अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. भागवत चौधरी यांनी लिहिलेला हा लेख
माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील फुलगाव या छोट्याशा गावी २९/१०/१९५१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. वडील जेमतेम चौथीपर्यंत शिकलेले तर आईने शाळेचे तोंडच बघितलेले नव्हते. आमच्या गावाजवळ विल्हाळे म्हणून गाव आहे. तिथे तलाव खोदण्याचे काम चालू होते. कारण त्यावर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला होता. त्यावेळी तलावाच्या दुष्काळी कामावर आई जात होती. मी लहान होतो. आई एका मोठ्या हाऱ्यात (मोठी टोपली) मला ठेवून कामाच्या ठिकाणी घेऊन जात असे. शाळेत जाण्याची वेळ आली. गावातील प्राथमिक शाळेत ७ व्या वर्षी नाव घातले गेले. ती शेतकी शाळा होती. म्हणजे शेती हा विषय अभ्यासाला होता. चौथीत आल्यावर का कुणास ठाऊक परंतु डोक्यात सारखे विचार यावयाचे की, आपण मोठे झाल्यावर डॉक्टर व्हावयाचे. शाळेत असताना माझ्यावर महात्मा गांधी, पंडीतजी, लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा पगडा बसला होता. गावात साफसफाईची मोहीम मित्रमंडळींसह काढीत होतो. आपण लोकांसाठी काहीतरी कामे करावी असे वाटत असे. अभ्यासात माझी गती चांगली होती. गणितात मला नेहमी १०० पैकी १०० गुण मिळायचे. सहावीत असताना मला गणितात १०० पैकी ९८ गुण मिळाले. वडिलांना शेतातून येताना मास्तर भेटले व ते म्हणाले याला २ मार्कस् कमी मिळाले. झाले. वडील घरी आले. वडिलांनी २ मार्कस् कमी मिळाले म्हणून मला खूप मार दिला. शाळेत मला शिक्षकांचे खूप सहकार्य मिळायचे. माझे ड्रॉईंग चांगले होते. परंतु अक्षर वाईट होते. चौथीत असताना शिक्षक शाळेत न आल्यास मी आपणहून वर्गात उभा राहायचो व मुलांना शिकवीत असे. ही गोष्ट हेडमास्तरांना समजली. त्यांनी माझे कौतुक केले. त्यानंतर मी वरणगावला हायस्कूलमध्ये जाऊ लागलो.
जिला चौथीत तसेच सातवीत असताना मी मिडलस्कूल व हायस्कूल स्कॉलरशिपच्या परीक्षांना बसलो होतो. मी त्या दोन्ही परीक्षेत पास झालो. त्यामुळे मला पाचवीपासून सातवीपर्यंत मिडलस्कूल स्कॉलरशिप होती आणि आठवीपासून हायस्कूल स्कॉलरशिप मिळत होती. हायस्कूलमध्ये देखील एखादे शिक्षक गैरहजर असले म्हणजे मी वर्गात शिकवीत असे. घरी वातावरण शिक्षणाचे नसूनही माझी प्रगती चांगली होती. नातेवाईकांमध्ये माझ्या मावशीचे यजमान श्री. बलवंतराव चौधरी हे त्या काळात बी.कॉम. झालेले होते व ते शासनात मोठे अधिकारी म्हणून कार्यरत होते. परंतु त्यावेळी आमच्याच गावातील श्री. बाबूराव शिंदे यांच्या घरी मला आसरा मिळाला. त्यांचा मुलगा रमेश हा माझ्या वर्गात होता. त्यामुळे मी त्याच्याच घरी अभ्यास करीत असे. त्याची आई त्याला व मला गणित व सायन्स शिकवीत असे. माझ्याकडे शाळेची पुस्तके नसायची. मित्रांची पुस्तके अभ्यासापुरती आणायची, काही जुनी पुस्तके विकत घ्यायची. दोन ड्रेस असत. तेच धुवून घालावे लागत. मामाच्या मुलांचे कपडे व बूट नंतर वापरायला मिळायचे. तसेच सुटीत मी संत्र्यांच्या बागेत डोक्यावर पाणी घेऊन जात असे. त्याबद्दल मला मजुरी म्हणून ४ आणे दिवसाला मिळत. वडील जरी चौथी इयत्ता पास होते तरी त्यांची निमकी, पावकी, अडीचकी, दीडकी, औटकी तोंडपाठ असे. मी चौथीत असताना आईला अक्षर ओळख करून दिली. उच्चार शिकवले. तिच्या वयाच्या ६०-६५ व्या वर्षी नातीला (म्हणजे माझ्या मुलीला) आई इंग्रजी शिकवू लागली. मी हॉस्पिटलमधून आल्यावर काय म्हणायचे हे आई नातीला शिकवीत असे, ‘वेलकम पप्पा’, हॉस्पिटलला जायला लागल्यावर शिकवायची ‘बाय पप्पा, कम अर्ली.’ माझ्या मुलीवर तिच्या लहानपणी माझ्या आईने शिकविलेल्या काही गोष्टीमुळे चांगले संस्कार झालेले आहेत. ज्या हायस्कूलमध्ये मी शिकायला जायचो ते माझ्या गावाहून तीन कि.मी. अंतरावर होते. आठवी ते दहावीपर्यंत मी शाळेत पायीच जात असे. अकरावीत गेल्यावर वडिलांनी सायकल घेऊन दिली. असे असले तरी मी प्राथमिक शाळेत असो वा हायस्कूलमध्ये असो माझा पहिला नंबर कधीही चुकला नाही. स्कॉलरशिपच्या परीक्षेत तर मी भुसावळ तालुक्यात पहिला आलो. माझ्या सायन्स शिकण्याकडे विशेष कल होता. अकरावीत (एस.एस.सी.) मी शाळेत पहिला आलो व मला राष्ट्रीय शिष्यवृत्तीदेखील मिळाली.
एस. एस. सी. पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटत होते की, मी पॉलिटेक्निकला जाऊन डिप्लोमा करावा. म्हणजे आमच्या गावाजवळील वरणगावच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत लगेच नोकरी मिळेल व शिक्षण पूर्ण झाल्यावर तीन वर्षात पगार सुरु होईल व गावाजवळ झटपट नोकरी मिळले. कारण त्यावेळी वरणगावात ऑर्डनन्स फॅक्टरीचे काम सुरु झाले हाते. परंतु मला पुढे शिकायची इच्छा होती. डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न होते. म्हणून मी जवळगावला कॉलेजमध्ये प्री डीग्री सायन्सला अॅडमिशन घेतली. त्यावेळी प्रा. थत्ते रसायनशास्त्र शिकवायचे. ते मुलांमध्ये कधीच मिसळत नसत किंवा आपणहून कुणाला खास मदत देखील करीत नसत. आमची मिड-टर्म परीक्षा झाल्यावर त्यांनी मला बोलावले. ते माझ्या रसायनशास्त्राच्या पेपरवर खूष होते. ते मला आग्रह करू लागले की, मी बेसिक सायन्सला जावे. नॅशनल टॅलेंटच्या परीक्षेला बसावे. ते त्यासाठी मला मदत करायला तयार होते. ते कधीही नाहीतर अशाप्रकारे कुणाला मदत करीत नसत. परंतु मी त्यांना सांगितले की, मला मेडिकलला जायचे आहे. त्यांनी मला पुन्हा ६ महिन्यांनी बोलावले व सांगितले की, तुझी पेपर सोडविण्याची, उत्तर मांडण्याची पद्धती फारच चांगली आहेत. तू बी.एस्सी., एम.एससी. होऊन पीएच. डी. करू शकतो. म्हणजे तुला डॉक्टरेट मिळेलच. परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कारण माझ्यापुढे डॉ. अरुण पाटील यांचा आदर्श होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मलादेखील मेडिकलला जायचे होते. मला प्री. डिग्री सायन्सला ८९ टक्के गुण मिळाले. मग मी मुंबईला इंटर सायन्सला अॅडमिशन घ्यायचा विचार केला. कारण मुंबईला मेडिकल कॉलेजेस चांगली आहेत व आपण एक वर्ष तिथे राहिलो तर मार्कांचा फरक पडेल अशी माझी मनाची धारणा होती. माझे मामा, डॉ. व्ही. सी. राणे हे त्यावेळी आय. आय. टी., पवईला केमिकल इंजिनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख होते. मी त्यांच्याकडे आलो. ते मला इंजिनियरिंगसाठी आग्रह करीत हाते व त्या अनुषंगाने इंटर सायन्सला रूईया, रूपारेल कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी आग्रह करू लागले. पण मला मेडिकललाच जावयाचे हे मी त्यांना स्पष्ट केले व सांगितले की, ‘मी आय. आय. टी. च्या प्रवेश परीक्षेला देखील बसलो नाही.’ मामांचे मित्र त्यावेळी रूपारेल कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यामुळे माझी अॅडमिशन तिथे होणारच होती. परंतु त्यांच्याकडे होस्टेलला जागा नसल्यामुळे शेवटी जोगेश्वरीच्या ईस्माईल युसुफ कॉलेजमध्ये इंटर सायन्सला अॅडमिशन घेतली. कारण तिथे होस्टेलमध्ये मला जागा मिळाली. खरे पाहू केले तर रूईया, रूपारेल कॉलेजच्या मानाने ईस्माईल युसुफ कॉलेजचा शिक्षणाचा दर्जा खालचा होता. परंतु होस्टेलची सुविधा असल्यामुळे मला त्याच कॉलेजला अॅडमिशन घ्यावी लागली. इंटर सायन्सचा निकाल लागला. त्या कॉलेजमध्ये मी पहिला आलो होतो आणि विद्यापीठात १६ वा आलो होतो. त्यामुळे मला मुंबई विद्यापीठातील कोणत्याही चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकत होता. ज्या दिवशी इंटरव्ह्यू होते त्या दिवशी मुंबईला प्रचंड पाऊस झाला होता. रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत होती. सायनच्या मेडिकल कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू होता. सकाळच्या ९ ते १२ च्या सत्रात २५ व दुपारच्या सत्रात २५ विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू होणार होते. मला त्या दिवशी कॉलेजमध्ये पोहोचायला दुपारचे पावणेचार वाजले. मला वाटले की, आता माझी अॅडमिशन गेली. परंतु डॉ. अरूण पाटील माझ्याबरोबर होते. त्यांनी सांगितले की, तू मेरिटमध्ये आलेला आहेस. काळजी करू नकोस. तुझी अॅडमिशन होईल. चौकशी केली तेव्हा कळले की, २५ विद्यार्थ्यांचे इंटरव्यू झालेत त्यापैकी २३ विद्यार्थ्यांनी के.ई.एम.च्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली होती. कारण त्यावेळी के.ई.एम. चे मेडिकल कॉलेज हे मुंबईतील नंबर वनचे कॉलेज गणले जात होते. इंटरव्ह्यूसाठी येणारे एक डॉक्टर ४ वाजता आले. त्यामुळे माझा इंटरव्ह्यू ४ वाजता झाला. डॉ. अरूण पाटील त्यावेळी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. त्याशिवाय जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये प्रॅक्टिकलचा मोठा अनुभव मिळतो हे मला समजले होते. म्हणून मी देखील तेच कॉलेज निवडले. अशा रीतीने मी शेवटी ग्रँट मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी झालो. त्यावेळी कॉजेलमध्ये रॅगिंग चालायचे. मला ते नवीन होते. ग्रामीण भागातून आलेलो होतो त्यानंतर इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये केवळ एकवर्ष होतो. त्यामुळे शहरी वातावरणाची एवढी जाण आलेली नव्हती. जिथे रॅगिंग चालले होते तिथे जाऊन मी उत्सुकतेने बघू लागलो. डॉ. अरुण पाटील यांनी व त्यांच्या मित्रांनी मला होस्टेटला परत पाठवले. त्यामुळे माझी रॅगिंगमधून सुटका झाली. कॉलेजमध्ये मी वयाने व उंचीने लहान असल्यामुळे सर्व सिनीयरचे मित्र मला सांभाळून घेत. माझा पूर्वीचा स्वभाव खूपच एकलकोंडा होता. घरची गरिबी असल्यामुळे सतत पैशाची अडचण असायची. माझ्यापुढील प्रश्न त्यामुळे सतत यक्षप्रश्नच असत. मेरीटमध्ये असूनही घरची गरिबी असल्यामुळे पुस्तके घ्यायलादेखील पैसे नसत. त्यामुळे लायब्ररी व मित्रांवर अवलंबून राहावे लागत असे. मला नॅशनल स्कॉलरशिप चालूच होती. मोठे भाऊ थोडी मदत करीत. तरी माझे भागत नव्हते शेवटी बँक ऑफ इंडियाकडून शैक्षणिक कर्ज काढले. होस्टेलचे कॉस्मोपोलिटकल वातावरण, मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा मोकळा स्वभाव यामुळे माझ्या स्वभावात हळूहळू बदल होत गेला व मूळच्या हेकेखोर स्वभावाला आपोआप मुरड पडत गेली. होस्टेलच्या वातावरणात मी हळूहळू रूळत गेलो. मी बोलका झालो. सहा महिन्यात मी सर्वांना बरोबर घेऊन अभ्यास करू लागलो. ग्रामीण भागातून आलेले, दलित विद्यार्थी यांना शिकवू लागलो. Anatomy व Physiology हे विषय मी बरोबरीच्या विद्यार्थ्यांना शिकवीत असे. एकदाचे एम.बी.बी.एस. चे पहिले वर्ष संपले. एम.बी.बी.एस. च्या पहिल्या वर्षाला असताना माझ्या पायात चप्पल असायची. कारण बूट विकत घेणं मला पैशांच्या अभावी शक्य होत नव्हतं. एक प्राध्यापक अतिशय कडक होते. एके दिवशी त्यांनी मला बोलावले व सांगितले की, कॉलेजला येताना दररोज बूट घालून येत जा. तसेच दररोज दाढी करून येत जा. मला त्यावेळी दाढी पण नीट आलेली नव्हती. मी माझी खरी परिस्थिती त्यांना सांगितली. त्यांनी तो मनात राग धरला व मला ते त्रास देऊ लागले. त्यांनी मला कमी मार्कस् दिले तरीदेखील मला ७० टक्के मार्कस् मिळाले. शेवटी मी मेट्रो सिनेमाजवळून रु.१५ चे बूट आणले. माझ्या प्राध्यापकांना मी होस्टेलवर इतर विद्यार्थ्यांना शिकवतो हे समजल्यावर बरे वाटले. त्यांनी मला शाबासकी दिली. एम.बी.बी.एस. चे दुसरे व तिसरे वर्ष मित्रमंडळींच्या सान्निध्यात व सहकार्याने आनंदात गेले. शेवटचे वर्ष सरत आले होते. मी पास झालो. मला एम.बी.बी.एस. झाल्यावर गावाकडे जाऊन प्रॅक्टिस करावी असे वाटत होते. त्यावेळी प्रत्येक रविवारी आम्ही कँप घेत असू. डॉ. व्ही. सी तळवलकर कुटुंबीय त्यासाठी खूप मदत करीत. मानवतेच्या दृष्टिकोनातून सतत विचार करणारे ते कुटुंब. दर रविवारी चिरनेर, पनवेल आणि आजूबाजूच्या ठिकाणी कँपसाठी आम्हाला नेण्या-आणण्याची जबाबदारी तळवलकर कुटुंब करीत असे. कँपमधून पेशंट तपासणे, त्यांना औषधे देणे या सारखी सामाजिक कामे आम्ही करीत असू. नाहीतरी मी सामाजिक बांधिलकी लहानपणापासूनच मानत आलेलो होतो.
एम.बी.बी.एस. झाल्यावर डॉ. नागोरी यांच्याबरोबर इंटर्नशिप केली. त्यांच्याबरोबर मी टेनिसदेखील खेळायचो. एम.एस.साठी मी काय घ्यावयाचे अशी चर्चा चालू झाल्यावर त्यांनी मला Robs & Smith चे १६ व्हॉल्यूम्स (खंड) वाचायला दिले. मी ते एक महिन्यात वाचले व निर्णय घेतला की मी जनरल सर्जरीला न जाता नाक, कान, घसा (ई.एन.टी.) सर्जरीला पसंती दर्शवली. जनरल सर्जरीत आव्हानात्मक काही असत नाही. ई.एन.टी. सर्जरी ही Micro सर्जरी आहे. ती शास्त्रीयदृष्ट्या अतिशय किचकट सर्जरी असून त्याला खूप मागणी आहे. मला ई.एन.टी.मध्ये एम.एस. केल्यावर प्लॅस्टिकसर्जरी करावयाची होती. ग्रामीण भागातील सहा महिन्यांची इंटर्नशिप डहाणूला केली. त्या कालावधीत त्या भागातील लोकांचे शारीरिक आजारांचे वैयक्तिक प्रश्न सोडवले. तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसरचा त्याला विरोध होता. ते आम्हाला म्हणत, ‘इथे राहू नका, मी तुम्हाला सांभाळून घेईन.’ परंतु तिथे राहण्याची उत्तम सोय होती. स्वच्छ समुद्र किनारा, वातावरण चांगले व ग्रामीण लोकांचे आरोग्य दुरुस्तीसाठी आपण काहीतरी करावे ही आमची मनीषा. नंतर कळले की, आमच्या कामामुळे लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. लोक त्या डॉक्टरांचा अनुभवाची आमच्याशी तुलना करू लागले. तरुण डॉक्टर आम्हाला चांगले तपासतात, चांगले औषध देतात. आमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती चांगला आहे. त्यामुळे जनमानसातील आमची प्रतिमा उजळली व त्या मेडिकल अधिकाऱ्यांचे वैयक्तिक धंदे असल्यामुळे त्यांना आम्ही तिथे मुक्कामी राहून काम करतो हे आवडत नव्हते. शेवटी त्यांचे खरे रूप उघडकीस आल्यावर त्यांची गच्छन्ती झाली. त्यानंतर शहरी भागातील इंटर्नशिप जे. जे. हॉस्पिटलमध्ये करावयाची होती. त्यावेळी डॉ. बी. जे. वकील यांच्या युनिटमध्ये काम करायला मिळाले. ते स्वतः खूप मेहनती, कष्टाळू होते. त्यांच्या टिटॅनस व गॅस्ट्रोएन्ट्रायटिस या वॉर्डात काम केले. त्यावेळी त्यासंदर्भात काही लेख देखील लिहिले.
इंटरर्नशिप संपल्यावर एम. एस. साठी रजिस्ट्रेशन मिळाले. त्यानंतर ई. एन.टी.साठी एम.एस. करायला सुरुवात झाली. डॉ. आपटे व डॉ. हकीम यांच्याकडे खूप शिकायला मिळाले. हॉस्पिटलमध्ये काम करावे लागत असे. त्यावेळी मी १८/२० तास काम करीत असे. वॉर्डात २० कॉटस् असल्या तरी ५० रूग्णांची सोय केली जात असे. त्यामुळे अभ्यासाला वेळच मिळत नसे. पैशांच्याबाबत दुष्काळ कायमच होता. त्यावेळी डॉ. भाल पाटील यांचा मुलगा डॉ. पराग आम्हाला ज्युनियर होता. तरीदेखील तो माझा चांगला मित्र होता. त्याला माझ्याबद्दल फार अभिमान वाटायचा. तो नेहमी म्हणावयाचा, ‘अरे किती वाईट आर्थिक परिस्थितीशी टक्कर देत तुम्ही एम.एस. केले आहे. मला घरचे उत्तम वातावरण, आर्थिक सुबत्ता असून एम. सीएच होता येत नाही.’ मेडिकल फिल्डमधील काही दादा लोकांची दादागिरी प्रसिद्ध होती. त्यांच्या कुटुंबियांशिवाय इतरांना या स्पेशलायझेशनच्या क्षेत्रात शिरकावच मिळू नये हा त्यांचा दुष्ट डाव होता. त्यामुळे प्रत्येक वर्षी एम.सी.एच. च्या इंटरव्ह्यूला तो गेला की, त्याला काहीही प्रश्न न विचारता ते एवढेच म्हणायचे, ‘डॉ. पाटील, कम नेक्स्ट ईयर, ‘ डॉ. परागने ही गोष्ट फार सिरीयस घेतली. कारण यापूर्वी दोन वर्ष त्याला असेच परत पाठवले होते. त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या व त्या विमनस्क मनस्थितीत त्याने आपले आयुष्यच संपवले. या क्षेत्रात अशा विकेट पडतच असतात. पण मी पाहिलेली ही पहिली विकेट.
माझी पहिली हाऊसमनशिप डॉ. आपटे यांच्या हाताखाली झाली. त्यांनी मला Sub Mandual Gland चे ऑपरेशन करायला लावले. माझ्यासाठी ते आव्हान होते. मी ते स्विकारले व ऑपरेशन करू लागलो. ते पाहण्यासाठी सिनीयर डॉक्टर्स हजर होते. ते बघण्यासाठी डॉ. ओसवाल हेदेखील त्यावेळी हजर होते. ते आजदेखील मला त्यामुळे चांगले ओळखतात. आज ते लेसर सर्जरीमध्ये जगातील तज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. आपटे व डॉ. पी.ए. शहा यांच्या सान्निध्यात कॅन्सर सर्जरी करण्याकडे माझा कल जाऊ लागला. मला ती उत्सुकता निर्माण झाली. दुसरी हाऊसमनशिप मी डॉ. व्ही. एन. श्रीखंडे यांच्या हाताखाली केली. त्यांच्यामुळे मला थायराईड, पॅरारिड तसेच जनरल सर्जरीचा भरपूर अनुभव मिळाला. तसेच सर्जरीतील फिलॉसॉफीची बैठक मजबूल झाली. डॉ. श्रीखंडे हे सर्जरीतली माझे आदर्श आहेत. डॉ. आपटे Anatomy मध्ये तज्ञ होते. त्यांच्यामुळे Surgical Anatomy चे माझे ज्ञान खूप वाढले. मी वेळात वेळ काढून अॅनॉटॉमीच्या विभागात जाऊन dissection करीत असे. यावेळी पदवीपूर्वच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा माझा नियम चालूच होता. त्यावेळी ‘मार्ड’ चा प्रतिनिधी म्हणून देखील मी काम करीत असे.
त्यानंतर मला रजिस्ट्रारची जागा जी.टी. हॉस्पिटलमध्ये मिळाली. त्यावेळी मी ‘मार्ड’ या डॉक्टरांच्या संघटनेचा सचिव झालो होतो. त्यावेळी मी डॉ. एम. एम. मेहता यांच्या युनिटला जोडला गेलेलो होतो. डॉ. मेहता कान, नाक व स्कोपीची ऑपरेशन्स भरपूर करीत. त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले. परंतु पहिले ३ महिने आमचे छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद व्हायचे. मी त्यांना सांगितले की, मला डोके व मानेची ऑपरेशन्स करावयाची आहेत. डॉ. मेहता म्हणावयाचे की, ‘अशी ऑपरेशन्स अद्याप मी केली नाहीत त्यामुळे तू करू नकोस. कारण मला त्याचे ज्ञान नाही.’ त्यांच्याशी मी वाद घालायचो की, तुम्ही स्वत: वाचा, स्वतः शिका, मला शिकवा. ते चिडायचे. ते म्हणावयाचे, ‘मी तुझा बॉस आहे की तू.’ मी त्यांना सांगावयाचो की ‘तुम्हीच माझे बॉस आहात. परंतु मला डोके व मानेची शस्त्रक्रिया करावयाची आहे, ते शिकायचे आहे. ते तुम्ही मला शिकवलेच पाहिजे.’ एकदा एक किचकट केस आली होती. जबड्याच्या कॅन्सरचे ते ऑपरेशन होते. डॉ. मेहतांनी मला विरोध केला. मी हट्टाला पेटालो. डॉ. मेहता चिडलेले होते. ते त्यांच्या केबिनमध्ये या संदर्भातील वेगवेगळे पेपर्स, लेख व पुस्तके चाळत बसले होत आणि मोठ्या कष्टाने त्यांनी मला शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. मी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. ऑपरेशनच्या कालावधीत डॉ. मेहता यांनी तीन वेळा फोन करून चौकशी केली ऑपरेशन झाल्यावर डॉ. मेहता म्हणाले, ‘ पेशंटला आय.सी.यू. मध्ये ठेवू या.’ मी त्याला विरोध केला. त्यांनी मला कारण विचारले. तेव्हा मी सांगितले की, ‘हा माझा पेशंट आहे. आय.सी.यू.मध्ये ठेवल्यावर तेथील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील. वॉर्डात ठेवल्यावर पेशंटची सर्व जबाबदारी माझी राहील.’ मी पेशंटची सर्व काळजी घेत होतो. मी वॉर्डात त्याच्याजवळच बसून राहात असे. एकदा तर रेल्वे गाड्यांचे प्रचंड गोंधळ होते. मी कल्याणला राहात होतो. जे. जे. मध्ये डॉक्टरांचा संप चालू होता. मी कल्याणहून भिवंडीला गेलो. तेथून बसने मुंबई सेंट्रलला आलो. तेथून टॅक्सीने जे.जे. हॉस्पिटलला पोहोचलो. त्यामुळे मला वॉर्डात पोहोचायला १२ वाजले. डॉ. मेहता हे ऑनररी डॉक्टर असल्यामुळे ते उशिराच येत. पण ते त्या दिवशी ११ ।। वाजताच वॉर्डात आले. मी तिथे नाही हे कळल्यावर त्यांनी सुपरिटेडेंटकडे माझी तक्रार केली. त्यांनी वस्तुस्थिती डॉ. मेहतांना सांगितल्यावर ते शांत झाले. अशीच दुसरी एक घटना घडली. मी माझ्या कामात नेहमी काटेकोर असे. त्यावेळी जे.जे.मधील आर.एम.ओ. चा संप चालू होता. मी कामावर होतो. पण त्या दिवशी मला डायरिया झालेला होता. मी सुपरिटेंडेंट साहेबांना आल्यावर त्याबद्दल कानावर घातले होते की, मी अशावेळी क्वार्टरवर जात जाईन. अन्यथा, मी वॉर्डात असेनच. डॉ. मेहता राऊंडला आल्यावर मी दिसत नाही हे पाहिल्यावर त्यांचे पित्त खवळले. त्यांनी माझी तक्रार केली. परंतु सुपरिटेंडेंट साहेबांना मी कल्पना दिलेली असल्यामुळे त्यांनी डॉ. मेहतांना समजावले आणि सांगितले की ‘डॉ. चौधरी अशा परिस्थितीत एक दिवसांची रजा घेऊन घरी राहू शकले असते परंतु हॉस्पिटलची परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःला डायरियाचा त्रास होत असूनही ते काम करीत आहेत ही गोष्ट त्यांच्यासाठी कौतुकाची आहे.
मला थायराईडची ऑपरेशन्स करायची होती. डॉ. मेहता ती मला करू देईनात. शेवटी डॉ. श्रीखंडे यांनी डॉ. मेहतांना सांगितले की, डॉ. चौधरी सिन्सियर असून त्याला थायराईडचे ऑपरेशन करू द्या. त्याला काही अडचण आली तर मी मदतीला येईन आणि काही प्रॉब्लेम निर्माण झालाच तर त्याची जबाबदारी मी घेईन, जणूकाही ते ऑपरेशन मीच केले आहे असे समजून. त्यानंतर डॉ. मेहतांनी मला थायराईडची ऑपरेशन्स करायची पूर्ण परवानगी दिली. आता डॉ. मेहतांना माझ्या कामाबद्दलच्या बांधिलकीची पूर्ण ओळख पटली व त्यांनी मला Microscope, Drill Machine, Suction Machine, Hand Pieces & Drill Bitts आणून दिले व बिनधास्त काम करायची मुभा दिली. मी शनिवारी, रविवारीदेखील खूप काम करू लागलो व त्यांना त्याचे रिझल्टस् दाखवित असे. त्यामुळे त्यांचा माझ्यावर खूप विश्वास बसला. आतादेखील ते माझ्या कायम संपर्कात आहेत. अर्थात मी देखील सतत त्यांना फोन करीत असतो. परंतु समजा कामाच्या गडबडीमुळे मी फोन करायला विसरलो तर ते मला फोन करतात. मी रजिस्ट्रार असताना समजा एम. एस. च्या लेक्चरला बसलो असलो तर ते स्वत: माझे रजिस्ट्रार म्हणून फोन घेत व अशा रीतीने ते मला मदत करीत.
माझी ३१/१२/१९७८ रोजी एम. एस. ची प्रॅक्टिकलची परिक्षा संपली. दुसऱ्या दिवशी डी. एम. ई. आर. चे संचालक डॉ. अंजनेल्यू यांनी ऑफिसमध्ये मला बोलावले व सांगितले की, आंबेजोगाईला नवीन मेडिकल कॉलेज उघडले आहे तेथे ‘रीडर’ चे पद त्यांनी मला देऊ केले होते. मी. एम.एस. विशेष प्राविण्य मिळवून पास झालो होतो. मला प्लॅस्टिक सर्जरी करायची होती. पण मला रजिस्ट्रेशन मिळत नव्हते. शेवटी वरळीच्या ईएसआयएसमध्ये नोकरी पत्करी. त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करू लागलो. त्यापूर्वी मी के.ई.एम. हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चररच्या जागेसाठी अर्ज दिला होता. परंतु इंटरव्ह्यूच्यावेळी त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, तुम्ही आमच्या कॉलेजमधून शिकलेले नाही, म्हणून तुम्हाला उत्तम मार्कस् असून इथे लेक्चररची जागा मिळणार नाही. ऑक्टोबर १९७९ ते १९८३ पर्यंत मी लेक्चचर म्हणून डॉ. आपटेंच्या बरोबर काम करीत होतो. वेगवेगळी जर्नल्स वाचून मी सर्जरी करू लागलो. नागपूरला मला असोसिएट प्रोफेसर म्हणून कामाची ऑफर आली. परंतु मी तिथे गेलो नाही. Neuro Surgery, Plastic Surgery, ENT, Head & Neck Surgery करू लागलो. मी एक टीम तयार केली व किचकट ऑपरेशन्स करू लागलो. मोठमोठ्या हॉस्पिटलने परत पाठविलेल्या कॅन्सरच्या रूग्णांची मी ऑपरेशन्स करू लागलो. शिकवण्याचा पेशा पत्करल्यामुळे शासनाने दिलेले माझे शैक्षणिक कर्ज माफ झाले. डॉक्टरांचा पेशा हा पवित्र पेशा आहे. शिकवण्याचे कार्यदेखील पवित्र कार्य आहे. त्यामुळे डॉक्टर झाल्यावर शिक्षकी पेशा स्विकारल्यामुळे मला दुप्पट पवित्र पेशा मिळाल्याचे समाधान मिळाले. मी जे.जे. हॉस्पिटलमध्ये डोके, मानेच्या कॅन्सर सर्जरीवर वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. तसेच दरवर्षी एक याप्रमाणे भारतातील प्रत्येक राज्यातील ईएनटी डॉक्टरांना बोलावून परराष्ट्रातील काही डॉक्टर्ससह ६ दिवसांचे वर्कशॉप्स घेऊ लागलो. १० ते १२ वर्षे मी असे वर्कशॉप्स घेत होतो. हे प्रशिक्षण मिळवलेले डॉक्टर्स स्वतंत्ररित्या आता ऑपरेशन्स करू लागले आहेत. आमच्या कार्याची जाण ठेवून कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (एनजीओ) या संस्थेने एम.एस. केलेल्या डॉक्टरांना हेड नेक ऑनकॉलॉजीचे २ वर्षांचे ट्रेनिंग घेण्यासाठी २ फेलोशिप दरवर्षी सुरू केल्यात.
न्युरोसर्जरी करू लागल्यावर Base Scrull Surgery करायला सुरूवात केली. यासाठी मी कुठेही परदेशात प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो नव्हतो. अशीच एक “Base Scrull Surgery” करीत असताना साऊथ हॅम्पटन युनिर्व्हसिटीचे प्रा. बेरी इव्हान्स यांनी मला बघितले होते. मी एकटा ती सर्जरी करीत होतो. मदतीला कुणीही न्युरोसर्जन नव्हता.
प्रा. इव्हन्स यांनी मला ताबडतोब सिनीयर रजिस्ट्रारची जागा त्यांच्या विद्यापीठात देऊ केली. त्यासाठी यु.के.च्या बोर्डाच्या परीक्षेची अट माझ्यासाठी नव्हती. परंतु मी त्यांची ऑफर स्विकारली नाही कारण मला तिथे काम करायचे नव्हतेच. मला खरे पाहू केले तर Specialization of reconstructive Surgery of Head, Neck & ENT.’ करायची होती. मी लेक्चरर असताना एमसीएच प्लॅस्टिक सर्जरीसाठी १९८४ मध्ये प्रयत्न केला. मला संचालकांनी ती जागा द्यायचे नाकारले. खरे पाहू केले तर मी एकटा त्यासाठी प्रयत्नशील होतो. मी मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांमार्फत प्रयत्न केले. त्यांनी माझे नाव मान्य करून पाठवले. परंतु तरीदेखील मला एमसीएच ला अॅडमिशन देण्यात आली नाही. मेडिकलच्या क्षेत्रात मागे मी नमूद केल्याप्रमाणे तुमचा कोणी गॉडफादर असल्याशिवाय केवळ मेरिटवर काही महत्त्वाच्या जागा अथवा स्पेशलाझेशनच्या कोर्सेसला प्रवेश मिळत नाही. हाच अनुभव मला ऑनररीची जागा मिळविण्यासाठी देखील झाला. १९८९ मध्ये शेवटी मला जी. टी. हॉस्पिटलमध्ये ते पद मिळाले.
मी नंतर Head, Face, Neck Vascular Tumors injuries ची air passage सर्जरी करू लागलो. नंतर मी व्हाईस बॉक्सचे ऑपरेशन्स नियमितरित्या करू लागलो. मी भरपूर काम करीत होतो. त्यामुळे भारतातच काय परदेशातदेखील माझे नाव झाले व ठिकठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख होऊ लागला. आयुष्यात मला कोणतीही गोष्टसहजासहजी मिळालेली नाही. प्रत्येक वेळी ती मिळविण्यासाठी मला लढा द्यावा लागला. काही वर्षे परदेशात गेलो होतो. परंतु नंतर मी ठाण्याच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ईएनटी विभागप्रमुख म्हणून काम करू लागलो. तसेच त्यांच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवू लागलो. तिथे एक फार मोठी केस माझ्याकडे आली. मी त्या रुग्णाबद्दलचे मला सांगणाऱ्या मित्राला पेपर बघितल्यावर ऑपरेशन करता येईल असे सांगितले. त्या रुग्णाला डोक्याला ट्यूमर झालेला होता. परंतु त्याला २-२ ।। वर्षे इकडून तिकडे डॉक्टरांकडे फिरवण्यात आले. भरपूर खर्च केला त्या रूग्णाने. शेवटी पुन्हा तो सर्व पेपर्स, एमआरआय रिपोर्टस् घेऊन ठाण्याच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात घेऊन माझ्याकडे आला. मी त्याला सांगितले, ऑपरेशन किचकट आहे. पेशंट ऑपरेशन टेबलवरदेखील जाऊ शकतो अथवा यश लाभले तर तो जगेल देखील. पूर्ण विचार करून मला सांगा. तो रुग्ण १ तासानंतर लगेच मला भेटला. खर्चाबद्दल त्याने विचारले, मी त्याला सांगितले की, १.४० लाख रूपये खर्च येईल. तो तयार झाला. तो म्हणाला की, ‘डॉक्टरसाहेब, तुम्ही माझे कागदपत्र ज्या पद्धतीने सिरीयसली बघितलेत ते बघून माझी खात्री पटली की, तुम्हीच फक्त मला वाचवू शकाल. दुसरी गोष्ट मला दुसऱ्या डॉक्टरांनी २६ लाख रूपये खर्च येईल असे सांगितले होते. डॉक्टर तुम्ही मला केवळ २ महिन्याचे आयुष्य वाढवून द्या. मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. माझे बाजारातून १।। कोटी रूपये येणे आहे. मी ते वसूल करून माझ्या कुटुंबाची तेवढ्या अवधीत सोय करू शकेन. मी त्याचे ऑपरेशन केले. सकाळी ८ ते रात्री ११ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ऑपरेशन चालू होते. त्याने मला काही पैसे देऊ केले. मी सांगितले, ‘तुम्हाला मदत करायची असेल तर माझ्या ईएनटी युनिटसाठी मशिन्स घेऊन करा.’ ऑपरेशनच्या नंतर १ वर्षाने तो भेटायला आला. म्हणाला की, डॉक्टर माझा पहिला वाढदिवस आहे. अशा कितीतरी केसेस आयुष्यात आल्या वयस्कर मंडळी पाया पडू लागतात तेव्हा वाईट वाटतं. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी हसू अपार समाधान देऊन जातं.
आता मी ठाण्याच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधून निवृत्त झालोय. एक भव्य हॉस्पिटलचे माझे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. उत्तम ऑपरेशन थिएटर, रूग्णांसाठी स्वतंत्र खोल्या, जनरल वॉर्ड, माझ्या विषयाची अपटुडेड लायब्ररी, ७ । । टन क्षमतेचे इन्व्हर्टर (ऑपरेशन थिएटर व सर्व खोल्यांमध्यील एअर कंडिशनर्ससाठी) असे अद्ययावत हॉस्पिटल मी उभे केले आहे. माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सहभागी होणाऱ्या व मला वेळोवेळी योग्य त्या सूचना करणाऱ्या माझ्या सहधर्मचारिणीच्या वियोगात माझं स्वप्नशिल्प मी उभारण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर जे काही करता आले त्यासाठी मी परिस्थितीशी झुंज देतच आलो आहे. परंतु कधीतरी बेसावधक्षणी मन विषण्ण होतं आणि वाटू लागतं जी मूल्यं मी आयुष्यभर जपलीत त्याचं मला काय फळ मिळालं. कट प्रॅक्टीसला मी कायम विरोध करीत आलो. सध्याच्या व्यवहारी जगात त्यामुळे मला खूप आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. आता शासनाने त्याविरुद्ध पाऊले उचललेली आहेत. डॉक्टरी पेशा हा सामाजिक बांधिलकी जपण्याचा आहे. परंतु आजुबाजुच्या जगातील काही उदाहरणे ऐकल्यावर लक्षात येतं आपण या जगात जे वागलो ते चुकीचे का आहे? ही सल कधी कधी मला छळते. परंतु माझे विचार पक्के आहेत व माझी वाटचाल कटप्रॅक्टीसच्या विरुद्धची राहणार आहे.
-डॉ. भागवत चौधरी
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply