दोष नव्हता तिचा
अन् वाट ही नव्हती ती चुकली
बदमाशांच्या जाळ्यात
अनाहुतपणे होती फसली
उन्मत्त नशेने माजून
ते सैतान झाले होते
विकृत ओंगळ भावनेला
पूरूषार्थ समजत होते
मनावरच्या आघाताने
जरी नव्हती ती खचली
आत्मसन्मानाची लढाई
जिंकू नव्हती शकली
विधात्यालाही नाही कळले
विकृत हवस ती कसली
नीच त्या नराधमांनी
माणूसकीलाही भोसकली
आंधळ्या त्या न्यायदेवतेला
होते सारे स्पष्ट कळले
अब्रूचे उघडे पंचनामे
तरीही नव्हते टळले
भाग्य होते की दूर्भाग्य
ती एक बातमी होती
वैचारीक उथळपणाला
ती फक्त एक गवसणी होती
हजारो पेटत्या मेणबत्त्या
पाहुन जरी ती सुखावली
काही श्वापदं मोकाट बघून
मनोमनी दुखावली
नराधम फाशी गेले तेंव्हा
किंचीतशी ती हसली
मुक्या निर्भयाच्या शेजारी
गुपचूप जावुन बसली.
– डॉ.सुभाष कटकदौंड