गेट वे ऑफ इंडिया वरून मांडव्याला जायला लहान असताना लाँच सर्विस चालू नव्हती झाली. मांडव्याला मामाकडे जायला लोकल ने भायखळा किंवा डॉकयार्ड रोड स्टेशनवर उतरून भाऊच्या धक्क्यावर जाऊन रेवस ला जाणाऱ्या लाँच ने जावे लागायचे. भाऊच्या धक्क्यावर जायला तेव्हा बेस्ट च्या डबल डेकर बस असायच्या. ह्या बस मध्ये तेव्हा गर्दी नसायची त्यामुळे वरच्या डेकवर जाऊन सगळ्यात पुढल्या सीटवर जाऊन माझगाव डॉक आणि भाऊच्या धक्क्यावरील परिसर बघायला मजा यायची. भाऊचा धक्का जवळ आला की येणारा मच्छीचा वास अजूनही आठवतो. मनमाडला बाबांची बदली झाली असल्याने पंचवटी एक्सप्रेस आणि लोणावळ्याला मामा कडे जाताना सिंहगड एक्सप्रेस यामध्ये सुद्धा तेव्हा डबल डेकर डबे जोडलेले असायचे. त्यामुळे मनमाड किंवा लोणावळ्याला जाताना ट्रेनच्या वरच्या डेकवर बसून प्रवासाचा आनंद घेताना मजा यायची. कधी कधी तर मनमाडहुन पंचवटीने VT स्टेशनला येऊन डॉकयार्ड रोड वरून डबल डेकर बस पकडून लाँच मध्ये जायचो. लाँच ला गर्दी असली तर वरच्या डेकवर जाऊ दिले जायचे. भाऊच्या धक्क्यावरून लाँच निघाली की दीड तासात रेवस बंदरला पोचायची. त्यावेळेस मुंबई बंदरात कमीत कमी पंचवीस ते तीस मोठंमोठ्या जहाजांनी नांगर टाकलेला असायचा. लाँच या सगळ्या जहाजांच्या जवळून जात असताना प्रश्न पडायचा की जहाजावर इमारती सारखं जे दिसतं ते काय असावं. एवढ्या खिडक्या आणि एवढे मजले एका जहाजावर अशी किती लोकं राहात असतील. जवळपास प्रत्येक जहाजावर कमीत कमी पाच ते सहा मजले दिसायचे. एवढं मोठं जहाज कसं चालत असेल, त्याचं इंजिन कसं असेल, त्यावर असणारी लोकं कशी असतील, त्याच्या मध्ये कोणता माल नेत असतील आणि त्याचा चढ उतार कसा करत असतील. अशा सगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटायचं. एवढं मोठं जहाज चालवणारी आणि त्यावर काम करणारी लोकं किती शिकलेली असतील असे प्रश्न पडायचे.
पण आपण सुद्धा एक दिवशी अशा जहाजांवर काम करायला पाहिजे असा विचार सोमैया कॉलेज मधून मेकॅनिकल मधून B. E. झालो तरी कधी मनात आला नव्हता. इंजिनियर होऊन एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत तिथून तिसऱ्या करता करता मर्चन्ट नेव्ही हा शब्द कानांवर पडला आणि मेकॅनिकल इंजिनियर मर्चन्ट नेव्ही जॉईन करू शकतात ही माहिती मिळाली. प्री सी ट्रेनिंगच्या ऍडमिशन साठी लागणारे सगळे सोपस्कार पूर्ण करून एक वर्षाचं प्री सी ट्रेनिंग पूर्ण करून पासपोर्ट, विजा, कोर्सेस, मेडिकल वगैरे वगैरे करून एकदाचा जहाजावर चढलो. पहिल्यांदा जहाजावर चढल्यावर जहाजाची विशालता आणि भव्यता बघून अचाट पडलो. लहानपणी जहाजावर ज्या मोठं मोठ्या इमारती आणि खिडक्या बघायचो त्यामध्ये फक्त 25 ते 32 लोकं राहतात प्रत्येकाला सेल्फ कन्टेन्ट केबिन. कॅप्टन, चीफ इंजिनियर, चीफ ऑफिसर आणि सेकंड इंजिनियर यांना तर डबल रूम, काही काही जहाजांवर तर बाथटब ची पण सोय दिसली. प्रत्येक मजल्याला जहाजावर डेक बोलले जाते. सगळ्यात वरच्या मजल्याला नेव्हिगेशनल डेक किंवा ब्रिज बोलले जाते. ट्रेन आणि बेस्ट बस च्या डबल डेकर नंतर पाच किंवा सहा डेकर जहाजावर आपल्याला सुद्धा काम करायला मिळाल्यावर डबल डेकर मध्ये आणि लाँच मध्ये बसून ज्या वेगळ्या दुनियेबद्दल व वेगळ्या जगाबद्दल कुतूहल वाटायच ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. टायटॅनिक आणि त्यासारखे हॉलिवूड मधील पिक्चर मध्ये जहाजावरची लाईफ दाखवली गेलीय पण वास्तविकतेत जहाजावरील लाईफ त्यापेक्षाही कठीण, कष्टप्रद आणि धोक्याची आहे हेच खरं. सव्वाशे अंश सेल्सिअस मध्ये इंजिनला लागणारे इंधन, हे इंधन गरम करायला लागणारी स्टीम , आणि स्टीम जनरेशन साठी बॉयलर मध्ये जळणारी आग. जहाजाचे मेन इंजिन आणि जनरेटर यांच्यातून निघणारे चारशे अंश सेल्सिअस तापमानाचे एक्झॉस्ट गॅसेस. इंधन आणि ऑइलच्या टाक्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू. 440 वोल्ट्स आणि हजारो किलोवॅट पॉवर या सगळ्यांमध्ये काम करताना किती सांभाळून आणि किती काळजीने काम करावे लागते हे जहाजावर काम करणाऱ्यांनाच माहित असते. ईमारती सारख्या दिसणाऱ्या मजल्याना जहाजाचे अकोमोडेशन म्हणतात तर या अकोमोडेशन खाली असणाऱ्या इंजिन आणि मशिनरी च्या भागाला इंजिन रूम म्हणतात.
जहाजाच्या अकोमोडेशनचे जसे पाच सहा मजले असतात त्याच्या पेक्षा मोठं मोठे आणि प्रशस्त मजल्यांनी इंजिन रूम बनलेली असते. इंजिन रूम चे अर्धे मजले हे वॉटर लाईन खाली म्हणजे जहाजाचा तळ आणि त्यावरील दोन ते तीन मजले हे पाण्याखाली असतात. इंजिन साठी लागणारी भरपूर व शुद्ध हवा ही मोठमोठ्या व्हेंटिलेशन फॅन ने संपूर्ण इंजिन रूम मध्ये डक्ट ने पुरवली जाते. जहाजाचे मेन इंजिन दोन डबल डेकर बस एका पुढे एक आणि एकावर एक अशाप्रकारे उभ्या केल्यावर सुद्धा लहान दिसतील एवढं मोठं असतं. चाळीस हजार टन आणि सव्वा लाख टन कॅपॅसिट असलेल्या तेलवाहू जहाजांवर काम करायला मिळालं पण चाळीस हजार टन आणि त्याच्या तिप्पट मोठ्या जहाजाला सांभाळायला पण तेवढीच लोकं लागतात इव्हन पाच लाख टन कॅपॅसिटी असलेल्या जहाजाला पण पंचवीस ते तीस लोकच सांभाळतात. जहाज जेवढं मोठं तेवढी ऑपरेटिंग आणि रनिंग कॉस्ट कमी पण यामुळे शिपिंग इंडस्ट्री मध्ये जहाज आणि जहाजावर काम करणाऱ्यांसाठी मंदी निर्माण झाली. जहाज कार्गो नाही म्हणून उभी राहू लागली. कार्गो नाही म्हणून भाडं नाही भाडं नाही म्हणून सगळीकडे कॉस्ट कटिंग, मॅन पॉवर कटिंग त्यामुळे जे मिळतं त्यात समाधानी राहून काम करायचं तर करा नाहीतर घरी बसा अशी सगळ्यांची मनस्थिती आहे. जहाजावर नोकरी करायला मिळाल्यापासून पाच सहा वेळेस तरी डबल डेकर विमानांमधून प्रवास सुद्धा अनुभवायला मिळाला.
पण लुफथान्सा, येतीहाद एमिरेट्स आणि सिंगापुर ऐयरलाईन्स यांच्या अलिशान डबल डेकर विमानापेक्षा बेस्टच्या डबल डेकर आणि डबल डेकर ट्रेन मध्ये अनुभवलेली मज्जाच जास्त आहे.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply