पंचवीस वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा पेजर घेतला. त्यावर मेसेज आला की, मी त्या व्यक्तीला फोन करीत असे. नंतर रिलायन्स कंपनीचा मोबाईल हप्त्यावर घेतला. त्याला स्टॅण्डींग चार्जर होता. त्यानंतर नोकियाचा मोबाईल झाला. हा खूप वर्षं चालला. दरम्यान महागडे स्मार्ट फोन बाजारात आले. रोजच भेटणारे मित्र किपॅडचा मोबाईल पाहून ‘किती मागे राहिलात, तुम्ही..’ असं बोलायचे. शेवटी स्मार्ट फोन घेतला, पण व्हाॅटसअप चालू केले नाही. बऱ्याच दिवसांनंतर एकदाचे ते चालू केले.
आपली मित्र मंडळी व्हाॅटसअपवर दिसू लागल्यावर गुडमाॅर्निंग, सुप्रभात सुरु झाले. व्हाॅटसअपवर मित्रांचे गोलात फोटो दिसू लागल्याने ‘डीपी हीच प्रत्येकाची ओळख’ झाली.
बण्डा जोशी, दिलीप हल्याळ, संतोष चोरडिया, श्रीराम रानडे, सुनीताराजे पवार, सुरेश पाटोळे यांचे ‘डीपी’चे फोटो पाहूनच मेसेज पाहणं आणि पाठवणे व्हायचं. काहींनी आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण ‘डीपी’ला ठेवलेला असतो. वाळुंज सरांनी त्यांच्या ‘काहूर’ पुस्तकाच्या प्रकाशनाचे वेळी मनोगत व्यक्त करतानाचा फोटो ठेवलेला आहे तर मनोहर कोलते सरांनी आदरणीय भाई वैद्य यांच्या हस्ते मानपत्र स्विकारतानाचा फोटो ठेवला आहे. कित्येक जण आपला ‘डीपी’ तोच कायम स्वरुपी ठेवतात, त्यामुळे त्यांची इमेज नेहमी पाहणाऱ्यांच्या कायम लक्षात रहाते.
काही जण आपल्या जीवनातील आदर्श व्यक्तीचा ‘डीपी’ ठेवतात. उदा. स्वामी विवेकानंद, पु. ल. देशपांडे, नरेंद्र मोदी, इ. काही आपली दैवतं ठेवतात, स्वामी समर्थ, नटराज, दत्तगुरु, श्रीगणेश, इ. काहीजण आपल्या आवडीची कॅरेक्टर ठेवतात, जसं काॅमिक्स मधला हल्क, स्पायडर मॅन, बॅट मॅन, इ. काहींना आपला आवडता सिने अभिनेता किंवा अभिनेत्री ठेवण्याची हौस असते.
मी स्वतः माझा ‘डीपी’ देव आनंद ठेवला होता. तो अभिनेता म्हणून मला पसंत होताच, त्याहून एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून अधिक प्रिय होता. त्याने जीवनात अनेक चढउतार पार केले, मात्र अपयशाने कधीही खचला नाही. पुन्हा नव्या उमेदीने चित्रपट निर्मिती करीत राहिला.
माझा हा ‘देवआनंद’चा ‘डीपी’ असतानाच मी फेसबुकवर लेख लिहू लागलो. माझा लेख वाचून अभिप्राय देणारे वाचक हळूहळू वाढू लागले. त्यामध्ये एक आशा पारेखचा ‘डीपी’ असलेली मुलगी पोस्ट वाचून अभिप्राय द्यायची. कधी रोजची पोस्ट दिसली नाही तर मेसेंजरवर ‘आज काही लिहिलं नाही का?’ असं विचारायची. मला नेहमीच औत्सुक्य वाटायचं की, हिनं आशा पारेखचाच ‘डीपी’ का ठेवला असावा?
आशा पारेखने तीस वर्षाहून अधिक काळ सिनेसृष्टी गाजवलेली आहे. तिचे अनेक चित्रपट रौप्यमहोत्सवी झाले आहेत. पुरस्कार, सन्मान भरपूर मिळाले आहेत. मात्र खाजगी जीवनात ती समाधानी नाही. तशीच शंका मला या मुलीबद्दल आली. मी एकदा मेसेंजरवर विचारले, ‘तुम्ही बॅंकेत आहात का?’ त्यावर ‘नाही’ असं उत्तर मिळालं. पुढे तिनं सांगितलं की, मी एका डायग्नोसिस क्लिनीकमध्ये कामाला आहे. रोज पेशंट येत असतात. सर्वांचे काळजीने ग्रासलेले चेहरे पाहून उदास वाटतं. दुपारी निवांतपणा मिळाला की, मी तुमच्या जुन्या पोस्ट वाचते. त्या वाचून मला आनंद मिळतो.
मधे दोन दिवस मी पोस्ट टाकू शकलो नाही. तिनं मेसेंजरवर विचारले, लेख टाकला नाही, मी वाट पहात आहे. पुढे ती सलग टाईप करत राहिली…
गेल्या रविवारी मला थंडी वाजून ताप आला. कोरोनाची टेस्ट केली. पाॅझिटीव्ह आली. मी आता कोविड सेंटरमध्ये अॅडमीट आहे. उपचार चालू आहेत. काल रात्री मला झोप लागलीच नाही. रात्रभर टक्क जागी. जीवनातील सर्व घटनां एकामागोमाग डोळ्यासमोर येत राहिल्या.
आमचं मोठं कुटुंब. आई वडिलांना मी धरुन सहा मुली व एक मुलगा. मी सर्वात धाकटी, माझ्यानंतर भाऊ. वडिलांच्या तुटपुंज्या कमाईवर आईने संसाराचा गाडा ओढला. माझ्या सर्व बहिणींची लग्न झाली. मात्र त्यासाठी आई वडिलांना करावे लागलेले कष्ट मला पाहवले नाही. एवढं करुनही आज त्या सुखी आहेत, असंही मला दिसत नाही. त्यामुळे माझा लग्नावरचा विश्र्वासच उडाला. आई वडील गेले. भावाचं लग्न झालं. त्याला दोन मुलं आहेत. वहिनी स्वभावाने चांगली आहे. ते सर्व मला प्रेमाने वागवतात. मधे मला एक स्थळ आलं होतं. साखरपुडाही ठरला. आयत्यावेळी मुलाने अवाजवी हुंडा मागितला. मी लग्न मोडले. आता माझं लग्नाचं वयही निघून गेलंय. तरीही मी आनंदात आहे. भरपूर वाचन करते, टीव्ही पहाते. नोकरी करते. माझे नातेवाईक माझी काळजी घेतात. अजून काय हवं मला?
मी वाचत राहिलो. आशा पारेख जीवनात सर्व काही मिळवूनही संसार सुखाला ‘पारखी’ राहिली तशीच ही देखील यापुढे भावाच्या गोतावळ्यात राहूनही एकाकीच राहणार. ती लवकर कोरोनामुक्त होवो आणि जीवनभर आनंदी राहो, हीच प्रार्थना…..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३-१०-२०.
Leave a Reply