एप्रिल १९९६ च्या पहिल्या आठवड्यात, संध्याकाळच्या दूरदर्शनवरील बातम्यात आम्हाला ‘पैंजण’ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट जाहिरात केल्याबद्दल राज्य पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले. ती बातमी सांगितली होती… दूरदर्शनवरील सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका, वासंती वर्तक यांनी!! याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो..
दूरदर्शन सुरु झाल्यावर आम्ही ‘अपट्राॅन’ कंपनीचा कृष्णधवल पोर्टेबल टीव्ही घरी आणला होता. त्याकाळी संध्याकाळच्या बातम्या आवर्जून बघितल्या जात असत. तेव्हा वासंती वर्तक हमखास दिसायच्या.. टिपिकल साडी आणि नाममात्र मेकअपमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसायचं. त्याआधी मित्रांच्या घरी जाऊन टीव्ही बघताना, भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर यांना बातम्या देताना अनेकदा पाहिलेलं होतं. २००७ पर्यंत वासंती वर्तक यांचं दुरुन का होईना, रोजचं दर्शन होत होतं..
वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याविषयी फेसबुकवर अधिक माहिती वाचायला मिळाली.. पहिली गोष्ट म्हणजे त्या अस्सल पुणेकर आहेत. पूर्वाश्रमीच्या त्या वासंती पटवर्धन.. शालेय शिक्षण, मुलींच्या भावे हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण एस.पी. कॉलेजमध्ये!
बी.ए. आणि एम.ए. केल्यानंतर त्यांनी एस.पी. मध्येच प्राध्यापिकेची नोकरी सुरु केली. एक वर्ष पूर्ण होतानाच दूरदर्शनची संधी चालून आली. त्याच दरम्यान लग्नही झालं. दूरदर्शनवर भाषांतरकार व वृत्तनिवेदनाचे काम सुरु झाले. त्यांचे पती विवेक हे आयआयटीचे सुवर्ण पदक विजेते इंजिनिअर होते.
स्टुडिओच्या अंधारात समोर असलेल्या कॅमेऱ्याच्या, लाल दिव्यावर लक्ष केंद्रित करुन माणसाशी बोलल्याप्रमाणे बातम्या सहजपणे वाचायच्या हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं.. हे त्यांचं काम २००७ पर्यंत चाललं.. शिवाय मुलाखती घेणं, आकाशवाणीसाठी काम करणं चालूच होतं..
या रोजच्या बातम्या सांगणाऱ्या वासंतीताईंचं, पडद्यामागील जीवन हे किती कष्टप्रद होतं हे समजल्यावर मीदेखील भावुक झालो.. त्यांना जी पहिली मुलगी झाली ती मेंदूच्या विकाराने आजारी असायची. रात्री ती दर पंधरा मिनिटांनी, जागी होत असे.. सहाजिकच वासंतीताईंची झोप अपुरी होतं असे. एकदा तर बातम्या वाचण्याआधी दहा मिनिटे फोन आला.. शेजारणीने सांगितले की, मुलगी पडली व तिला खूप लागलेले आहे.. लवकर घरी या.. वासंतीताई रडू लागल्या. त्यांना अधिकाऱ्यांनी घरी जायला सांगितले, मात्र त्यांनी कामाला प्राधान्य देऊन ते पूर्ण केले!
पंधरा वर्षांची होऊन ती मुलगी देवाघरी गेली. ती चौदा वर्षांची असताना त्यांना दुसरी मुलगी झाली, जी आता एमबीए करीत आहे. त्यांचे पती खाजगी कंपनीत उच्च पदावर होते. स्वतःचा उद्योग सुरु करायचा म्हणून त्यांनी नोकरी सोडली. दोन भागीदारांसह उद्योग उभारला. दुर्दैवाने दोघांत भांडणं झाली व पोलीस केस झाली. कंपनीला सील ठोकण्यात आले. भागीदार परदेशात निघून गेले. झालेलं कर्ज, विवेक यांना फेडण्यास वीस वर्षे लागली. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे कर्करोगाशी, पाच वर्षे सामना करुन निधन झाले.. या बिकट परिस्थितीत त्यांना सासर व माहेरच्यांनी खंबीर आधार दिला..
प्रसार माध्यमामध्ये राहूनही वासंतीताईंनी स्वतः प्रकाशझोतात न राहता, इतरांना प्रकाशात आणले. शेकडों जाहीर कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन केले आहे. ‘लोकसत्ता’ मधील ‘एकला चलो रे’ या सदरानं त्यांना उत्तम लेखिका म्हणून अधोरेखित केलेलं आहे. मराठीतील कवीयित्रींची परंपरा, या विषयावर सध्या त्या संशोधन व लेखन करीत आहेत..
आजच्या डिजिटल युगात भरमसाठ वाहिन्या, डिजिटल टीव्हीवर आल्यानंतर ‘दूरदर्शन’ हे विस्मृतीत गेलं.. आज हिंदी, मराठी, इंग्रजी वाहिनीवर वृत्तनिवेदक, अतिरंजित बातम्यांचे तोफगोळे फेकत असतात.. बातम्या सांगण्यामध्ये स्पर्धा लागलेली असते.. एकच बातमी पुन्हा पुन्हा सांगून ऐकणाऱ्याला बधीर केलं जातं.. बातम्या सांगणाऱ्या ग्लॅमरस स्त्रिया ब्लेझरमध्ये असतात.. त्यांचे शब्दोच्चार चुकीचे असतात, त्याबद्दल त्यांना कधी खेदही वाटत नाही.. पाच मिनिटांत पन्नास बातम्या सांगण्याची चढाओढ लागलेली असते. काही वाहिनीवर बातम्या सांगणारे निवेदक येरझाऱ्या घालत बोलत असतात.. अशावेळी मी टीव्ही बंद करतो व तीस वर्षांपूर्वीच्या, आपल्या घरातीलच वाटणाऱ्या वासंती ताईंसारख्या निवेदिकांच्या आठवणीत रमतो…
त्यांना शतायुषी होण्यासाठी, मनापासून शुभेच्छा!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१८-३-२२.
Leave a Reply