डोंबिवली हे शहर खूप पुरातन आहे असे म्हणतात. मात्र इतिहासात तसा डोंबिवली शहराचा फारसा उल्लेख सापडत नाही.
इ. स. ८४३ मध्ये कोंकणचे राज्य शिलाहारास मिळाले. शिलाहारांनी पुढील ४५० वर्षे या प्रदेशावे सुखनैव राज्य केले. इ. स. १२६५ च्या सुमारास यादवांनी शिलाहार राजवटीचे उच्चाटन केले.
अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर यादवांची सत्ता खिळखिळी झाली. त्यानंतर उदयास आलेल्या सुलतानांच्या अंकित सरदारांची राजवटी शिलालेख सापडले आहेत. त्यात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. तुर्भे बंदरानजीकच्या माहूल गांवात इ. स. ११५६ चा एक शिलालेख सापडला आहे. त्यात ’डोंबल वाटिका’ असा उल्लेख आढळतो. परंतू त्याबाबत अनेक मतभेद आहेत.
सन १८८७ साली डोंबिवली स्टेशनची स्थापना झाली. त्यानंतर ब्रिटीशांनी सन १९२० मध्ये मॅरहॅम वसाहतीची स्थापना केली आणि पांढरपेशा वर्गाला या नव्या वसाहतीत राहण्यासाठी उद्युक्त केले. कदाचित त्यामुळे आजच्या पश्चिम भागाला जुनी डोंबिवली तर पूर्व भागाला नवी डोंबिवली असे म्हटले जाऊ लागले. स्वच्छ हवामान ही येथील जमेची बाजू या विकासाला पोषक ठरली आणि वाढत्या संख्येने येथे कायमच्या वास्तव्यासाठी लोक येऊ लागले.
सध्या मुंबईतून मराठी माणूस बाहेर पडून लांबलांबच्या ठिकाणी स्थायिक होताना दिसतो. निवासाच्या जागांची स्वस्तात उपलब्धता हेच याचे कारण आहे. दादर-गिरगावमधल्या एक-दोन खोल्यांच्या बदल्यात डोंबिवली-कल्याण-बदलापूरला प्रशस्त फ्लॅट मिळतो हे गणित. त्यामुळे अगदी अलिकडच्या काळात मुंबईतून हजारो कुटुंबे डोंबिवलीला स्थलांतरित झाली.
डोंबिवलीने स्वत:ची एक खास ओळख मात्र जपून ठेवलेली आहे. डोंबिवली शहर खरोखर शांतताप्रिय समाजाचं प्रतिक. डोंबिवलीकरांनी आपल्या संस्कृतीचा वारसा आजतागायत जपलेला आहे. डोंबिवलीकर मराठी असो की दाक्षिणात्य, सांस्कृतिकदृष्ट्या त्याची अभिरुची उच्च असते. अनेकविध प्रांतातले लोक इथे नांदत असले तरीही ते इथल्या मूळ मराठी संस्कृतीशी समरस झालेले दिसतात.
दंगली, मारामारी, खून, दरोडे यांपासून डोंबिवलीकर अलिप्तच दिसतो. कदाचित अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजात गुंतल्यामुळे या बाहेरच्या गोष्टी करायला त्याच्याकडे वेळच नसावा. अर्थात मुलातच सुसंस्कृत असल्याने त्याला यात रसही नसावा. कुठे खुट्ट झालं की ठाणे बंद, महाराष्ट्र बंदची हाक दिली जाते तशी डोंबिवली पूर्ण बंद असलेली कधी ऐकलीच नाही.
डोंबिवलीकर हा अत्यंत शिस्तप्रिय असल्याचे लक्षात येते ते एकाच गोष्टीवरुन. वेळ ही तासात किंवा मिनिटातच मोजतात असे नाही तर ती सेकंदातही मोजावी आणि पाळावी लागते हे डोंबिवलीकरांनी जाणून घेतलेय. त्यामुळेच सकाळ-संध्याकाळच्या रेल्वेगाड्यांचं टाईमटेबल बहुतेकांना पाठ असतं आणि तेही ८.५७, ९.०३ अशा अगदी तास आणि मिनिटानुसार. डोंबिवलीकर “साडेआठची गाडी” असं म्हणणारच नाही. “आठ एकतीसची दादर फास्ट” हे त्याच्या सहजपणे तोंडावर येतं.
पुलंसहित अनेक साहित्यिकांच्या लेखणीतून डोंबिवलीचा उल्लेख आला आहे. पुलंचे डोंबिवली प्रेम तर जगजाहिर आहे. शन्ना नवरे तर येथेच वास्तव्याला होते. अनेक राजकीय नेते इथेच उदयाला आले आणि मोठेही झाले. काहींना प्रेमळ सासरही डोंबिवलीतच मिळालं.
कलाकार, खेळाडू, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रात डोंबिवलीकर पुढेच आहेत आणि त्यांची ही वाटचाल अशीच सुरु रहाणार आहे.
— निनाद अरविंद प्रधान
(महाराष्ट्रातील शहरांची ओळख करुन देणारी ही लेखमाला नियमितपणे प्रसिद्ध होईल. आपल्यालाही कोणत्या शहराविषयी लिहायचे असेल तर जरुर लिहा. डोंबिवलीच्या तुमच्या आठवणी आणि किस्से जरुर शेअर करा. )
डोंबिवली शहराची बरीच नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अशीच इतरही शहरांबद्दल माहिती द्यावी.