एक बातमी – ‘गेली कित्येक वर्ष डॉक्टर सांगत आले आहेत की कॉफी शरीराला घातक असते. पण आता नवीन संशोधनानुसार कॉफी शरीरावर सकारात्मक परिणाम घडवू शकते असे लक्षात आले आहे.’
कॉफी प्रमाणे तुम्ही हे असं आणखी बर्याच संदर्भात ऐकलं-वाचलं असेल. खरं म्हणजे यातून कोणताही खाद्यपदार्थ सुटणार नाही. कोणताही पदार्थ काही जणांना पोषक तर काही जणांना घातक असू शकतो. म्हणजे तो सर्वांनी वर्ज्य करण्यालायक असतो का? नाही. मग, काय खावे आणि काय नाही याबाबत योग्य सल्ला कोण देऊ शकेल? अर्थात, आहार तज्ञ. पण त्याआधी आपण आपल्या तब्बेतीच्या बाबतीत किती जाणून आहोत हे पाहिले पाहिजे. नुसत्या उलट सुलट बातम्या वाचून घाबरणे किंवा उत्साहित होणे बरोबर नाही. वर्षानुवर्षे संशोधन सुरु असते. नवनवीन निकाल जाहीर होत असतात. अनेक घटकांवर अवलंबून असणारे हे निकाल आपणास कितपत लागू पडतात याचा विचार करणे गरजेचे असते. काही पदार्थ, काही सवयी याविषयी शंका घेण्याची गरज नाही, उदा. सिगारेट, तंबाकू, दारु वगैरे. यावरील संशोधन दुष्परिणाम व काही चांगले फायदे याबद्दल सांगत असतात. या दोन्हीची उदाहरणे दाखविणे अवघड नसते. पण तरीही, वरील पदार्थ घातक म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
यंत्र बंद पडण्यास अनेक कारणांपैकी एखादे पुरते. माणसाचे शरीरही एखाद्या कारणाने जर्जर होऊ शकते. विशिष्ठ पदार्थ खाण्यामुळे एखादा अवयव कमकुवत होऊ शकतो, जीवावर बेतू शकते. आपला कमकुतपणा कशात आहे यावर, आपले लक्ष कशावर व नियंत्रण कोणत्या अन्न घटकावर असायला हवे हे ठरते. जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित. प्रत्येकासाठी कारण वेगळे असू शकते. ‘कोणताही अन्न घटक माफक प्रमाणात आहारात असावा’ असे वाक्य कुणीही फेकू शकतो. मात्र हे ‘माफक’ माझ्यासाठी व दुसर्यासाठी वेगळे असू शकते. म्हणजे माझ्यासाठी जी मात्रा माफक असेल ती दुसर्यासाठी अतिरेकी ठरू शकते, वा त्याला कमी पडू शकते. याच कारणासाठी आपल्या पाहण्यात येणारे संशोधनाचे निष्कर्ष बघून गांगरून जाऊ नये. एक सवय लावून घ्यावी, आपण स्वतः यात कुठे बसतो या प्रश्नाचे प्रमाणिक उत्तर मिळवावे. खालील दोन संशोधन अहवाल कसे दावे करतात पहा.
संदर्भ 1 – कॉफी पीणे चांगले – लघुकालिक स्मृती सुधारते, जाणीवा शाबुत राहतात, माफक कॉफी हृदयविकार दूर ठेवते, टाईप-2 च्या मधुमेहाची लक्षणं रोखते, नैराश्य येऊ देत नाही…
संदर्भ 2 – कॉफी पीणे चांगले नाही – व्यसन लागू शकते, निद्रानाश जडतो, रक्तातली साखर वाढते, हाडातले पेशीसमूह कमी होतात, लीवर खराब होते, कोलेस्टेरॉल वाढते, हृदयाचे ठोके वाढतात…
असे संशोधन बर्याच गोष्टींशी संबंधीत असते – देश, हवामान, लोकांची जीवनशैली व त्यांचा वयोगट, अभ्यासाचा कालावधी वगैरे. त्यामुळे याचे भान ठेवणे योग्य. आपल्या बाबतीत काय लागू पडते किंवा पडत नाही हे आपण सोयीस्करपणे ठरवतो. हा मनुष्यस्वभाव आहे. ‘मेंदूला विसंगती आवडत नाही.’ अशी विसंगती टाळण्यासाठी, म्हणजेच आपल्याला कॉफी पिण्याची सवय आहे की नाही त्याला अनुकूल निकालांचा आधार घेतला जातो. आणि हे सर्व आपल्या मनासारखे होत आहे ही धारणा बळकट कारण्यासाठी. याचा सकारात्मक परिणाम लाभदायक असतो. पण आपली सवय घातक वाटू लागल्यास भूमिका बदलण्याची तयारी असणे उत्तम. म्हणून ‘आपल्या शरीराची हाक ऐका’ व ठरवा कॉफी चांगली की वाईट. हेच इतर पदार्थांना सुद्धा लागू पडते.
मला कॉफी अतिशय प्रिय आहे व मी कॉफीचा मनापासून आस्वाद घेतो. घरी Tim Horton, Costa, Starbucks, Nero वगैरे ब्रँडच्या बीया असतात. पाहिजे तेव्हा दळून बनविलेली अशी कॉफी प्यायली की खालीलपैकी कोणताही रिपोर्ट मला स्थितप्रज्ञाप्रमाणे वाचता येतो.
संदर्भ –
1) 10 healthy reasons to drink coffee
Eat Well September 12, 2017
by Nikki Jong
Nikki Jong is an editor and writer based in San Francisco.
2) 8 Reasons Drinking Coffee Might Not Be Such a Good Habit After All
by David K. William
Leave a Reply