु. ॥ 1 ॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जनलोकां ॥ 2 ॥
तुका म्हणे पहा शब्दाचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करुं ॥ 3 ॥

तुकोबांनी सांगितलेले हे व्रत तळवळकरांनी शब्दश: आचरणात आणले होते. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते.

अशा ह्या ज्ञानमूर्ती तळवळकरांचा जन्म 22 जुलै १९२५ ला डोंबिवलीला कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात रामनगरमध्ये बुवांच्या चाळीत झाला. आजोबांचे नाव ‘गणेश’ तळवळकर. त्यांना श्रीनिवास, गोपीनाथ, श्रीपाद आणि शरद अशी चार अपत्ये होती. श्रीनिवास हे शिवराम महादेव परांजपे यांच्या ‘काळ’ मधील लेखक, गोपीनाथ हे कवी, लेखक आणि ‘आनंद’ मासिकाचे संपादक तर शरद, हे विनोदी नट आणि चित्रकार- शरद तळवळकर.

गोविंदरावांच्या वडिलांचे नाव श्रीपाद. गोविंदरावांना स्वत:ला चित्रकार मुकुंद आणि अरविंद असे दोन भाऊ होते. त्यांच्यावर वाचन-लेखनाचे संस्कार झाले ते त्यांच्या गोपीनाथ काकांमुळे!

त्यांनी मुलांना योग्य अशी पुस्तके लहानपणीच गोविंदरावांना वाचायला आणून दिली. पुढे राजकीय व इतर विविध विषयांची पुस्तके सुचविली. लोकमान्य टिळकांचे अग्रलेख व लेख हे भाषा व विचार ह्या दृष्टीने वाचणे आवश्यक आहेत हेही सांगितले. हे त्यांनी समजावून सांगितल्यावर गोविंदरावांनी मोठ्या आवडीने अभ्यास केला आणि त्याचा प्रभाव संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्यावर राहिला. त्यांच्या वडिलांची प्राप्ती बेताचीच असल्यामुळे गोविंदरावांचे बालपण अत्यंत कष्टात गेले होते. पण त्यांचे आईवर फार प्रेम होते. तिला अतिकष्ट करताना पाहून त्यांना मनस्वी दु:ख व्हायचे.

दुसरे गोविंदरावांचे खानविलकर गुरुजी पहाटे चार वाजता त्यांना उठवून व्यायाम करायला नेत असत. हजार बैठका व जोर. ते कॅरम फारच चांगले खेळायचे. एका शॉटमध्ये चार चार सोंगट्या. कॅरम पाठोपाठ लेझीम व क्रिकेट. सी. के. नायडू, मुश्ताक, ब्रॅडमन आणि माधव आपटे ते त्यांचे आवडते खेळाडू. शाळेत असताना गोग्रास वाडीत जाऊन ते गवळ्याच्या मुलांना शिकवित असत.

गोविंदराव तळवळकरांकडे पाहिल्यावर त्यांच्या बुद्धीचे तेज सहजपणे आकर्षित करायचे. त्यांचे नाक एकदम सरळ, डोळे अतिशय तेजस्वी व पिंगे आणि आकारसुद्धा सुंदर, बदामी, केस भरगच्‍च दाट, थोडे कुरळे व पिंगट रंगाचे. त्वचा मृदू, मुलायम, नाजूक, उंची साडेपाच फूट. देखणेपणाबरोबरच बुद्धिमत्ता, ज्ञान आणि कर्तृत्व. सुसंस्कृत सात्विक स्वभाव ह्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना फार प्रभावी, भारदस्त, रुबाबदार व छाप पाडणारे वाटायचे. हा फार मोठा विद्वान, कर्तबगार अधिकारी पुरुष आहे हे जाणून अनोळखी लोक आदराने उभे रहायचे. केवळ भारतातच नाही तर युरोप आणि अमेरिकेतही.

त्यांची पत्नी म्हणजेच डोबिंवलीच्या नारायण वासुदेव गोरे ह्यांची कन्या शकुंतला सात्विक सौंदर्यवान आणि प्रेमळ असलेली.) डोबिंवलीत बंद पडलेले ‘सार्वजनिक वाचनालय’ चालू ठेवण्यासाठी तळवळकर हौशीने काम करीत असत.

त्याच वाचनालयात पुस्तकांना कव्हर्स घालण्याचे स्वयंसेवी काम शकुंतला करीत असत. तेव्हाच दोघांची ओळख झाली. शकुन्तलेला शेक्सपिअरचे ‘किंग लिअर’ शिकवत असताना त्यांचे प्रेम जुळले आणि 21 ऑगस्ट 1948 रोजी पुण्याला नोंदणी पद्धतीने त्यांचा शुभविवाह झाला. शाळेत असतानाच, ह. रा. महाजनींमुळे त्यांच्यावर रॉयवादी विचारसरणीचा प्रभाव पडला होता. दुसरं महायुद्ध सुरु झालं, तेव्हा रॉयवादी मंडळींनी, डोंबिवलीत फॅसिझम विरोधी आठवडा साजरा करायचा ठरवला आणि त्याचवेळी, गोविंदरावांची ओळख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. गोवर्धन पारिख, न्या. तारकुंडे, वामनराव कुलकर्णी, तय्यब शेख ह्यांच्यांशी झाली.

त्यांना निरुपमा आणि सुषमा अशा दोन मुली. निरुपमा चार महिन्यांची असताना खूपच आजारी पडली. ते स्वत:, पत्नी शकुन्तला व डॉ. फाटक रात्रभर तिच्या उशाशी बसून होते. पुढे ती बरी झाली पण तिच्या लहानपणच्या आजारपणाच्या धसका गोविंदरावांनी इतका घेतला की ते म्हणायचे, ‘‘तू आजारी पडू नकोस, माझ्या डोक्‍याला खूप ताप होतो’’. तीच निरुपमा पुढे ‘डॉक्‍टर निरुपमा’ झाली आणि शेवटची 20 वर्षे तिने वडिलांची मनोमन सेवा केली. साधारण सर्व लहान मुले ‘आई’ असं म्हणत उठतात पण निरुपमा मात्र ‘बाबा’ असे म्हणत उठायची. पंढरपूरची‘विठू माउली’ तर ज्ञानेश्वरांना ‘ज्ञानोबा माउली’ म्हणतात, तसेच हे.

त्या दोघी लहान असताना, त्या झोपल्या की गोविंदराव त्यांच्याकडे पाहून प्रेमाने गुणगुणत असत, ” निजल्या तान्ह्यावरी माउली –. “माउली’ म्हणजे फक्त आईच नव्हे तर काही ‘प्रेमळ’ वडीलही अभिप्रेत आहेत. आता ऐकुया त्यांचे, ” निजल्या —“

त्यांचे आई-वडिल व सासू-सासरे सुधारणावादी होते. स्वच्छतेबद्दल घरात खूपच दक्षता घेतली जात असे. पण ते कधीच कर्मकांडे, सोवळे-ओवळे मानणारे नव्हते. गोविंदरावांना टाळकुटेपणा, भक्तीचे अवडंबर किंवा प्रदर्शन कधीच मान्य नव्हते, तर बुद्धिवादी होते. लोकांनी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी नि:स्पृह वृत्ती, सत्य आणि लोककल्याणाचे अधिष्ठान असल्यामुळे आपले कोणी काहिही वाकडे करू शकणार नाही या श्रद्धेचे बळ त्यांना होते. समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?’ असं सांगून ते मिस्किलपणे म्हणत असत,” आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हांला देतो.

रोज सकाळ-संध्याकाळ आंघोळ करून अत्तर किंवा सेंट लावण्याचा त्यांना छंद होता. तळवलकरांना आधुनिकतेची अत्यंत आवड होती. ‘वॉशिंग मशीन’ आल्याबरोबर लगेच त्यांनी खरेदी केले. रेफ्रिजरेटर, गृहोपयोगी यंत्रे बाजारात आल्याबरोबर लगेच विकत आणण्याचा त्यांचा कटाक्ष असे. त्यावर त्यांचा मोलाचा सल्‍ला ‘यंत्र वापरा आणि स्वयंपाकघरात कमीत कमी वेळ घालवा. उगाच किचकटपणा करू नका”. संगणक आल्याबरोबर ते प्रथम संगणक शिकले)

इंग्रजी बरोबरच संगणकावर मराठी लिपी लिहिण्याचे तंत्र त्यांनी लगेचच आत्मसात केले. हाताने आधी मसुदा न लिहिता सर्व लेखन ते प्रथम संगणकावरच लिहीत. थेट संगणकावर लिहिणारे म.टा. मधील ते पहिलेच संपादक.

ग.दि.माडगूळकर, पु. ल. देशपांडे, अरविंद गोखले, पु.भा.भावे ह्यांच्याबरोबर गप्पांची मैफल नेहमीच रंगायची. ग.दि.मा तेव्हा गमतीने म्हणत, ‘‘गोविंदरावांचे हात गणपतीसारखे आहेत. ‘गोविंद’ हे कृष्णाचे वेदप्रतिपाद्य, गणपती स्वरुप. बृहस्पतीचेही ते नाव आहे. ज्ञानज्योती (गो) ज्याला प्राप्त झाली आहे तो म्हणजे गोविंद. त्यामुळेच तळवलकरांचे नाव अगदी सार्थ आहे’’.

ॐ नमोजी आद्या

शनिवार-रविवार, सुट्टीच्या दिवसांत त्यांच्याकडे अनेक नातेवाईक, पाहुणे भेटायला, रहायला येत असतं. कधी परदेशी वकिलातील लोक, कधी साहित्यिक, पत्रकार, कलावंत, वकील, न्यायाधीश, उद्योगपती, प्राध्यापक, कवी, राजकारणी, चित्रकार, मित्रमंडळी वगैरे. रोजच्या रोज लोकं येत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी घरात अनेक प्रकारची बिस्किट, चॉकलेटस्, फळफळावळ व इतर अनेक पदार्थ नेहमीच आणून ठेवलेले असायचे. आल्यागेल्यांचे आगत-स्वागत करायला त्या दोघांना मनापासून आवडत असे. घरात बिस्मिल्‍लाची सनई लावली (की ते गमतीने म्हणायचे ‘‘चला, पेढे आणा, गुलाबफूल आणा.’’

बिस्मिल्‍ला सनई

वस्तू जागच्या जागी ठेवण्याची त्यांना सवय होती. कोणत्याही पत्राला किंवा ई-मेलला त्याच दिवशी उत्तर देण्याचा त्यांचा कटाक्ष होता. त्यांचे अक्षर सुंदर नव्हते. पण कोणालाही सहज वाचता येईल इतके स्वच्छ होते. प्रत्येकांनी कार्यालयात वेळच्या वेळी हजर असलं पाहिजे अशी त्यांची शिस्त होती. ‘आपला वरिष्ठ अधिकारी बुद्धिमान असावा, मग खाष्ट असला तरी चालेल, पण निर्बुद्ध, दुष्ट व पाताळयंत्री कधीच नसावा’ असे त्यांना नेहमी वाटे.

अनेक विषयांचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. त्यामुळे शकुंतलाबाई त्यांच्या पत्नी त्यांना ‘‘चालता-बोलता ज्ञानकोश’’ म्हणत असत. त्यांची आकलनशक्ती व स्मरणशक्ती अफाट होती. त्यांनी आपल्या मुलींचा अभ्यास कधीच घेतला नाही पण चांगली चांगली पुस्तके त्यांना वाचावयास सांगत असत. त्यामुळे मुलींनाही चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची गोडी लागली. घरातच वाचण्यासारखी खूप पुस्तकं उपलब्ध असल्यामुळे वाचण्याचा छंद त्या दोघींना लागला. त्याचप्रमाणे मुली लहान असताना संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, होनाजी बाळा, गोरा कुंभार, राम जोशी, आनंदफंदी अशा प्रकारचे चित्रपट दाखविले.

सांगा मुकुंद कुणीही पहिला – होनाजी बाळा

गोविंदरावांच्या वाचनाची गती अफाट होती. ‘अखंडित वाचित जावे’ हा स्वामी समर्थांचा उपदेश ते मन:पूर्वक पाळत. त्यांच्या वाचनाचे विषयही विविध असायचे. इतिहास, राजकारण, आर्थिक आणि सामाजिक प्रश्न तसेच चरित्र, ललित साहित्य आणि आत्मचरित्र. असंच एकदा नाशिकला कुसुमाग्रजांकडे गप्पा-गोष्टी रंगात आल्या असताना ‘वाचता वाचता’ हया सदराचा जन्‍म झाला आणि गोविंदराव ‘वाचस्पती’ ह्या टोपण नावाने लेख लिहू लागले. ‘वाचन आणि लेखन हीच माझी विश्रांती’ असे ते नेहमी म्हणत असत. अमेरिकेत गेल्यावर सुद्धा ते रोज सकाळी लायब्ररीत वाचावयास जात असत.

चार्ली चॅप्लिन म्हणजे त्यांचा ‘जिवाभावाचा मित्रच! ‘चार्ली’ चे सर्व चित्रपट त्यांच्या कुटुंबियांना फारच आवडत असत. आणि विशेष म्हणजे वेळ उपलब्ध असला की ते ‘चार्ली’ चे चित्रपट पुन्हा पुन्हा पहात असत.

आफ्रिकेतील झुलू भाषेतही ज्यांच्या नाटकांची भाषान्तरे झाली, असा नाटक कारांचा पितामह ‘शेक्‍सपिअर’ हा त्यांचा खास आवडता ‘जननांतर सुह्द’. हॅम्लेट,ऑथेल्लो, मॅकबेथ, किंग लिअर’ सारखी शेक्‍सपिअरची नाटके त्यांना फार प्रिय होती. त्यातील अनेक संवाद त्यांना तोंडपाठ असायचे व ते संवाद त्या नटाबरोबर तेही म्हणत असत. शेक्सपियरच्या 400 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी चार प्रदीर्घ लेख लिहिले जे त्यांच्या ‘मधुघट’ पुस्तकात आहेत.

( क्रमश: )

– वासंती गोखले – अंधेरी (पूर्व)

1 Comment on ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग १

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..