हा चित्रपट दस्तुरखुद्द अमिताभ आणि रेखाच्याही स्मरणात असणे तसे अवघड ! त्यांच्या कोठल्याही चार्टबस्टर / अमुक-तमुक कोटी घराण्यातील नाही. प्रेक्षकांचा फारसा प्रतिसादही नसलेला !
सुरुवातीला तद्दन नाटकी आणि वरवरची वाटणारी कथा अलगदपणे काळजाच्या दिशेने केव्हा प्रवास करू लागते हे अमिताभ महोदय जाणवूही देत नाही. अनेकार्थाने विसंगत जोडपं- महत्वाकांक्षी पत्नी (त्याला खतपाणी घालणारा प्रेम चोप्रा) आणि त्याकाळातील कर्ज वगैरे काढून पत्नीसाठी काहीतरी आणणारा नवरा,(तेही जमत नाही म्हणून फुलांच्या गजऱ्यावर भागवणारा मध्यमवर्गी) तिच्या नृत्याच्या आवडीसाठी, वस्तीची पर्वा न करता क्लासला उत्तेजन देणारा पती, गल्लीतल्या बेकार मिथुन चक्रवर्तींकडे कानाडोळा करणारा – अशा कितीतरी छटा अमिताभ लीलया पेलतो आणि आपल्याला MAKE -BELIEVE करण्यास भाग पाडतो. अविश्वसनीय अशा दोन कप्प्यांमध्ये अमिताभ भेटतो. पूर्वार्धातील वेगळा आणि उत्तरार्धातील वेगळा – आत्मविश्वास, देहबोली,आवाज आणि इतरही स्टाईल्स यामध्ये फरक दाखविणारा !
खरं -तर १९७५-७६ चा काळ त्याच्या अँग्री यंग मॅन च्या प्रतिमा -पूजनाचा ! येथे फक्त एक फाईट तो मारतो आख्ख्या सिनेमात ! माझ्या सारख्या अमिताभ भक्तालाही हा चित्रपट एक सुखद धक्का होता. मी नेहेमीच्या आणि आवडत्या अमिताभला बघायला गेलो होतो, पण परतलो एका विलक्षण, बहुमुखी प्रतिभेच्या अमिताभसमवेत ! या सद्गृहस्थाला काहीही म्हणजे काहीही शक्य आहे ही जाणीव घेऊन -त्याच्या नव्याने प्रेमात पडून ! कालांतराने त्याचे “सरकार राज, पा, ब्लॅक ” सारखे अभिनय बघून हा कलावंत किती UNDER- UTILIZED आहे हे पटले.
रेखाबरोबर अमिताभ पहिल्यांदा “दो अंजाने ” मध्ये दिसला. तिच्या भूमिकेला मर्यादित कंगोरे होते आणि स्क्रीन स्पेस ही कमी होती. तिच्या नृत्यकौशल्याला वाव देणारे प्रसंग होते. “कॅब्रे” शब्द मोठ्याने उच्चारायला बंदी असलेल्या गल्लीत तिला नृत्यांगना, चित्रपट कलावती होण्याची स्वप्ने पडत असतात आणि त्याला खतपाणी घालायला प्रेम चोप्रा सज्ज असतो. पती -पत्नीमधील विसंवाद टिपून तो अमिताभचा पहिला अपघात घडवून आणतो. गोष्ट इथे बहुमार्गी होते.
दुसऱ्या अपघातानंतर दोघांचे बदललेले जग दिसते. दोघांनाही हवे असलेले मार्ग भेटतात – त्याला श्रीमंती आणि तिला चित्रपट नायिका म्हणून प्रसिद्धी ! पण त्यापेक्षा खूप जास्त त्यांनी गमावलेलं असतं.
“मिठू ” नावाचा विसावा अमिताभला हळुवार, प्रेमळ ,CARING पित्याच्या भूमिकेत ठेवत असतो. आणि नेमका रेखाने तो दूर ठेवला असतो. त्याची किंमत तिच्या कल्पनेपल्याडची असते. गृहीत धरलेला मुलगा गमावण्याची पाळी आल्यावर तिला नुकसानीचा अंदाज येतो आणि शेवट सुखांत होतो.
“लूक छुपं लूक छुपं जाओ ना ” गाण्यातून नवा अमिताभ बघायला मिळतो -अपघाताने हरवलेला आणि अपघाताने सापडलेला “मिठू” त्या ५-६ मिनिटांच्या प्रसंगात भान हरपायला लावतो. हळव्या अमिताभमधलं मार्दव त्या प्रसंगाला (आणि चित्रपटालाही) एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.
किशोरचा दर्दभरा आवाज विसरणं केवळ अशक्य ! वादळी छवी असलेला अमिताभ हळुवार पिता म्हणून तितकाच उत्कट आणि खरा वाटतो.(कस्मे -वादे ,सिलसिला मधील अमिताभ येथून जन्मला असावा.) या गीतातील चर्चच्या पवित्र घंटा नात्याला पुन्हा ओळख देतात. पुलावरील पिता-पुत्राची दंगामस्ती भावून जाते.वडील कळायला तसा उशीर लागतो आणि वडील कळण्याचा प्रवास अवघडही असतो.(माझाही हा अनुभव आहे. “दो अंजाने” च्या काळात मीही माझ्या वडिलांना ओळखायला सुरुवात केली होती). म्हणून की काय हे भावबंध कथेला आणि चित्रचौकटीला अपूर्व अशा उंचीवर नेऊन ठेवतात.
त्याच्या समकालीनांपेक्षा अमिताभ येथे शिखरावर पोहोचतो. मुखवटे आणि प्रतिमा बदलणे एरवी अवघड (सन्माननीय अपवाद – धर्मेंद्र – ” चुपके चुपके” आणि शशी कपूर -“आ गले लग जा”), पण येथे ते सहज जमलंय.
रेखाला माहीत नसलेला इतिहास चलचित्राद्वारे दाखविण्यासाठी उत्पल दत्त येतो आणि बघता बघता हे CRANKY पात्र अमिताभशी समर्थ मुकाबला करतं. छोट्याश्या भूमिकेतील हा वस्तुपाठ उत्पल दत्तची भावी चाहूल ठरतो.
नात्यांची उकल अगदी छोट्याशा प्रसंगातून होणे हे कलाकृतीचे मानांकन असते.
” एवढं जाणणारा, वडिलांचा मित्र असूच शकत नाही” असं फादर अभि भट्टाचार्य म्हणून जातो आणि आपले डोळे नकळत झिरपतात.
नात्यांची फरफट झाली,त्यांच्यात अपघात झाले की मगच त्यांची खरी ओळख पटते.
पण तोपर्यंत आपण प्रगल्भ होतो,भावनिक स्थैर्याला अंगिकारतो. चित्रकृतीचं काम संपतं.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply