नवीन लेखन...

ईबोला रोग नायजेरियातून रोखणाऱ्या नायजेरियन डॉक्टर अमेयो स्टेला अडाडेवोह

गेल्या अनेक वर्षांपासून ईबोला आफ्रिकन देशांना त्रास देतोय. कोरोनाप्रमाणेच ताप, सर्दी, खोकला, फुफ्फुसांना सूज अशी लक्षणं या ईबोलामधे दिसतात. मात्र, कोरोनापेक्षा हा विषाणू कित्तीतरी घातक असल्याचं तज्ञांचं मत आहे.

ईबोलाच्या पहिल्या पेशंटला हॉस्पिटलमधे रोखून हा भयानक साथरोग नायजेरिया देशात पसरण्यापासून वाचवणाऱ्या नायजेरियन डॉक्टर अमेयो स्टेला अडाडेवोह (Dr Ameyo Stella Adadevoh) यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला.

सर्दी, खोकला यांच्या मार्फत ईबोला पसरतोच. पण त्यासोबतच लघवी, विष्ठा, रक्त, थुंकी, घाम आणि विर्यासारख्या लैंगिक स्रावांमधूनही ईबोलाचे विषाणू इकडून तिकडे पसरतात. आजारी पडलेल्या माणसाच्या खूप जवळून संपर्कात येणाऱ्या कुणालाही हा वायरस अगदी सहज पसरतो.

डब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार १९७६ मधे या आजाराचा पहिला पेशंट सापडला होता. तेव्हापासून अनेकदा ईबोलाच्या साथी आफ्रिकेत पसरल्या आहेत. २०१३ ला गिनी देशातल्या मधल्या एका लहानशा गावातल्या एका लहान मुलामुळे या साथीचा पुन्हा प्रसार सुरू झाला. घराच्या मागच्या अंगणातल्या झाडाच्या ढोलीत हा मुलगा खेळायला जात असे. त्या ढोलीत वटवाघुळांचा वावर होता. तिथून ईबोलाचा विषाणू या लहानग्याच्या शरीरात आला आणि बघता बघता संपूर्ण गाव, शहर आणि एका देशातून दुसऱ्या देशात हा वायरस प्रवास करू लागला.

डिसेंबर २०१३ पासून साथरोग सुरू झाला असला तरी मार्च २०१४ मधे तो ईबोला असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. २०१६ पर्यंत ईबोला संपूर्ण आफ्रिका खंडात धुमाकूळ घालत होता. त्याचा मृत्यूदरही ५० टक्के इतका जास्त होता. जगाच्या इतिहासातली ही सगळ्यात भयानक साथ मानली जाते.

२०१३ ला या वायरसचा उगम झाला त्या गिनी शेजारीच लायबेरिया हा देश आहे. या देशातून पॅट्रीक सॉयर हे वकील अम्बॅसिडर म्हणजेच राजदूत म्हणून नायजेरियात आला. नायजेरियाची राजधानी कालाबारमधे त्यांना कसल्याशा कॉन्फरन्सला हजेरी लावायची होती. लागोस या नायजेरियामधल्या अर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या राज्यातल्या आयकेजा विमानतळावर सॉयर यांचं विमान उतरलं. विमानातून बाहेर आल्यावर एअरपोर्टवर बॅग वगैरे घेताना सॉयर कोसळले. त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. अंगात तापही होता.
त्यांची प्रकृती बरी नसल्यानं विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी आपल्याच गाडीतून त्यांना लागोसमधल्या फर्स्ट कन्सल्टण्ट हॉस्पिटलमधे भरती केलं. तिथल्या प्रमुख डॉक्टर अमेयो स्टेला अडाडेवोह होत्या. अशाप्रकारे ईबोला त्यांच्या आयुष्यात घुसला.

२१ वर्ष त्या तिथे काम करत होत्या. शास्त्रज्ञ असणाऱ्या वडलांकडून आणि आजोबांकडून प्रेरणा घेऊन त्या तिथे कामाला लागल्या होत्या. नायजेरियातल्या बहुतांश लोकांना त्या माहीत होत्या. त्यांच्याकडून उपचार मिळावेत म्हणून अनेक लोक फर्स्ट कन्सल्टण्ट हॉस्पिटलमधे यायचे. त्याही कधीही पेशंटच्या अडीनडीला धावून जायचा. स्वतःच्या मर्यादेपलिकडे जाऊन रात्री अपरात्रीही पेशंटच्या घरी जाऊन ट्रीटमेंट द्यायच्या.

सॉयर त्यांच्या हॉस्पिटलमधे अडमिट झाले तेव्हा त्यांच्यावर मलेरियाचे उपचार सुरू करण्यात आले. आपल्याला नेमकं काय होतंय याची नीट माहिती ते देत नव्हते. पण डॉक्टर अमेयो यांना त्यांच्या त्वचेवर रक्तासारखे डाग दिसले. शिवाय ते लायबेरियावरून प्रवास करून आलेत हे कळालं. त्यावरून सॉयर यांना ईबोलाचा संसर्ग झाला असू शकतो याची त्यांना शंका आली. लगेचच त्यांनी त्यांचं रक्त तपासणीसाठी पाठवलं आणि त्यांचा रिझल्ट पॉझिटिव आला.

ईबोलाशी लढण्यासाठी नायजेरियन सरकारनं कुठलीच तयारी केलेली नव्हती. डॉक्टर अमेयो यांच्या हॉस्पिटलमधे वेगळा ईबोला वॉर्डही नव्हता आणि सॉयर उपचारासाठी आले तेव्हा पीपीई किटही नव्हते. खरंतर लिबेरियन सरकारने त्यांना प्रवास करण्याची परवागनी नाकारायला हवी होती. आपण ईबोला झालेल्या लोकांच्या संपर्कात आलो आहोत हे सॉयर यांना आधीच माहीत होतं. तशी माहिती त्यांनी सरकारला दिली होती. लिबेरियन सरकारने त्यांना नायजेरियात पाठवलं.

एवढ्या चुका करूनही लिबेरियन सरकार आणि सॉयर उलट अमेयो यांच्यावर दादागिरी करत होते. सॉयर यांना ईबोला झाल्या असल्याने आणि त्यांच्यामुळे देशभऱ साथरोग पसरण्याचा धोका असल्याने ते पूर्ण बरे झाल्याशिवाय त्यांना हॉस्पिटलबाहेर सोडणार नाही अशी ठाम भूमिका अमेयो यांनी घेतली. मात्र आपलं काम पटकन व्हावं याची काळजी असणाऱ्या लिबेरियन सरकारने त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरवात केली.

त्यांनी सॉयर यांचं अपहरण करून त्यांना जबरदस्तीने कोंडून ठेवलं आहे असे आरोप सुरू झाले. त्यांना सोडलं नाही तर अमेयो यांच्या फर्स्ट कन्सल्टण्ट हॉस्पिटलची बदनामी करू अशा धमक्याही दिल्या गेल्या. इकडे सॉयरही हॉस्पिटलमधे शांत बसून नव्हते. सलायईन आणि इतर नळ्या काढून रक्त सांडव, आरडाओरड कर असा त्यांचा उपद्व्याप चालला होता. तरीही अमेयो यांनी त्यांना जाऊ दिलं नाही.

हॉस्पिटलमधे भरती झाल्यानंतर मोजून ५ दिवसात सॉयर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच हॉस्पिटलमधल्या लोकांची तपासणी करण्यात आली. अमेयो आणि इतर ११ कर्मचाऱ्यांना ईबोलाची लागण झाली होती. पुढचे २१ दिवस त्यांना क्वारंटाईनमधे काढायचे होते.

सरकारने उभारलेली क्वारंटाईन सेंटर फार घाण होती. देशासाठी एवढं करणाऱ्या सरकारनं त्यांची चांगली सोय करणं अपेक्षित होतं. शेवटी अमेयो घरीच क्वारंटाईन झाल्या. मात्र एक दोन दिवसातच त्यांना लक्षणं जाणवू लागली. प्रचंड थकवा आला. रोजची कामं त्या हळूहळू करू लागल्या. त्यांच्या नवऱ्याला हा फरक जाणवला आणि लगेचच त्यांची रवानगी सरकारी क्वारंटईन सेंटरमधे झाली.

क्वारंटाईन सेंटरमधेही काही दिवस त्यांनी काढले. तिथेच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्या कोमात गेल्या. पुढच्या काही तासातच १९ ऑगस्ट २०१४ रोजी डॉक्टर अमेयो स्टे यांचे निधन झाले. त्यांच्यासोबतच लागण झालेल्या ११ जणांपैकी ७ जण मृत्यूमुखी पडले.

रेणुका कल्पना
संकलन  : संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..