नवीन लेखन...

ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग ३

अशा अनेकांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, घडामोडी, चढउतार, गमतीदार आठवणी यांचे सचित्र दर्शन घडवून वाचकांच्या ‘बौद्धिक कक्ष्या’ रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे.

‘वाचता वाचता’ पुस्तकाद्वारे एका भव्य सृष्ष्टीचे वाङ्मयीन दर्शन घडवत असतानाच, गोविंदरावांनी आपली ‘बौद्धिक क्षितिजे किती  अमर्याद असू शकतात याचे विहंगम दर्शन घडविले आहे. गोविंदराव तळवलकर यांचा, श्री ह. रा. महाजनींसोबत ‘लोकसत्ता’ संपादक आणि नंतर ‘महाराष्ट्र टाइम्सचे , सहसंपादक, संपादक आणि शेवटी सल्लागार संपादक, ’असा त्यांचा वृत्तपत्रीय स्तंभ लेखनाचा प्रवास तब्बल ४० वर्षांचा आहे.

वैचारिक व्यासपीठे’

‘वैचारिक व्यासपीठे’ हे श्री गोविंदराव तळवलकर यांचे ‘साधना’ प्रकाशनाने २०१२ मध्ये प्रकाशित केलेला ‘विचार प्रवर्तक’ अशा १५ लेखांचा गुंफलेला संग्रह! जगभरात गेल्या १५० वर्षांच्या कालखंडात प्रसिद्धीस पावलेल्या व लोकप्रिय झालेल्या शेकडो नियत कालिकांचे’  ‘नीरक्षीर विवेक बुद्धीने त्यांनी केलेले परीक्षण आणि मूल्यमापन! आपल्या सव्यसाची, अखंड वाचनातून पाश्चात्य, भारतीय आणि इतरत्र प्रसिद्ध होणाऱ्या नियत कालिकांमधून त्यांनी, फक्त १४ नियत कालिकांची समालोचनासाठी त्यांनी निवड केली. त्यातील लेखमाला आणि उपक्रम यांचा अत्यंत सुन्दर, मार्मिक आणि चित्तवेधक भाषेत त्यांनी उहापोह केला आहे.

‘समारोपाच्या’ प्रकरणात त्यांनी, प्रतिष्ठित आणि आंतर राष्ट्रीय ख्यातीच्या ‘ टाइम्स, ‘ न्यूयॉर्क टाइम्स यांचा सवंगपणा, घसरलेला दर्जा, वैचारिक पीछेहाट यांची सुंदर शब्दात ‘बोळवण’ केली आहे. त्यांच्या वार्ताहरांनी आणि संपादकांनी खोट्या बातम्यांचे रतीब टाकले याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना ‘वैचारिक व्यासपीठातून’ बाहेरचा रस्ता दाखविला आहे!  ‘आंतरराष्ट्रीय’ नियतकालिकांची तोंड-ओळख मराठी वाचकांना करून देणे हाही उद्देश आहे. मराठी वाचकांसाठी हे पुस्तक उद्बोधक, विचारप्रवर्तक आणि डोळे उघडणारे आहे.

गोविंद तळवलकरांच्या अनेक अग्रलेखांचे संग्रहण

पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्या गेलेल्या या संग्रहणात, ‘राजकीय ‘भारतीय’, ‘राजकीय- परदेशी’ , आर्थिक, व्यक्तिविषयक , संकीर्ण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. आता ऐकुया गोविंदराव तळवलकरांनी आचार्य अत्रे ह्यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखाचा संक्षिप्त स्वरूपातील काही भाग.

व्यक्तिरेखा आचार्य अत्रे – मृत्युलेख (‘संक्षिप्त स्वरूपात’)

महाराष्ट्राच्या दगड धोंड्यांवर, नद्या डोंगरांवर  अतोनात प्रेम करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या निधनाने पहाडाचा कडा कोसळला असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात प्रचंड व्यक्तित्वाचे व कर्तृत्वाचे अनेक पुरुष होऊन गेले पण मुख्यतः साहित्याचा पिंड असलेले पण तरीही अनेक अंगानी आणि ढंगानी फुललेले सध्याच्या काळात कोणीही  नव्हते आणि नाही. मराठी साहित्यातील आणि महाराष्ट्राच्या लोकजीवनातील एक प्रचंड आणि अफाट व्यक्तीमत्व नाहीसे झाले आहे. अशी अग्रलेखाची सुरवातच आहे.

त्यांच्या हजारो अग्रलेखांमध्ये इतका हृदयंगम आणि प्रेम आणि व्याकुळतेने बहरून गेलेला अग्रलेख विरळाच! शाळा मास्तर म्हणून त्यांनी जीवनाला प्रारंभ केला, मराठी पाठय पुस्तकांमध्ये त्यांचे ‘धडे आले  आणि सुवर्णपदक विजेत्या ‘शामची आई’ चित्रपट निर्मितीपर्यंतच्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी विहार केला असे तळवलकर आवर्जून सांगतात. राजकारणात त्यांनी प्रवेश केला आणि आपल्या वक्तृत्वाने आणि लेखणीने सारा महाराष्ट्र दणाणून सोडला.

मराठी साहित्यात इतकी प्रसन्न आणि ओघवती शैली लाभलेले साहित्यिक क्वचितच सापडतील. ‘झेंडूची फुले’ ह्या त्यांच्या काव्यसंग्रहाने सर्वच विक्रम मोडले. अत्रे म्हणजे विनोद हे समीकरण दृढ झाले असले तरी त्यांचे काव्य, अध्यात्म यांविषयीचे लेख विनोदी नाहीत. ते रसिकतेने काठोकाठ भरलेले आहेत.’अखंड उदयोग्य हा अत्रे यांचा विशेषही दुर्मिळ होता. साहित्य, व्यक्ती आणि ग्रंथविषयक त्यांचे लेख वाचणे हा एक आनंदाचा विषय होता. आता तो आनंद संपला आहे.

शहाद्यातील संघर्ष -२४ / ११/ १९७३ (सारांशरूपाने)

धुळे जिल्हा आणि ‘ शहादे‘ तालुक्यात’ जमीनदारांनी ‘आदिवासी, शेतमजुरांच्या शांततापूर्ण चळवळी आणि मोठ्या जमीनधारकांनी ‘सशस्त्र दलाची स्थापना ‘ करण्यासाठी केली योजना या विषयावर महाराष्ट्र विधानसभेत आणि लोकसभेत ‘मोठेच वादळ उठले’.

“धुळे जिल्हा आणि शहादा तालुका गेले काही दिवस गाजत आहे”.  तिथे शेतमालकानी ‘पीक संरंक्षणाच्या नावाखाली ;सशस्त्र दल ‘ उभे करण्याची योजना आखली आहे. केंद्रीय ‘गृह मंत्रिं आणि राज्यमंत्री यांनी आम्हाला याची माहिती नाही आणि चौकशीसाठी ‘खास अधिकारीं धुळे जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले आहेत. या उत्तरांवार गोविंदरावांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

आमच्या प्रतिनिधीने दोन्ही पक्ष्यांच्या बाजू दिल्या आहेत. व त्यावरून हे स्पष्ट होईल की ‘शहाद्यातील ही योजना “पीक संरक्षणासाठी नाही तर तेथील ‘आदिवासी -शेतमजूर ‘ जागृत होत असल्याने ‘त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी हि तयारी केली आहे. श्री. पी. के. पाटील यांनी या तयारीला ‘टाईम्सच्या ‘ इमारती समोर गुरखे नसतात का? असा प्रश्न ‘टाइम्सच्या वार्ताहराला विचारला. असता गुरखे म्हणजे ‘पोलीस दलाला’ पर्यायी यंत्रणा नाही’ असे तिखट पण मार्मिक उत्तर दिले.

शहादे -तळोदे ‘ हे भाग आदिवासी भाग म्हणून ओळखले जातात’. आदिवासी सामाज्याचे दारिद्र्य, सावकारशाहीपुढे हतबल होऊन त्यांच्या कडे ‘ गहाण टाकलेल्या जमिनी, आदिवासी- शेतमजुरांची ‘कर्जबाजारी अवस्था, यांवर त्यांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. ‘शंभर रुपयांचे ‘कर्जसुद्धा त्यांना फेडता येत नाही’ या जमिनी मूळच्या या शेत मजुरांच्याच पण सावकारशाहीने ग्रस्त झालेल्या आदिवासींना पिळवणुकीतून मुक्त करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही या बद्दल या अग्रलेखात चिंता व्यक्त केली आहे. भिल्ल समाज संघर्षाच्या पवित्रता का उभा आहे हे काँग्रेस जनांनी तपासायला हवे.

‘भिल्ल सम्ज संघर्षांच्या का उभा आहे हे काँग्रेस जणांनी तपासायला हवे. शेत मालक शस्त्रधारी संघटना कश्या उभ्या करू शकतात, तिथली सालदार पद्धत कि ज्या योगे ते ‘शेतमजुरांना ‘बांधून ठेवतात. ‘वेठबिगारीला दिलेले हे ‘गोंडंस नाव आहे.

‘फुले वेचिता बहरू ‘- अर्थात-बाबांचे साहित्यात उमटलेले ‘बाग प्रेम’

मी, गोविंदराव तळवलकरांची ‘जेष्ठ कन्या ‘- डॉ. निरुपमा’ . बाबांना फुलांची व बागेची फारच आवड होती कारण त्यांची वृत्ती मुळातच अतिशय कलात्मक होती. रेखीव आखणी करून झाडे लावायची. पण ती नैसर्गिकरीत्याच उगवली आहेत असे सर्वांना वाटले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. रंगसंगती सुद्धा भडक नसावी.

त्यांच्या काही पुस्तकांची नावे सौरभ, बहर, पुष्पांजली, मधुघट अशी आहेत. तर त्यांनी म.टा. मधील एका सदराचे नाव ठेवले होते. ‘फुलोरा’. फ्रेंच चित्रकार क्लॉमद् मोनेच्या बागेचे तर त्यांना अपार प्रेम होते. विश्वेश्वरय्यांच्या ‘वृंदावन गार्डन’चे तर विशेष कौतुक. फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्या भोवतीची नक्षीदार गालिच्या सारखी नयनरम्य बाग त्यांना नेहमीच प्रसन्न वाटायची.

बागेवरची कविता

शेक्सरपिअर, चेकॉव्ह, टॉलस्टॉय, वर्डस्वर्थ हे त्यांचे आवडते लेखक-कवी. त्यांच्या साहित्यात झाडांचे, फुलांचे अनेक उल्लेख आहेत. त्यांच्या घराभोवतीच्या बागा अत्यंत प्रेक्षणीय असल्यामुळे, त्या त्या जागी जाऊन त्यांनी सर्व बागा पाहिल्या.

लंडनजवळ केंटमध्ये, चर्चिलच्या चर्चिलनी चार्टवेल ह्या निवासस्थानात स्वत: बाग लावली आहे. लंडनला गेल्यावर, पहिल्या दौऱ्यातच बाबांनी त्या बागेला भेट दिली. लंडनमधील ‘रिजन्ट पार्क ‘ मधील ‘ क्वीन मेरीच्या ‘रोझ गार्डेनमध्ये आम्ही नेहमी जायचो . तिथे नारळ , आंबा, रातराणी आणि जास्वंद अशी ‘अपलीच झाडे लंडनमध्ये पाहून त्यांना भारतात आल्यासारखे वाटत असे.

आल्या वसंतगौरी, सांगे फुलास वारा,

वार्यास गंध येतो, म्हणती ढगार तारा।

ही माडगूळकराची कविता त्यांना अत्यंत प्रिय होती. तसेच ग. दि. मां ची गीत रामायणातील ‘गीते ‘सुद्धा त्यांना खूपच आनंदित करत असत. “स्वयंवर झाले सीतेचे”

पूर्वी संध्याकाळी कार्यालयातून कितीही उशिरा घरी आले तरी, विहिरीतून पाणी काढून भल्या मोठ्या झारीने ते सर्व बागेला पाणी घालत असत. ते नेहमीच म्हणत. ‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे….’’ त्यावेळी आपले आवडते गायक सैगल, पंकज मलिक किंवा शास्त्रीय गाणी, नाट्य संगीताच्या ध्वनिमुद्रिका, गीतरामायण व अमरभूपाळी यांच्या ध्वनिमुद्रिका सुद्धा मोठ्याने लावत  असत.

सैगल/पंकज मलिक- यांचे एक गीत

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए पत्रकार कुमार केतकर यांनी आपल्या ‘मानदंड’ या आदरांजली वाहणाऱ्या लेखात त्यांच्या ‘सांगीतिक’ प्रेमाचे गोडवे गायले आहेत. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर हे त्यांच्या सांगीतिक आस्थेचे विषय होते.

सुप्रसिद्ध पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्स चे संपादक श्री कुमार केतकर यांनी गोविंदरावांना व्हिडिओद्वारे  आदरांजली  वाहिली.

१९६० ते जवळजवळ १९९० परीमचा कालावधी ‘महाराष्ट्र टाइम्सचे निर्भीड असे मुख्य संपादक म्हणून जबाबदारी पार पडली त्याचा परामर्श घेतला. इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्यापासून, रेल्वेसंप, बांगलादेशमधील भारत पाकिस्तान युद्ध, आणीबाबी, जनता पक्ष्याचा उदय आणि सत्ताग्रहण, गरिबी हटाव घोषणा, पुन्हा इंदिरा गांधींच्या पक्ष विजय आणि पुढे इंदिरा गांधी यांची निर्घृण हत्या अश्या अत्यंत कठीण आणि पर्व आपल्या बौद्धिक आणि राजकीय जाणिवांच्या कक्षेत, आवाक्यात  घेण्याचे कार्य  महाराष्ट्र टीमचे मुख्य संपादक म्हणून गोविंदरावांनी जो प्रयत्न केला ,असा प्रयत्न कोणीही केल्याचा दाखला आजतागायत मिळत नाही असे श्री कुमार केतकर यांनी आवर्जून सांगितले. त्या सोबत त्यांचा युरोपिअन इतिहासाच्या अभ्यासाचा व्यासंग सुद्धा अतुलनीय असाच होता. असा प्रकांड अनुभव असलेला  ‘वृत्तपत्र, दैनिकाचा  संपादक’ होणे नाही . संपूर्ण मराठी आणि इतर भाषिक वाचकांची मानसिकता घडवीली, त्याला दिशा देणे याचे महान कार्य गोविंदराव तळवलकर यांनी केले.

* मैत्र जीवाचे अर्थात बाबांचे श्वानप्रेम

मी, गोविंदराव तळवलकरांची ‘ कनिष्ठ कन्या ‘सुषमा’. अगदी लहानपणापासूनच बाबांचे पशुपक्ष्यांशी आंतरिक नाते होते. घरी आम्ही नेहमी कुत्रा पाळायचो कारण सर्वांनाच कुत्र्यांविषयी प्रेम होते. कुत्र्यालाही राग-लोभ, प्रेम सर्व काही असते, असे बाबांना वाटायचे. ‘कुत्र्यांची आवड’ या समान धाग्यामुळे बाबांनी ‘व्हर्जिनिया वूल्फवर’ लेख लिहिले. त्यांना ‘राजहंस आणि मोर’ ह्यांची सुद्धा विशेष आवड व प्रेम .

दिसायला चांगले, रुबाबदार, भरदार आवाजाचे – सिली, मोती, लॅबे्रडॉर-टायगर असे वेळोवेळी कुत्रे आम्ही पाळले होते. आईने केलेले आमरस-पुरीचे जेवण सुद्धा त्यांना आवडत असे. आमच्या बाबांवर त्यांचा विशेष लोभ ते घरी आले की त्यांच्या अवतीभवती, बाजूलाच किंवा पायाशी हक्काने ते बसून रहात.

शिवाजी महाराजांच्या खंड्या कुत्र्याची समाधी रायगडवर आहे. या स्वामिनिष्ठ कुत्र्याने महाराजांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या चितेत उडी घेतली होती. याचे बाबांना फार कौतुक होते. राम गणेश गडकर्यांनी ‘राजसंन्यास हे नाटक खंड्या कुत्र्याला अर्पण केले आहे. हे त्यांना फार प्रशंसनीय वाटायचे. H.M.V. कंपनीच्या ध्वनीमुद्रिकेवरील मालकाचा आपुलकीने आवाज ऐकणारा कुत्रा पाहून त्यांना कौतुकच वाटायचे.

गोविंद तळवलकरांना पत्रकारिता आणि साहित्याला वेळोवेळी अनेक पुरस्कार लाभले आहेत त्यातील काही महत्वाचे पुरस्कार)

आमचे बाबा गेले बाबांची प्राणज्योत मालवली-. (21 मार्च २०१७).- डॉ. निरुपमा’

दोन अडीच वर्षांच्या आमच्या आईच्या आजारपणामुळे बाबांचे रोजचे फिरणे बंद झाले. त्यांना सतत तिची काळजी असायची. दु:ख आणि त्याचबरोबर एकटेपण. तरीही ते सतत वाचन व लिहीत असायचे. 2 ऑगस्ट २०१४ ला आईच्या निधनानंतर मात्र ते पार खचून गेले आणि परत सावरलेच नाहीत. मनाने तेही आईबरोबर गेले होते. त्यावेळी भारतात यायची त्यांना तीव्र इच्छा होती, पण शरीर साथ देत नव्हते.

 गोविंद तळवलकर ह्यांच्या मुलींनी त्यांच्या शेवटच्या दिवसाचे वर्णन किती ह्द्य केले आहे पहा ! कोणालाही पाझर फुटेल असा ! डॉ.  निरुपमाच्या निरूपमच्या शब्दातच हे ऐकूया.

जानेवारी २०१७ पासून बाबा रात्री कधीच नीट झोपले नाहीत. आई, आई किंवा शकुन, शकुन असा आक्रोश करायचे. त्या दिवशी मंगळवारी 21 मार्च २०१७ मध्ये डोळ्यांच्या डॉक्‍टरची अपॉइंटमेंट होती. आता यापुढे आपल्याला वाचता येणार नाही ह्या कल्पनेनेच त्यांना रात्रभर झोप लागली नव्हती. आणि दुपारी अचानकच बाबांची शुद्ध हरपली. कृत्रिम श्‍वासोच्छवास सुरु केला होता. सर्व तर्‍हेच्या उपाययोजना केल्या पण यश आले नाही. संध्याकाळचे पावणेपाच वाजले आणि आमचे बाबा गेले. आता ते आमच्याशी कधीच बोलणार नव्हते.

आमचे मन इतके सुन्न झाले की, आम्हाला काहीच समजेनासे झाले. आम्ही सुद्धा आता जिवंत नाही, आमचा ह्या जगाशी काही संबंध राहिला नाही. असे आम्हाला वाटले. ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ याची प्रचिती आली.

असार जीवित, केवळ माया असे सगळेच विझून गेले, अंधारात गढले, अचेतन झाले. सर्वच हरपले. संध्याकाळ होऊन नगरात नवलाख दिवे लागले होते, पण सूर्य मावळून गेला होता. आपल्याला असा अकस्मात मृत्यू यावा, रेंगाळू नये असे ते म्हणत, तसा तो आला. काळोखाच्या रजनीने सर्व घेरून टाकले होते. विषण्णतेची काजळी पसरली होती. युगान्त झाला होता.

बाबांची प्राणज्योत मालविली, पण लेखन रुपाने त्यांचा ज्ञानमय प्रदीप चिरकाल प्रज्वलित रहाणार आहे. लोकांना मार्गदर्शन आणि आनंद देणारा आहे.

लोकसत्ता (लोकरंग) २६ मार्च २०१७ त्यांच्या निधनानंतरचा त्यांच्यावरील लेख

व्रतस्थ आणि वृत्तस्थअंबरीश मिश्र (1)

“राजा मरण पावल्यावर इंग्लंडमध्ये ‘द किंग इज डेड, लाँग लिव्ह द किंग’ असा जाहीर पुकारा करण्याची एकेकाळी पद्धत होती. राजा मरण पावलाय आणि नव्या राजाला उदंड आयुष्य लाभो, असा या एका ओळीचा दुहेरी अर्थ. गोविंदराव  तळवलकर यांची जागा घेणारा कुणी आसपास दिसत नाही. तेव्हा, ‘तळवलकर इज डेड, लाँग लिव्ह तळवलकर,’ असं म्हटलं पाहिजे”.

तळवलकर म्हणजे जणू ‘राजा’ माणूस. संपादक हा रुबाबदार असतो हे तळवलकरांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं. त्यांच्यामुळे न्यूज रुमला व्यावसायिक शिस्त लागली. पेपरवाले गबाळे, पेपरची दुनिया गचाळ, डोकेफिरु संपादक, विसरभोळा उपसंपादक आणि बिलंदर रिपोर्टर हे बातमीदारीचं स्टिरीओटाईप चित्र तळवलकरां मुळे पालटलं. त्यांनी मराठी पत्रसृष्टीला दर्जा मिळवून दिला.

तळवलकर सर्वार्थाने पैलवानच होते. त्यांच्यात पीळ, लिखाणात पीळ. एका मोठ्या काळावर त्यांचा शिक्का होता. देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय देशात त्यांना मान होता. तळवलकरांनी स्वकष्टानं प्रतिष्ठा मिळविली आणि अखेरपर्यंत ती टिकवली. त्यासाठी योग्य ती पथ्ये पाळली. सभा संमेलनापासून दूर राहिले. झगमगाट, माणसांची गर्दी टाळली. वाचनाचं, लिखाणाचं व्रत पाळलं. सगळ्याच राजकीय नेत्यांची त्यांची मैत्री होती परंतु राज्यसभेसाठी कधी डाव टाकला नाही. ते आपल्या मानात जगले. स्वत:भोवती एक संरक्षक भिंत बांधून जगले. टीकाकारांची फारशी पर्वा केली नाही. बातमीदारीला व्यासंगाची जोड दिली म्हणूनच ते व्रतस्थ होते आणि वृतस्थही.

आपलं वर्तमानपत्र मराठी माणसांसाठी आहे. याचं एक सजग भान त्यांना अखेरपर्यंत होतं. विनाकारण इंग्रजीची झूल मराठीवर चढविली नाही. तळवलकरांच्यात एक Vanity होती ती त्यांना शोभून दिसत होती. जीवनसन्मुख होते ते. उत्तम खाण्यापिण्याची आवड आणि टापटिपीनं रहायची सवय. वार्ताहारांनी सुद्धा टापटिपीनं असलं पाहिजे असा त्यांचा कटाक्ष. Sense of Humour जबरदस्त. चेहर्‍यावरील एक रेषही न हालता विनोद सांगण्याचं त्यांच कसब भारी होतं.

‘न्यू थिएटर्स’ चे बंगाली सिनेमे हा त्यांचा सॉफ्ट स्पॉट (Spot) होता. त्यांच्यापाशी बुद्धीवैभव तर होतचं पण व्यवहार ज्ञानही भरपूर होतं. जगण्याची रग होती. वैचारिक शिस्त होती. अखेरपर्यंत लिहिते राहिले. विचारांची लढाई विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे यावर त्यांचा दृढविश्वास होता. ते खर्‍या अर्थाने भारतीय गणराज्‍याचे ‘राखणदार’ होते. अन् मुख्य म्‍हणजे त्‍यांचं कसदार दाणेदार सररशीत मराठी यापैकी आपल्‍याकडे काय आहे? का नुसतच मिरवणं आभासी!

(या संकलनात प्रस्तुत केलेले संगीत आणि गाणी ही, महान आणि निर्भीड वृत्तपत्रीय कारकीर्द, भारतीय आणि जगाच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून विकास पावलेल्या व्रतस्थ बुद्धिवंताचे, गोविंदराव तळवलकर ह्यांचे भावविश्व साकार करण्याचा हा प्रयत्न आहे)

वासंती गोखले- अंधेरी (पूर्व)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..