रशियन लोकांचे शेयसपिअरवरील अपार प्रेम पाहून ते आनंदित झाले. का? तर, आपल्या जीवश्चकंठश्च मित्रावर इंग्रजी भाषिकच नव्हेत, तर रशियन आणि जर्मन सुद्धा एवढे प्रेम करतात म्हणून. कम्युनिस्ट राजवटीत सुद्धा शेक्सपिअरला मान होता हेच महत्त्वाचे आहे, असं त्याचं म्हणणं होतं आणि विशेष बाब म्हणजे दरवर्षी 23 एप्रिल रोजी, त्यांच्या घरी ते शेक्सपिअरची पुण्यतिथी साजरी करत असत.
शेक्सपिअर इग्लंडचा खरा पण आपल्या नाटकांमुळे तो ‘जगाचाच नागरिक’ केव्हाच होऊन बसला. 23 एप्रिल १९९६ रोजी ते महाराष्ट्र टाईम्स मधून निवृत्त झाले. ही नेमकी शेक्सपिअरचा पुण्यतिथीची तारीख! शेक्सपिअरशी त्यांचे असलेले नाते पुन्हा अनुभवास मिळाले. अॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अॅव्हन या शेक्सपियरचा जन्मस्थळी ते आवर्जुन गेले होते.
शेक्सपियरच्या नाटकातील उताऱ्याचे सादरीकरण-
To be, or not to be, that is the question:
Whether ’tis nobler in the mind to suffer
बरेच वर्षांपूर्वी ते संपादक असताना ‘म.टाईम्स’ची दूरदर्शनवर जाहिरात करायची असे ठरले. त्यावेळी वसंत बापट तेथे होते.
ते म्हणाले, ‘‘उदयाचली येणारा सूर्य तापदायक न होता मित्रासारखा सर्व दिशा उजळून पोषण करतो, चालना देतो. तिच उपमा तुम्हालाही साजेशी आहे. मग होनाजी बाळाच्या ‘अमर भूपाळी’चा आधार घेत ‘महाराष्ट्र टाईम्स, पत्र नव्हे मित्र’ ही जाहिरात तयार झाली. सर्वांनाच ती फार आवडली.
घन:श्याम सुंदरा, श्रीधरा …..
पुस्तकाचे दुकान म्हणजे गोविंदरावांना पर्वणीच असे, कोणतेही पुस्तक खरेदी केल्यावर ते प्रथम शाकुन्तलाबाईंना दाखवीत. एखाद्या लहान मुलाला खाऊ किंवा खेळणे बघून जसा आनंद होतो तसा त्यांना पुस्तके आणल्यावर व्हायचा आणि त्यांना गोविंदरावांच्या विद्वतेची पूर्ण जाणीव होती आणि अभिमानही होता. मग त्या म्हणत, ‘‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा ।’’
२००७ मध्ये त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. कृत्रिम लेन्स बसविण्यात आल्या होत्या. पहिल्यांदा डोळ्यात इंजेक्शन दिले तेव्हा डॉक्टर ऍनेस्थेशिया द्यायलाच विसरले होते पण त्यांनी डॉ. विरुद्ध कोणतीही फिर्याद नोंदविली नाही कारण फिर्यादी लावण्यात वेळ घालवायची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना फक्त वाचनात व लिखाणात रस होता. नाकात ऑक्सिजनची नळी घालून अतिदक्षता विभागात व घरी ते वाचन करीत असत, लिहीत असत. वाचन, संशोधन आणि लेखन हे परमप्रिय असल्यामुळे तेच त्यांचे जीवन होते. प्राणवायू होता, ते खरे ज्ञानोपासक होते.
दूरदर्शनवरील ‘चिमणरावांचे चर्हाट’ आणि ‘मालगुडी डेज’ हे त्यांचे आवडते कार्यक्रम होते.
अमीन सयानींचा ‘बिनाका गीतमाला’ मधील आवाज आणि बोलण्याची पद्धत त्यांना फार आवडायची. अमीन सयानींना सर्व पत्रे ‘झुमरीतल्लया’ या गावातूनच कशी येतात? हे गाव कोठे आहे? गावातील लोक एवढे रसिक आहेत कां? हा प्रश्न त्यांना नेहमी पडत असे.
अमीन सयानींचा आवाज
सत्वगुणी, सुस्वभावी व ज्ञानगुणसागर म्हणून त्यांची ख्याती होती. मराठी बरोबरच इंग्रजी लिखाणही त्यांनी निर्मळ आणि सुंदर शैलीत केले आहे. सव्यसाची, चिकित्सक, संपादक, अभिजात, सिद्धहस्त लेखक, द्रष्टे इतिहासकार व पत्रकार म्हणून ते मान्यता पावले.
विषयाच्या मुळाकडे जाण्याची बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती आणि शुद्ध ज्ञानाचे प्रेम हे गुण त्यांच्याजवळ उपजतच होते. भविष्यातील घटनांची चाहूल लागणे व योग्य परिवर्तनासाठी काय करायला पाहिजे याची स्पष्ट कल्पना येणे हा अभिजात इतिहासकाराचा व पत्रकाराचा असामान्य गुण त्यांच्यात प्रकर्षाने आढळतो. नवीन युग हे इलेक्ट्रॉनिक्स असून, त्यात प्राविण्य मिळविण्यातच प्रगतीची व यशाची गुरुकिल्ली आहे हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच सांगितले होते.
ब्रिटीश राज्यपद्धती, निवडणूक, इंग्लिश साहित्य व जीवनपद्धती यांचे त्यांना कमालीचे आकर्षण होते. त्यामुळे त्यांचे काही मित्र त्यांना ‘सर गोविंदराव’ म्हणत. अमेरिकेतील विद्यापीठे, सार्वजनिक ग्रंथालये, विविध संशोधन संस्था, त्यात चालणारे संशोधन याचे आकर्षण असले तरी इथले राजकारण, समाजकारण व पत्रकारिता पाहून त्यांना वीट आला होता.
त्यांच्याकडे स्वत:ची अशी 25 हजारांपेक्षा अधिक पुस्तके होती. ती पुस्तके सुरक्षित राहावीत, अभ्यासक्रमासाठी उपयोगी पडावीत आणि त्या पासून ज्ञानानंद मिळावा या साठी २०१६ साली त्यांनी सर्व ग्रंथ संग्रह पुण्याच्या ‘भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था’ या ग्रंथ संग्रहालयास देणगीदाखल दिली. प्रिय पत्नीच्या निधनानंतर पाच लाख रुपये जुन्या पुस्तकांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी दिले. ‘दासबोध’ आणि ‘तुकारामांची गाथा’ हे त्यांचे विशेष आदराचे व आवडीचे ग्रंथ ते नेहमी चाळत. त्या उदंड ग्रंथसागराला ते ‘माझे अनौपचारिक साहित्य संमेलन’ व ‘मधुसंचय’ म्हणायचे. जुन्या आणि नव्या पुस्तकांचा गंधही त्यांना प्रिय वाटायचा.
तुकारामांची गाथा :- जन विजन झाले आम्हा –
चरित्रे व आत्मचरित्रे यांच्या वाचनाने मोठमोठ्या लोकविलक्षण अशा व्यक्तींच्या जवळ आपण जाऊन पोहचतो. ग्रंथवाचनाचे अनेक उपयोग असतात. पण खरा उपयोग ज्ञानसंवर्धन असाच असतो. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते’ हेच खरे. ज्ञानाच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही. अखंड ज्ञानसाधना हे त्यांचे ब्रीद होते.
गोविंदराव तळवलकर अतिशय प्रसिद्धीपराङ्मुख होते. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ या तत्त्वानुसार त्यांनी कधी स्वत:वर रकाने भरले नाहीत. स्वत:वर प्रसिद्धीचा झोत ठेवला नाही पण दुसर्याला योग्य ती प्रसिद्धी दिली. प्रा.अनंत भावे ह्यांनी गोविंद तळवलकरांना ‘महाराष्ट्राचे सांस्कृतिक शिक्षक’ असे संबोधले आहे. ‘भाषाशैली आणि विचार’ ह्या दोन्ही दृष्टीने गोविंदरावांचे लिखाण महत्त्वाचे आहे. शाळा कॉलेजातील अभ्यासक्रमांत ते आवश्यक आहे. कर्नाटकात अभ्यास क्रमामध्ये गोविंदरावांचा लेख आहे. पण महाराष्ट्रात नाही, ह्याची आपल्याला व शिक्षण खात्याला खंत असायला हवी, असे पु. ल. देशपांडे म्हणाले.
संपादकीय कालखंड
१९५० नंतरची तब्बल पाच दशके, मराठी वृत्तपत्र सृष्टीत पत्रकार- संपादक म्हणून सर्वाधिक प्रभाव जनमानसावर राहिला तो म्हणजे गोविंद तळवळकरांचा. १९५०- १९६२ अशी बारा वर्षे ‘लोकसत्ता’ मध्ये आणि त्यानंतर तब्बल ३४ वर्षे ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकात त्यांनी काम केले. अखेरची २८ वर्षे ते ‘म. टा.’ चे मुख्य संपादक होते आणि त्या काळातील महाराष्ट्राच्या पत्रकारितेत त्यांचे गौरव स्थान एकमेव अद्वितीय होते.
संपादकीय कामाबरोबरीनेच त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांच्या लेखनाला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे तीन स्तर लाभले आहेत. व्यवहार्य दृष्टी ठेवून, सारासार विचार बाळगून, ज्याने आपल्याला पटेल असा मार्ग स्विकारुन कार्यरत रहावे, अशी धारणा असलेला तो रॉयवाद्यांचा जो प्रवाह होता, त्याच प्रवाहात तळवळकरांची वैचारिक घडण झाली होती.
तळवळकरांच्या अग्रलेखाचे एक वैशिष्टय म्हणजे कठीण विषयाचे त्यांनी केलेले अतिशय सुबोध विवेचन. अर्थसंकल्पासारख्या विषयावर सुद्धा ते अतिशय मार्मिक पण सुबोध लिहित. त्यांच्या अग्रलेखाना दीर्घकालीन मूल्य लाभले ते त्यांच्या व्यासंगी आणि वस्तुनिष्ठ निरीक्षण शक्तीने.
तळवळकर हे कायमच जिज्ञासेच्या दारात उभे असायचे. (फोटो, साधना) Old Curiosity Shop समोरचे त्यांचे छायाचित्र जणू काही असंच सुचवित आहे.)
त्यांनी लिहिलेला सर्वोत्तम म्हणावा असा लेख म्हणजे ललित लेखक चार्ल्स डिकन्सवरचा 10,000 शब्दांचा लेख. परखड अग्रलेख हे तळवळकरांचे बलस्थान. त्यांच्या लेखनावर टिळकांच्या शैलीचा निश्चितपणे प्रभाव होता.
सोपेपणा हा दोघांच्या लेखनातला समान दुवा होता. पत्रकारांसाठी असलेली ‘थॉमसन फाऊंडेशन’ ची शिष्यवृत्ती मिळवणारे गोविंद तळवळकर हे पहिले मराठी पत्रकार.
‘म. टा.’ हे वृत्तपत्र विचारांनी आधुनिक व्हावे, त्यांच्या वाचकांना केवळ राज्यातील घडामोडीच नव्हे, तर जगातल्या जगातल्याही घडामोडी कळाव्यात, अनेक विषयांची आवड निर्माण व्हावी असा कटाक्ष त्यांनी बाळगला होता. विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानात प्रगती केली तर आर्थिक आणि सर्वंकष प्रगती होऊन जगामध्ये भारताचे स्थान उंचावेल अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी १९८२ मध्येच त्यांनी ‘विज्ञान पुरवणी’ सुरु केली होती.
ते त्यांच्या संपादनासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा कोणत्याही ठराविक पक्षाशी संबंध नव्हता पण जनतेने आणि विद्वान लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले. त्यांनी महाराष्ट्रात चर्चेचे विषय मांडले.
जमीन दुर्बल परिस्थिती, दुष्काळ परिस्थिती, धरणे, शेती, बँकींग, आर्थिक सुधारणा निर्वासितांची समस्या आणि विद्यापीठांना भेडसवणाऱ्या समस्या यावर प्रकाश टाकला. अंधश्रद्धा निर्मूलन तसेच सामाजिक न्यायाची गरज, दलित आणि महत्वाच्या मुद्यांसाठी ते धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेला वचनबद्ध होते. त्यांनी राजकारण, विद्यापीठ, रुग्णालये, सामाजिक आणि सार्वजनिक विषयांमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यांच्या संपादकीय कार्यकाळात ‘महाराष्ट्र टाईम्स’ हा एक व्यापक बौद्धिक मंच म्हणून मानला जातो.
भारतातील सत्ता–हस्तांतरणाच्या घटनात्मक बाबींवर ‘सत्तांतर 1,2,3 कालखंड’, ‘नौरोजी ते नेहरु’, ‘नियतीशी करार’ ‘गांधी पर्व खंड 1,2’ अशी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांनी एकूण ‘अभिजात’, ‘मंथन’, ‘बहार’, ‘अक्षय पुष्पांजली’, ‘सौरभ’, ‘ग्रंथसंगती’, ‘प्रासंगिक’, ‘व्यक्ती आणि वाङ्मय’, ‘मधुघट’ अशी 32 पुस्तके व इंग्रजीत गोपाळ कृष्ण गोखले (लाईफ अँड टाइम्स), वय. बी . चव्हाण (लाईफ अँड टाइम्स) सारखी पुस्तके लिहिली.
२००७ पासून २०१७ पर्यंत गोविंदराव तळवलकर यांनी साधना साप्ताहिकात १७० लेख लिहिले. कोणत्याही गीष्टीच्या सर्व बाजू समजावून घेऊन मगच लिहावे , तरीही आणखी वेगळा पुरावा समोर आल्यास चूक झाल्याचे लक्षात आल्यास दुराग्रहीपणा न करता आपली चूक मान्य करावी आणि न्याय्य बाजू मांडावी हे उत्तम पत्रकारितेचे तत्व त्यांनी नेहमी आचरण आणले.
पत्रकार म्हणून इंग्रजीत ‘टाईम्स ऑफ इंडिया’, कलकत्याच्या ‘द टेलिग्राफ’, ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’, तसेच इतर सुप्रसिद्ध वृत्तपत्रांना लेखांचे योगदान दिले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा व आवाका दोनच शब्दात सांगायचा तर ते म्हणजे लेखन आणि ग्रंथवाचन.
‘वाचता वाचता’-
अर्थात -ऐतिहासिक ‘व्यक्ती रेखा’, वाङ्मयीन कलाकृती आणि आंतरराष्ट्रीय घटनांना घातलेली गवसणी,
महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात, डिसेंबर १९७४ ते जुलै १९७७ या कालखंडात ‘वाचता वाचता’; हे श्री गोविन्द तळवळकर. यांनी ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिलेले एक अतिशय लोकप्रिय सदर. १९७९ मध्ये ‘ प्रेस्टिज’ प्रकाशनाने, एकूण ९१ (एक्याण्णव) सदारांचे संग्रहण प्रसिद्ध केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे २० व्या शतकातील जागतिक इतिहासात, पाश्चिमात्य, युरोपीय आणि पूर्वेकडील देशांमध्ये राजकीय आणि सामाजिक स्थान संपादन केलेल्या व्यक्ती रेखा आणि ठळक घटनांचे सजीव आणि ‘चिकित्त्सक दृष्टिने केलेले हे चलत चित्रण (आंखो देखा हाल) आहे.
सर ‘विन्स्टन चर्चिल, हॅरोल्ड विल्सन, अध्यक्ष ‘निक्सनं, बर्ट्रांड रसेल, पंडिता रमाबाईंचे जीवन, जगविख्यात ‘कार्ल मार्क्स आणि एंगेल्स, ‘लेनिन’, ट्रॉटस्की, स्टॅलिन, मोतीलाल नेहरूंच्या दंतकथा, यात गुंफल्या आहेत. फ्रान्सचे ‘जिओ पॉल सार्त्र , हिटलर, अगाथा ख्रिस्ती आणि महान कवी पाब्लो नेरोदा,)
( क्रमश: )
– वासंती गोखले – अंधेरी (पूर्व)
Leave a Reply