कोणत्याही परिस्थितीत आपण डॉक्टर व्हायचेच हे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. वैद्यकीय शिक्षण फार अवघड असते हे तिला घरातील लोकांनी व इतरांनी सांगून पाहिले. मात्र ध्येयापासून ती किंचितही ढळली नाही. कठोर परिश्रमाच्या आधारे सर्व अडथळे पार करून ती अखेर डॉक्टर झाली व नंतर रोगाबाबत तिने असे काही संशोधन केले की, अनेक मोठ्या रोगांवरती उपाय शोधणे सहज सोपे झाले. तिच्या संशोधनाबद्दल तिला १९४७ साली नोबेल पुरस्कारही मिळाला. गर्टी थेरेसा कोरी (Gerty Theresa Cori) हे तिचे नाव. हा नोबेल पुरस्कार तिचे पती कार्ल कोरी तसेच अर्जेंटिनाचे वैज्ञानिक बर्नार्डो ए हाऊसे यांच्यासह तिला विभागून देण्यात आला होता.
गर्टी थेरेसाचा जन्म १५ ऑगस्ट १८९६ रोजी ऑस्ट्रियातील प्राग शहरात झाला. तिचे वडील एका चिनी कारखान्यात व्यवस्थापक होते. घरची आर्थिक स्थिती उत्तम होती. गर्टीचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले व वयाच्या दहाव्या वर्षी तिला पब्लिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेच तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले व पूर्ण करून दाखविले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच तिची व कार्ल कोरीची ओळख झाली व नंतर दोघेही एकमेकांचे जीवनसाथी बनले. पहिल्या महायुद्धाच्या काळात केवळ ऑस्ट्रियन असल्यामुळे कोरी दाम्पत्याला प्राग शहर सोडावे लागले व दोघेही व्हिएन्नामध्ये आले. एका बालरुग्णालयात दोघांनीही काम सुरू केले. मात्र वैद्यकीय संशोधनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून दोघेही अमेरिकेत आले व त्यांनी विविध रोगांसंबंधी संशोधन सुरू केले. रक्तामधील साखरेबाबत त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळेच मधुमेहावरचे उपाय सुलभ झाले. या संशोधनाला ‘कोरीचक्र’ असे आजही संबोधले जाते. या संशोधनाबद्दलच त्यांना डॉ. बर्नार्डो हाऊसे यांच्यासमवेत नोबेल पुरस्कार लाभला. त्यानंतर कोरी दाम्पत्याने सेंट सुई येथे स्वतःची प्रयोगशाळा काढून संशोधनाचे कार्य पुढे चालू ठेवले. या प्रयोगशाळेचा अनेक संशोधकांनी लाभ घेतला. दुर्देवाने गर्टी कोरीला एका असाध्य रोगाने पछाडले. तब्बल दहा वर्षे तिने या रोगाशी झुंज दिली,परंतु २६ ऑक्टोबर १९५७ रोजी तिचे निधन झाले.
Leave a Reply