माझ्या परिचयातील दोन चित्रकार असे आहेत की, जणू दोन ध्रुवच! दोघांनीही कलेची उपासना ही संघर्षातूनच केलेली आहे. मात्र आज दोघांच्यातही मोठी तफावत आहे. त्यातील एक म्हणजे, राम. रामला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्याने शालेय जीवनात इतर विषयांपेक्षा चित्रकलेत अधिक रस घेतला. पाचवीपर्यंत त्याची कला बहरली. पुढील शिक्षणासाठी शाळा बदलल्यावर त्याने चित्रकलेच्या अनेक स्पर्धांमधून भाग घेतला व शाळेचे नाव उंचावले.
शाळेतील हस्तलिखितांची सजावट तोच करीत होता. चित्रकलेच्या सरांनी त्याला दोन्ही सरकारी चित्रकलेच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करुन चांगल्या ग्रेडने उत्तीर्ण केले. अकरावी नंतर त्याने कलामहाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेही आर्थिक परिस्थितीमुळे त्याला फी भरणे मुश्किल होत असे, कारण घरातून या कलेला प्रोत्साहन नव्हते. पाच वर्षांच्या शिक्षणानंतर तो बाहेर पडला.
अनुभवासाठी, सरांच्या सल्ल्यानुसार त्याने मुंबईतील एका सुप्रसिद्ध चित्रकाराकडे नोकरी केली. काही महिन्यानंतर तो माघारी परतला. शहरातच काही ठिकाणी नोकरी केल्यानंतर एका जाहिरात कंपनीत चार वर्षे काम केले. नंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला. तो करत असतानाच त्याचं लग्न झालं.
तीस पस्तीस वर्षांच्या कालावधीत त्यानं भरपूर पेंटिंग्ज तयार केली. मात्र ती विकण्याचं कौशल्य नसल्याने, ती पडून राहिली. घरातूनच त्याला पेंटिंग करायला विरोध असल्याने तो खचून गेला.
आज त्यानेच केलेली पेंटिंग्ज स्वतःच्या बेडवर गादीखाली ठेवून तो झोपी जातो.. रात्री स्वप्नात तीच पेंटिंग्ज त्याच्याभोवती फेर धरतात व आम्हाला एखादं ‘घर’ मिळवून दे, अशी त्याला विनवणी करतात… खरंच जिथं पिकतं, तिथं विकलं जात नाही.. हेच खरं! दुसरा ध्रुव, श्याम! वडिलांच्या साईन बोर्ड पेंटरच्या व्यवसायात, श्यामला लहानपणापासूनच चित्रकलेचे धडे मिळाले. वडिलांना मदत करत असतानाच रंगरंगोटीच्या सर्व प्रकारच्या कामांचा अनुभव श्यामने घेतला. शालेय शिक्षणासोबतच आध्यात्माचाही त्याला ओढा होता. भजन, कीर्तनात तो नेहमीच सहभागी होत होता.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने कलाशिक्षकाची नोकरी स्वीकारली. पस्तीस वर्षे विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवत असतानाच कलेचा छंदही जोपासला. लग्न झालं. मुलं लहानाची मोठी झाली. घरातील सर्वांनी श्यामच्या कलेला नेहमी प्रोत्साहनच दिले. निवृत्तीनंतर श्याम शहरात आला. मुलगा मोठ्या कंपनीत नोकरीला लागला होता. त्याने वडिलांना प्रशस्त फ्लॅट घेऊन दिला व पेंटिंग्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले. श्यामने मोठमोठ्या आकारातील अनेक पेंटिंग्ज साकारली. शहरातील काही ठिकाणी चित्रांची प्रदर्शने भरवली.
श्यामला आता एकच ध्यास होता, मुंबईत प्रदर्शन भरवण्याचा! तो योगही जुळून आला. मुंबईतील एका आलिशान कलादालनात श्यामने प्रदर्शन आयोजित केले. त्याला कुटुंबातील सर्वांनी सहकार्य दिले. सहकुटुंब त्याने कलादालनात, आठवडाभर प्रदर्शन मांडले. अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनासाठी झालेल्या खर्चाचा आकडा फारच मोठा होता, मात्र कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तो सहज पेलला गेला. अत्यंत समाधानाने, श्याम सहकुटुंब आपल्या घरी परतला..
असे हे दोन ध्रुव.. जिथं एकजण अंधारात असतो, तर दुसरा उजेडात… दोघांचंही आयुष्यमान सारखं असलं तरी एकाला कुटुंबाची साथ आहे, तर दुसरा एकाकी आहे…. कलाकाराची कला, ही दैवी देणगी असते.. तिचा वापर कसा करायचा हे ज्याच्या त्याच्या हातात असतं.. कला ही नेहमी इतरांसाठी प्रदर्शित करावी, ती जर कोंडून ठेवली तर नक्कीच कोमेजून जाईल. नाही का?
– सुरेश नावडकर ९-७-२३
मोबा. ९७३००३४२८४
Leave a Reply