नवीन लेखन...

दुधाचे दान

पुण्याच्या एका नामांकित कंपनीत (BSNL) सोनल कामावर होती. खूप हुशार आणि मेहनती मुलगी. वयाच्या बाविसाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरविले होते. त्यामुळे आईनेच सांभाळ केला. सोबत एक लहान बहीण सुद्धा आहे. सोनल शांत आणि सुस्वभावी होती. तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न झालेले. तिचा संसार सुखाचा चालू होता. तशा काही अडचणी येत असतील किंवा दुःखही होत असेल तरी न सांगणारी सोनल. कारण वडील नाही आणि आईला दुःख किती द्यावे. बहीण पण आहे की अजून या विचाराने ती दुःख पचविणारी. तिचे मिस्टर पण एका इन्फोसिस कंपनीमध्ये कामावर आहे. सोनलला लहान मुले भारी आवडायची. विशेषतः मुली. सारखी बोलायची मला मुलगीच झाली पाहिजे.

काही दिवसांनी ती प्रेग्नेंट राहिली. तिला बीपीचा त्रास होताच. प्रेग्नेंट असतानाही ती कामावर जायची. काही दिवस काढले आणि सहाव्या महिन्यात माहेरी आली बाळंतपणासाठी. त्याच काळात कोविड-१९ मुळे लॉकडाऊन होतेच.

माहेरी आल्यावर ती मनातले सर्व काही आई आणि बहिणीला सांगू लागली. मला मुलगीच होणार, आणि तिचे नाव सुद्धा शांभवीच ठेवणार, तिचा सांभाळ माऊ म्हणजे मावशीच करणार, तिला चांगल्या शाळेत दाखल करणार इतकी ती स्वप्ने बघत, रंगवत होती. तिने स्वतःला ये-जाचा त्रास होऊ नये म्हणून कार सुद्धा घेतलेली. तिला आता माहेरीच राहायचे होते. म्हणून तिने तिची ट्रान्सफरही करून घेतली होती. कारण मिस्टर बाहेर कामानिमित्त जाणार होते. त्यामुळे सासू-सासऱ्यांसोबत राहण्यापेक्षा आणि मुलीचा सांभाळ व्हावा म्हणून तिकडेच राहण्याच्या विचाराने ती सारखी मुलीविषयी आपल्या बहिणी जवळ बोलत असायची.

बाळंतपणासाठी एका हॉस्पिटलमध्ये नाव दाखल केले होते. तिथे ती चेक-अपला जात होती. तिचे सातव्या महिन्यात डोहाळ जेवण केले. आणि आठव्या महिन्यात तिच्या पोटात दुखत होते, म्हणून नेहमीच्या डॉक्टरकडे नेले असता वेळेवर त्या डॉक्टरांनी तिला घेतले नाही. बोलले दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जावे. आयत्या वेळेवर कोणाकडे पडला. न्यावे असा प्रश्न घरच्यांसमोर चौकशी केली असता कोविड-१९ चे पेशंट सर्व दवाखान्यात असल्यामुळे ते घेण्यास तयार नव्हते. यातच एका हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले गेले असता अवघ्या दोन ते तीन तासातच तिची डिलिव्हरी झाली. आणि तीही मुलगीच झाली. पण दुर्भाग्य बघा तिला मुलीला बघता सुद्धा आले नाही. कारण बाळाला ऑक्सिजन कमी पडत असल्यामुळे आणि त्या हॉस्पिटलमध्ये तशी सोय नसल्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलला त्या बाळाला अॅडमिट करावे लागले.

इकडे ही विचारणा करू लागली की, ‘बाळ कोणा सारखं आहे. मुलगा आहे की मुलगी आहे. मुलगी सांगितल्यावर खूप खुश झाली. तेव्हा बोलली बघा माझं दुर्भाग्य मला बाळ सुद्धा बघायला मिळालं नाही. एका हॉस्पिटलला ती आणि दुसरीकडे बाळ. किती हा दुरावा.

पण सोनलला डिलीव्हरीच्या वेळेस खूप ब्लीडिंग झाले. तिला दोन दिवसात ३६ रक्ताच्या बॉटल्स द्याव्या लागल्या. ब्लीडिंगमुळे जे बाहेरील रक्त दिले गेले. ते कदाचित सूट झाले नसावे. त्यामुळे तिच्या लंग्स (lungs) वर इन्फेक्शन झाले. मग डॉक्टर मात्र हरले आणि बोलले या पेशंटला नागपूरला हलवावे लागेल. बघा किती मोठा प्रश्न घरच्यांसमोर? नागपूरला ही चौकशी केली असता एकही हॉस्पिटलमध्ये बेड रिकामे नव्हते. कारण कोरोना पेशंट. त्यातच एका हॉस्पिटलमध्ये बेड रिकामे होते. ताबडतोब तिला त्याच रात्री बारा वाजता अॅम्बुलन्सने नागपूरला नेण्यात आले. सोबत मावस भाऊ आणि बहीण होती. तिथे नेल्यावर आयसीयूमध्ये ऍडमिट केले. डॉक्टरांचे उपचार चालू झाले. तिचे एक एक दिवस करता करता दोन्ही लंग्स निकामी होत गेले. उपचार संपूर्ण करून झाले. तरी तिचा काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. दिवसेंदिवस तब्येत गंभीर होत गेली.

तिला मात्र तिच्या बहिणीने अजिबात सोडले नाही. जपमाळ चालूच, देवाचा धावा सर्वांकडून तिच्यासाठी चालूच होता. डॉक्टर बोलले की, आम्ही आमच्या परीने संपूर्ण प्रयत्न केले. बरं तिला कोरोना पण झाला नव्हता. ती कोमात गेली होती. तिकडे बाळ ऑक्सिजनसाठी अमरावतीला तर इकडे ही नागपूरला. दोघीही मायलेकी संकटांशी झुंज लढत होत्या. जवळपास पंचवीस दिवस ती व्हेंटिलेटर वर मृत्यूशी लढत होती. पण अपयशी ठरली आणि अमावास्येला तिची देवाज्ञा झाली. इकडे दोन दिवस आधी बाळाला डिस्चार्ज मिळाला होता आणि आजी सांभाळ करत होती. दोघी मायलेकींना एक दुसऱ्याला बघता आले नाही. किती है दुर्भाग्यच म्हणावे. शेवटी तिचा पुनर्जन्मच म्हणावे की, आठव्या महिन्यात झालेले बाळ जरा अशक्तच होते. बाळाचा सांभाळ आजी व मावशी करीत आहे. त्यातच डॉक्टर बोलले ‘बाळाला आईचे दूध हवे.’

बाळाला आईचे दूध? सर्वांच्या समोर प्रश्नचिन्ह उभा राहिला. डॉक्टरला हकीकत सांगितली तर ते बोलले, ‘बघा! कोणी तयार होते का?’ मग काय या सर्वांची विचारणा चालू झाली. कोणीही आई सहसा तयार होत नाही. या ना त्या कारणाने नकार यायचा. अशातच देवाने त्यांची हाक ऐकली आणि त्यांच्या कडे असणाऱ्या दूधवाल्याच्या सुनेकडून होकार आला. तिलाही सव्वा वर्षाचा मुलगा आहे. बघा हे बाळ नशीबवान तिला मातृत्व मिळालं. खरंच हे ऐकून खूप आनंद होत आहे की, ती बाई अक्षरशः देवी सारखी धावून आली. त्या आईचे उपकार कोणीही फेडू शकणार नाही. आपण सर्वांनी रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, किडनी दान इत्यादी प्रकारचे दान ऐकलेले असालच. पण हे एक दुर्मिळ असं दुधाचे दान प्रथमच ऐकण्यास मिळत असावे असे मला वाटले. आणि दुधाचे दान देण्याचे काम ही आई पार पाडते आहे. आता दोन महिन्याची ही मुलगी झाली आहे.

जे लोक दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात. त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही. आनंद जगातील सर्वोत्तम औषध आहे. असं हे औषध देण्याचे काम ही आई करते आहे.

वाचकहो, ही दुःखद भरी कहाणी ऐकून मला राहवलं नाही. म्हणून तिच्या विषयी लिहिण्याचा प्रयत्न केला. या जगात सर्व प्रकारचे लोक आहेत हे माहिती आहे. पण एक आईने दुसऱ्या बाळाला दूधाचे दान करावे तेही खुशीने ऐकून माझ्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले. मंडळी ही सोनल म्हणजे माझ्या बहिणीची भाची होती.

-रसिका मेंगळे

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..