नवीन लेखन...

दूरदर्शनवरील कल्पक निर्मात्या म्हणून ख्याती प्राप्त करणाऱ्या विजया जोगळेकर धुमाळे

दूरदर्शनवरील कल्पक निर्मात्या म्हणून ख्याती प्राप्त करणाऱ्या विजया जोगळेकर धुमाळे यांचा यांचा जन्म दि. ३ मार्च १९४३ रोजी झाला.

तब्बल तीस वर्षे मुंबई दूरदर्शनवर- त्याचं ‘सह्य़ाद्री’ हे नामकरण झालं नव्हतं तेव्हापासून- विविध जबाबदाऱ्या पार पाडत दूरदर्शनच्या हजारो-लाखो प्रेक्षकांशी विजयाताईंनी नातं जोडलं होतं.विजयाबाईंचं घर म्हणजे कलावंतांचं घर! त्या घराला निर्मितीचा ध्यास आहे.

संगीत आणि सायकॉलॉजीमध्ये एम. ए. केलेल्या विजया जोगळेकर यांना १९७२ साली अनपेक्षितपणे दूरदर्शनवर नोकरी लागली आणि त्यांच्या आवडीचं विश्व नकळतपणे हाताशी आलं. ‘किलबिल’ या कार्यक्रमासाठी याकूब सईदना मदत करत असतानाच त्या या नोकरीत कायम झाल्या आणि त्यांच्या मनातल्या कल्पनांना जणू पंख फुटले. मराठीत कला, संगीत क्षेत्रात एवढी दिग्गज मंडळी आहेत, त्यांना दूरदर्शनच्या माध्यमातून रसिकांसमोर आणावं अशी कल्पना सुचली आणि ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमाच्या निर्मितीचे वेध विजया जोगळेकर यांना लागले. असं काही वेगळं करायचं असलं की दूरदर्शनवर तेव्हा रीतसर प्रस्ताव द्यावा लागायचा. मग त्याला मंजुरी मिळाली तरच तो कार्यक्रम पुढे नेता यायचा. कारण दूरदर्शन हे सरकारी माध्यम. तेव्हा खासगी वाहिन्या नव्हत्या. दूरदर्शनचं ‘बजेट’ हा कायमच चणचणीचा विषय असल्याने कार्यक्रम तोलूनमापूनच करायला लागायचे. पण विजया जोगळेकर यांचा हा प्रस्ताव मंजूर झाला आणि ‘शब्दांच्या पलीकडले’मध्ये पहिल्याच लाइव्ह कार्यक्रमात विजया जोगळेकर यांनी दूरदर्शनच्या पडद्यावरून यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीतविश्वाची सुंदर सफर घडवली. रसिकांनी हा कार्यक्रम डोक्यावर घेतला. याच कार्यक्रमात गायक सुधीर फडके ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत..’ हे गाणं लाइव्ह गायले. अरुण दाते, अनुराधा पौडवालही या कार्यक्रमात गाऊन गेल्या. दूरदर्शनवरचा हा ‘प्रयोग’ कमालीचा यशस्वी झाला आणि विजया जोगळेकर यांना हुरूप आला. मग युवकांसाठी वेगळा काहीतरी कार्यक्रम करावा असं त्यांना वाटू लागलं. आकाशवाणीवर तेव्हा ‘युववाणी’ चालायचं. दूरदर्शनवरील युवकांसाठीचा कार्यक्रम तेव्हा रटाळ होत होता. करिअरच्या नव्या वाटांची ओळख करून दिली तर तरुण प्रेक्षकवर्ग दूरदर्शनकडे वळेल या खात्रीनं ‘नवी दिशा’ हा कार्यक्रम विजयाताईंनी आखला. आणि अपेक्षेप्रमाणेच झालं. गावोगावच्या तरुणांकडून पत्रांचा पाऊस पडू लागला. नोकरी-व्यवसाय, तसंच कलाक्षेत्राच्या नव्या वाटांवर चालण्यासाठी शेकडो तरुण पुढे आले. काही वेगळ्या अभ्यासक्रमांची ओळखही यातून घडवण्यात आली आणि त्यांच्या प्रवेशासाठीही हजारोंची गर्दी उसळली. दूरदर्शनच्या त्याच त्या दळणाला आता वेगळं रूप मिळालं होतं. या यशानं निर्माती म्हणून आपण काही नवं, वेगळं करू शकतो, हा विजया जोगळेकर यांचा उत्साह दुणावला.
‘किलबिल’ या लहान मुलांच्या कार्यक्रमात स्पर्धा सुरू झाल्या. मुलांच्या कलागुणांना दूरदर्शनच्या पडद्यावर संधी मिळू लागली. वेगवेगळ्या स्पर्धात असंख्य मुले सहभागी होऊ लागली. अशाच एका कार्यक्रमात माधुरी दीक्षितने केलेल्या कथ्थक नृत्याला दुसरं बक्षीस मिळालं होतं.‘चिमणराव’ या मालिकेची निर्मिती हा विजया जोगळेकर यांच्या आठवणींच्या पेटीतला हळवा कप्पा. या मालिकेची आठवण निघाली की त्या भूतकाळात हरवून जातात. आपल्या हातून एक दर्जेदार निर्मिती झाली याचं समाधान या आठवणीतून ओसंडू लागतं. विजयाताई आता दूरदर्शनवरून निवृत्त झाल्या असल्या तरी आठवणींचे अनेक अलवार क्षण त्यांच्या सोबत आहेत. दृक् -श्राव्य माध्यमाचं ते एक कौतुक असतं. आपण कित्येक वर्षांपूर्वी निर्माण केलेली कलाकृती केव्हाही पुन्हा पाहता येते, लोकांना दाखवता येते, याचं ते अप्रूप असतं. ‘स्पोर्ट्स राऊंडअप’च्या निमित्ताने केलेली क्रीडा-पत्रकारिता व विविध क्रीडाविषयक कार्यक्रमांची निर्मिती, कवी कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळालं तेव्हा घेतलेली त्यांची मुलाखत, पं. कुमार गंधर्व यांच्या घरी तीन दिवस मुक्काम ठोकून त्यांच्यावर केलेली डॉक्युमेंटरी, आशाताईंसोबत केलेला ‘ऋतु बरवा’ हा नादमय कार्यक्रम आणि त्यांच्या सर्वात आवडीचा- या माध्यमाचा वापर करून आपण समाजासाठी काहीतरी करू शकलो याचं चिरंतन समाधान देणारा ‘अक्षरधारा’ हा प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम.. अशा कितीतरी दर्जेदार कार्यक्रमांच्या निर्मितीचं समाधान सोबत घेऊन विजया जोगळेकर आज त्यांच्या निवृत्तीनंतरच्या नव्या मोहिमांमध्ये रमल्या आहेत.

पुण्याच्या फिल्मस् अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये विद्यार्थ्यांना कॅमेऱ्याचा वापर करण्यातील कलेचे गुपित सांगण्यासाठी गेली काही वर्षे त्यांना तिथे निमंत्रित केले जाते. दूरदर्शनवरील काही दुर्मीळ जुने कार्यक्रम हा खरे म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. तो जपला पाहिजे, या हेतूने आता त्यांतील काही निवडक कार्यक्रमांच्या डिजिटायजेशनचा कार्यक्रम दूरदर्शनने हाती घेतला आहे. सरकारी कामात नेहमी येणारा पहिला अडथळा म्हणजे बजेट! या मोहिमेतही बजेटचा अडथळा आहेच; पण त्यातूनही काटकसर करत हे काम पूर्ण झाले पाहिज असे विजया जोगळेकर यांना वाटते. त्यासाठी अधूनमधून त्या दूरदर्शनवर जात असतात. या कामात आपलाही सहभाग असणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटते. दरम्यानच्या काळात अनेक खासगी चित्रवाहिन्यांचा उदय झाला. काही खासगी वाहिन्यांनी विजया जोगळेकर यांच्यावर वाहिनीच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. त्या तिथेही रमल्या.दूरदर्शनवरच्या ‘अक्षरधारा’मुळे समाजशिक्षणाचा एक अनोखा मार्ग हाती लागला होताच. आता निवृत्तीनंतर त्या अनुभवाचा उपयोग करावा असे विजया जोगळेकर यांनी ठरवले आणि आसपासच्या वस्त्यांमधील मुले विजयाताईंच्या घरी येऊन अभ्यास करू लागली. त्यांच्या घरी सकाळ-संध्याकाळी शिकवणी वर्ग चालतात. मुलांना शिकवताना होणारी त्यांची किलबिल विजया जोगळेकर यांना ‘अक्षरधारा’ आणि ‘किलबिल’च्या आठवणींच्या मळ्यात घेऊन जाते.

जवळपास ३० वर्षे विजयाताईंनी दूरदर्शनवर निर्माती म्हणून काम केलं आणि सर्जनाचे समाधान सोबत घेऊन १९९२ मध्ये त्या निवृत्त झाल्या. मुलाखती, व्याख्यानं, प्रशिक्षणं, नव्या प्रकल्पांची निर्मिती अशा मोहिमांमध्ये आता त्या व्यग्र असतात. नोकरीच्या काळात दिवसातला ठरावीक वेळच काम असायचं. आता उलट काम अधिक वाढलंय. वेळच पुरत नाही असंही कधी कधी होतं. पण या नव्या व्यग्रतेचा आनंदही त्या अगदी मनापासून उपभोगत असतात. दूरदर्शनच्या कार्यक्रमांची निर्माती ही विजया जोगळेकर यांची ओळख असली तरी ते त्यांचं पहिलं प्रेम नाही. या नोकरीच्या काळात विजयाताईंनी अनेक नवोदित आणि नावाजलेल्या गायक-गायिकांना छोटय़ा पडद्यावरून जगासमोर आणलं. संगीताचा अनोखा नजराणा आपल्या कार्यक्रमांतून रसिकांना पेश केला. एका अर्थाने संगीतसेवेचा वसा त्यांनी पूर्ण केला. संगीताचं शिक्षण घेतलेल्या विजयाताई स्वत: मात्र कधी फारशा दूरदर्शनच्या पडद्यावर गाताना रसिकांना दिसल्या नाहीत. आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यासारख्या गायिकेच्या गुरू असलेल्या विजया जोगळेकर यांनी आपली गायनकला रसिकांसमोर ठेवण्यासाठी निर्माती म्हणून हाती असलेल्या संधीचा कधीच स्वार्थी वापर केला नाही. त्यांनी किशोरीताईंसोबत अनेक मफली केल्या. त्यांच्या मफलींच्या निमित्ताने त्यांच्या सहवासात रमल्या, प्रवास केला. पण गाणं मात्र राहूनच गेलं.

‘गाणं हे माझं पहिलं प्रेम होतं,’ असं सांगताना विजया जोगळेकर यांची नजर सहज भिंतीवरच्या किशोरीताईंच्या फोटोवर खिळते. भूतकाळात त्यांच्यासोबत छेडलेले सूर कदाचित त्यावेळी त्यांच्या कानात रुंजी घालत असावेत असं वाटत राहतं. ते राहून गेलेलं गाणं पुन्हा सुरू करायची त्यांची खूप इच्छा आहे; पण अलीकडे आवाज फारसा साथ देत नाही, सूर लागत नाही. पण त्यांनी उमेद सोडलेली नाही. सकाळी आणि संध्याकाळी शिकवणीसाठी घरी येणाऱ्या मुलांपकी काही जणांकडे गाता गळा आहे, हे त्यांनी हेरलं आहे. त्यांना गाणं शिकवून आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न जगण्याचा प्रयत्न विजया जोगळेकर या करत असतात. वय विसरलेल्या त्या घरात ‘किलबिल’ सुरू असतानाच गाण्याचे सूरही उमटतात आणि ‘शब्दांच्या पलीकडले’ अशी काहीतरी अनुभूती घेऊन घर मोहरून जातं. रोजच हे घडत असल्याने घराला आता त्याची सवय झाली आहे..

संकलन. – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..