नवीन लेखन...

डोके ज्याचे त्याचे

लहानपणी  आम्हा मुलाना, सिनेमातल्या हिरो सारखे कपडे घालणे आणि त्याच्या सारखे केसाचा  भांग पडणे, म्हणजे टॉप फॅशन वाटायची.   कपड्याचे  खर्चिक काम आणि  ते काही आपल्या हाती नसायचं. मळकट आणि टिकाऊपणाला  (भलेही ते टाकाऊ असले तरी! ) प्राधान्य असे. त्याला मग पिवळ्या  साबणाने धुतल्याने ते कळकट होत. कपड्यांचा चॉईस जेष्ठाचा असे.

पण डोकं मात्र आपल्या हाती असे . तेल आणि पाणी चपोडून वेगवेगळ्या हेअर स्टायली व्हायच्या . डोक्या मागे पंख्या सारखे केस, कायम सायाळच्या काट्या सारखे उभे असत . काही केल्या ते नतमस्तक होत नसत . कितीही तेल पाणी केले तरी  ! राठ ,दाट  व काट्या सारखे उभे केस  कॉमन होते . हल्लीचे कपडे धुवायचे किंवा बूट पॉलिशचे ब्रश सुद्धा त्या केसांपेक्षा सौम्य असतात . मला सुनिल दत्त सारखे रेशमी , मानेला झटका दिला कि मागे जाणारे व पुन्हा घरंगळत पुढे येणारे , वाऱ्यावर भुरभुर उडणारे केस आवडायचे . पण माझे केस होते राठ , दाट  आणि त्यात किंचित कुरळे . ते कसले जातंय मानेच्या झटक्याने मागे ? नुसती मन दुखायची ! वावटळीत सुद्धा आपली जागे न सोडणारे माझे केस कसले भुरभुर उडतंय ?पुन्हा त्यात  एखादा रविवार चुकला कि लगेच ‘किती बोकूड वाढलंय ‘ म्हणत वारकाच्या दुकानाची वारी ! झिरो कट !

झिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे . ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात . ट्रॅकटरने शेत नागरल्या सारखं दिसत !त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस ‘ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच , मागे, पुढे  नायतर उभे शिंगा सारखे !

पण खरे सांगतो असल्या कटिंग करणारे मूळ कलावंत ग्रामीण भागातलेच ! पिंपळाच्या पारावर एखाद भोरग *( या शब्द साठी टिप्पणी पहा ) टाकून धोपटी ** (  पुन्हा टिप्पणी ) घेऊन बसत . त्यांची बसण्याची एक खास पध्द्त असे . ते दोन पायावर उकिडवे बसत . अन एखाद ‘बोकूड ‘वाढलेले पोट्ट आलं का ? त्याच मुंडक दोन्ही गुढग्यात धरत ! का ? तर हलूने म्हणून ! मग या चाळ्य्या (चाळा – कान आणि कपाळ या मधली बाजू )पासून त्या चाळा पर्यंत केस कापायची मशीन फिरवत .( मशीनचे पाते बरेचदा मुंड झालेले असल्याने काही  केस कापण्या ऐवजी उपटून निघत ! आणि येथेच पोट्टे टाहो फोडत !  ) मग जर्मनच्या वाटीत चार बोट बुचकळून टाळू वरल्या केसतून फिरवीत . कंगव्याने केस उभे करीत , तो बुचका  मुठीत धरून कात्रीने कापून टाकत ! झाली कट्टिन्ग ! सव्वा रुपया ! नगदी देला तर डोकभर पावडर लावत . खळ्यावरलं गिराइक आसन तर सुरवातीचं पाणी पण नाही , बिनपाण्याची !  तालुक्याच्या गावी हीच कटिंग खुर्चीत बसून करीत , कटिंगला नंबर  लागस्तोर रंग उडालेला जुना ‘ रसरंग ‘चा अंक वाचायला मिळे ! फुकट ! तालुक्यात याला ‘सोल्जर कट ‘म्हणत . मिलिट्रीत ट्रेनिंग पेक्षा या वर ज्यास्त भर असतो म्हणून याला ‘सोल्जर कट ‘ म्हणतात असे आम्हाला अंबादास दादा म्हणाला होता !

मध्यंतरी चमन गोट्याची ‘फॅशन ‘ होती . चेहऱ्यावरले भुवया आणि पापण्या सोडून सगळे केस काढून टाकायचे ! गेलाबाजार  डेव्हिड , अनुपम खेर किंवा वैभव मांगल्य या (या सर्वांची क्षमा मागून ) स्टॅण्डर्ड टक्कल वाल्याना तरी थोडी हिरवळ असेल पण या बाबाला . नो वे ! वर काळाढूस गॉगल ! या वरून एक जुनी आठवण अली . आमच्या गावात एक दुकानदार टकलू कॅटॅगिरीतला होता . तेव्हा हि ‘फॅशन ‘ कोठेच नव्हती . तेव्हा तो बारा महिने असला काळा गॉगल घालायचा . तो इतका खप्पड चेहऱ्याचा होता कि कवटीला गॉगल घातल्या सारखे दिसायचे !. एकदा मी त्याला बिन गॉगलचे पहिले . त्याचा एक डोळा बकरीचा होता .! मला खूप वाईट वाटले ,कारण त्याच्या गॉगल आमच्या चेष्टेचा विषय होता . त्या दिवसा पासून आम्ही तो विषय वर्ज केला .

आमच्या परळीत डुकरांचा खूप सुळसुळाट होता . केसांचे बुचडे बांधलेले , विरळ दाढ्या वाढवलेले लोक त्या डुकरांना, काठीला भला थोरला फास लावून पकडायचे . त्याचे चारी पाय बांधायचे अन खांद्यावर टाकून घेऊन जायचे . कोणी म्हणत ते लोक डुक्कर मारून खातात तर काही म्हणत ते डुकरे विकतात . गुढघ्या पर्यंत ,गुढग्याला फिट्ट आणि कमरेला ढगळ विजार आणि वर बिन धुंडयाचा शर्ट ! आम्ही त्यांना ‘शिकलकरी ‘ म्हणायचो . ते विळ्या , खुरपी , असल्या लोखंडी वस्तू पण विकायचे  .  तर त्यांची ती ‘शिकलकरी ‘हेअर स्टाईल ‘ सध्या खूप फार्मात आहे ! पांढरी धोट्ट दाढीवाले म्हातारे सुद्धा असली बुचडा स्टाईल (अर्थात बुचडा काळा करून ) ‘सेलिब्रेटी ‘ म्हणून मिरवतात . असो पसंद अपनी अपनी .

मानेवरचे केस वाढूं त्याची झेब्र्याच्या शेपटाचा केसासारखी थोटूक पोनी टेल ची फॅशन पण बरीच रुळली होती . (मानेवर नाही , फॅशन जगात !–शारुखखान आठवतोय ना ?) या पुरुषी पोनी टेलची  इतकी क्रेझ होती कि एक वषेट टक्कल पडलेला बाबा मानेवरच्या चार केसांचा करंगळी एव्हडा पोनी टेल चा बोन्साय बांधून प्रवचन करत टीव्ही चॅनल अडवून बसायचा ! फॅशनला इलाज नाही !

दाढीचे तर अनंत प्रकार झालेत . अगदी गावरान बाभळी सारख्या वेड्यावाकड्या दाढी पासून तो मधमाश्याच्या पोळया सारख्या , डोडोनाच्या कुंपणा सारख्या ते ट्रिम केलेल्या लॉन सारख्या ! रेशमी झुळझुळ वाहत्या दाढ्या ! काळ्या कुळकुळी ते बर्फा सारख्या पांढऱ्या फेक ! त्यातल्यात्यात बोकूड दाढी (बच्चन बाबा ) बऱ्या पैकी स्थिरावलीय . (मी पण ठेवलीय ! त्याच काय झालं एकदा काही दिवस मी बोकूड दाढी ठेवली . कशी दिसते माहित नव्हते . मग माझे एक ‘हितचिंतक ‘ म्हणाले “ह्य्या , काय दाढी ठेवलीय ? बेक्कार दिसतंय !” झालं माझा निर्णय झाला . मला हि स्टाईल मस्त दिसते हे पक्के झाले ! कारण या ‘हितचिंतकाला ‘ माझे बरे बघवत नाही , हा माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे ना ! मग मी कायमचीच अशी दाढी ठेवलीय ! ) एक रेष मारल्या सारखी पण काही तरुण दाढी ठेवतात . तसेच खालचा ओठ आणि हनुवटीच्या बेचक्यातले केस ठेवण्याची पण  प्रथा आहे . लहानपणी भिंतीतून न निघणारा खिळा आम्ही तसाच वेडावाकडा करून भिंतींत ठोकून द्यायचो . तशी हि स्टाईल दिसते !

डोक्याचे हाल करणाऱ्यांत , केसांना कलप  करणाऱ्यांचा एक वेगळाच कळप आहे ! आमचा श्याम्या वय वर्ष पासष्ट भयानक कलप करतो . कानाच्या वरच्या पाळ्या सोबत अर्ध कपाळ पण कपल करून घेतो!.लहान लेकरू जेवताना जस खरकटं सांडत ना , तसा हा कलप सांडतो !. ‘तू आता या वयात का कलप करतोस ?’ या प्रश्नाला ‘तरुण ‘ दिसावे म्हणून हे त्याचे उत्तर असते . पण तो तरुण नाही तर ‘करुण ‘ दिसतो ! तोंडातली कवळी त्याच वय ओरडून सांगत असते !  असो . आमचे एक जेष्ठ मित्र आहेत . त्यांची जन्म तारीख मला माहित आहे ते त्यांना माहित नाही , व मी हि कधी त्यांना त्याची जाणीव करून दिली नाही ! त्यांचे डोके बऱ्यापैकी शाबूत आहे . (म्हणजे अजून टक्कल पडलेले नाही ! )मी भेटलो कि आवर्जून ‘ मी तुमच्या पेक्षा लहान आहे .’ म्हणून सांगतो . हा बाबा दिसेल तो केस काळा  करून टाकतो (स्वतःहचाच ) , डोक्याचे केस , भुवया , मिश्या . अहो इतकाच काय छातीवरचे केस सुद्धा —- माहित नाही याचा कलप  कोठपर्यंत गेला असेल ! बरे करे ना का ? वर सगळ्यांना ‘म्हातारा ‘ म्हणून हिणवत असतो . ! ‘ अरे तो थेरडा जोश्या , काल मारुतीला आल्ता ! अमेरिकेला जायचं म्हणत होता ‘ हा जोशी यांच्या नन्तर तीन वर्ष्यानी रिटायर झालाय ! ‘ कलप करणे ‘ एक व्यसन असावे . तरुण असण्याचा वा  भासवण्याचा काही सम्बन्ध नसावा . जे कलप करतात त्यांनाही कळत असते कि असे  आर्टिफिशिअल तारुण्य पोकळ असते , पण वळत नसते ! खरे तर पांढऱ्या केसानी माणूस छान म्यॅच्युर दिसतो .

पण खरे सांगू ?’ डोक्यावर’ राज्य केले ते देवानंदने आणि राजेशखन्नानेच ! आणि काही औंशी बच्चन बाबाने  !  देवानंदचा केसांचा कोंबडा , आणि राजेशखन्नाचे मानेवर निगा राखलेले केस ! त्यांच्या काळात इतर कोणती हेअर स्टाईल दिसायची नाही ! आजही नेवाश्या सारख्या आडबाजूच्या गावी गेलात तर , एस ,टी  स्टॅन्ड मागचा कत्था कलरच्या केसाचा राजेशखन्ना स्टाइलवला म्हातारा पान टपरीवाला पानाला चुना लावताना   दिसेल !

माझा कोणालाही नावे ठेवण्याचा हेतू नाही . घडीभर करमणूक म्हणूनच वाचावे . तरुण काय आणि म्यॅच्युर काय दिसण्या पेक्षा असावे ! आपण आहोत तसेच असावे आणि दिसावे , हि समज  मला सुद्धा अत्ताश्या येतीयय !. अस्तु !

टिप्पणी

* भोरग = भोरग मंजन चवाळ , चवाळ ठाव नाय ? अवो बारदान्याचा तुकडा ! बारदाना ? आता हे बी ठाव नाय म्हणता ! अवो तग बट्ट्याचा दोर करून त्याच्या पसन पोत  करत्यात ,त्या पोत्यात गहू ,जोंधळ भरत्यात ती थोरली थैली . काय ताग ठाव नाय ? जावा तिकडं अन करा —- गुगल मंग गावलं तुमासनी !

** धोपटी = पैलेच्या जमान्यात एका चामड्याच्या पिशवीत नावी लोक आपली समदी हत्यार म्हनजे वस्तरा , साबन , तेलाची कुपी , जर्मलची वाटी (पान्यासाटी ), केस कापायची मशीन ,दोन चार कैच्या (मंजे कात्र्या  , त्यातली एखांदी कान तुटली असायची! )ठीवीत अन बगलत मारीत ! मारीत मंजे धरीत –या शारच्या पब्लिकला ना समद इस्कटून सांगाया लागत बाग !

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय , पुन्हा भेटूच . Bye .

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..