हल्ली खरेच खूप मोठे वृक्ष धारातीर्थी पडताना दिसतात. आणि त्यासाठी, ‘इमारतीला धोका आहे म्हणून आम्ही ते झाड तोडले,’ असे सरळ सांगितले जाते. आधीच पर्यावरण रक्षणाचा प्रश्न एवढा ऐरणीवर असताना चुकीच्या समजुतींनी असे होऊ नये. त्यासाठी त्या झाडामुळे आपल्या इमारतीला कितपत धोका आहे ते नीटपणे अभ्यासले पाहिजे.
सर्वप्रथम ते झाड कुठले आहे ते बघावे लागते. ते झाड आडवे वाढते की उभे? अशोकाचे झाड उभे वाढते, कडुलिंब, वड आडवे पण वाढतात. उभे वाढणारे झाड तितकेसे धोकादायक नाही. तसेच झाडांच्या मुळांचा प्रकार कोणता? काही झाडांची मुळे जमिनीत खूप खोल जातात, तर काहींची आडवी पसरतात. खोल मुळे जाणारी झाडे धोकादायक नाहीत.
आणखीन, ही झाडे लावली ती जमीन कशी आहे ते पण बघावे लागते. काही ठिकाणी जमीन रेताड असते, काही ठिकाणी मुरमाड, काही ठिकाणी भुसभुशीत तर काही ठिकाणी खडकाळ असते. भुसभुशीत जमिनीत झाडे फार काळ उभी राहू शकत नाहीत. तसेच झाड इमारतीपासून किती अंतरावर लावले आहे ते पण बघावे लागते.
झाडाप्रमाणे इमारतीची पण माहिती घ्यावी लागते. ते लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेले आहे की आर सी सी? आर सी सी पद्धतीने बांधलेली इमारत जास्त मजबूत असते. तसेच इमारतीचा पायाही मजबूत हवा. आपण बरेच ठिकाणी बघतो की वृक्षांच्या मुळांनी घराभोवतीच्या संरक्षक भिती उचललेल्या दिसतात कारण या भिती फक्त हद्दीभोवती घातल्या जातात, त्यांना फारसा खोल पाया वगैरे घातलेला नसतो. इमारतीपासून योग्य अंतरावर, खोल मुळे जाणारी व सरळ वाढणारी झाडे लावली तर त्या इमारतीला तितकासा धोका नसतो. मोठे वृक्ष इमारतीपासून लांबच लावावेत. मोठ्या वृक्षांचा इमारतीला मुख्य धोका वादळ-वाऱ्यात, असतो. हे वृक्ष उन्मळून किंवा तुटून पडले तर नुकसान होते. त्यासाठी नवीन लावताना, इमारतीजवळ मोठे वृक्ष न लावता वेली लावाव्यात. मोठ्या वृक्षांना इमारतीपासून जरा लांब लावून सतत छाटत राहणेच उत्तम.
Leave a Reply