आज १५ सप्टेंबर..आज ‘दूरदर्शन’ या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस
१५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे!!! पु.लं. नीच “दुरदर्शन” हे नाव सुचवले.
दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंट ची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. १९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले.
१९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि ‘नॅशनल ब्रॉडकास्टर’ ही दूरदर्शनची ओळख रुजली. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले.१९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले. आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन दर्शकांना भारावणारे असेच होते. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. नंतर सगळ्या राष्ट्रीय चर्चांमध्ये दूरदर्शनचे स्थान नगण्य होत गेले. सरकारने दूरदर्शनमध्ये चैतन्य यावे, यासाठी ‘प्रसार भारती’ची स्थापना केली. देशात ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येपर्यंत कोणतेही खासगी चॅनल जात नाही. दूरदर्शन मात्र जाते. याशिवाय, दूरदर्शनकडे देशभरात ४६ स्टुडिओंचे जाळे आहे. इतके विशाल जाळे कोणत्याही खासगी वाहिनीकडे नाही. असे असूनही दूरदर्शनचा समाजमनावर फारसा प्रभाव आज नाही. असे का, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. सरकारच्या विरोधात फारशा न जाणाऱ्या पण वस्तुनिष्ठ बातम्या हे दूरदर्शनचे खरे शक्तिस्थान होते. गेल्या दशकभरात दूरचित्रवाणी हा मीडियाचा सर्वाधिक जाहिराती व त्यामुळे उत्पन्न मिळणारा अवतार झाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.म.टा./इंटरनेट
Leave a Reply