डॉ. सी. एन. आर. राव यांना त्यांच्या आयुष्यभराच्या विज्ञान संशोधन व विज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. १९३४ साली जन्मलेले प्रा. राव यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सी केली. प्रा. राव यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून एमएस्सी केली, तर अमेरिकेच्या पर्यु विद्यापीठातून पीएचडी केली. भारतात परत येऊन म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी डीएसस्सी केली. नंतर त्यांनी कानपूरच्या आयआयटीमधून १९६३ ते ७६ व नंतर अनेक देशी आणि परदेशी विद्यापीठांतून अध्यापन केले. लोखंड वातावरणात उघडे राहिले तर ते गंजते. त्यावर लालसर थर जमलेला दिसतो. यालाच लोखंड गंजणे असे म्हणतात. त्याला रासायनिक भाषेत लोखंडाचे ऑक्सिडेशन म्हणायचे. सर्वच धातूंचे ऑक्सिडेशन होत असते. धातूंचे असे ऑक्सिडेशन होतानाच्या या टुँझिशन संकल्पनेवर प्रा. राव यांनी केलेल्या संशोधनामुळे पदार्थांचे गुणधर्म आणि पदार्थांची संरचना समजणे सोपे झाले.
पदार्थांची अशी संरचना समजण्याचे शास्त्र म्हणजे सॉलिड स्टेट केमिस्ट्री होय. आजवर लोकांना सॉलिड स्टेट फिजिक्स ठाऊक होते, पण प्रा. राव यांच्या निमित्ताने आता सॉलिड स्टेट केमिस्ट्री हा शब्द सामान्यजनांच्या कानावरून गेला. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत सॉलिड अँड स्ट्रक्चरल केमिस्ट्रीचा एक स्वतंत्र विभाग प्रा. राव यांनी सुरू केला आहे. ते या संस्थेचे दहा वर्षे संचालक होते. त्यांच्या हाताखाली आजवर १०५ विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आहे. उच्च तापमानातील सुपरकंडक्टिव्हिटीच्या क्षेत्रात त्यांच्या संशोधनाचा उपयोग होतो. कॉपर (तांबे) किंवा अॅल्युमिनियमच्या तारेतून वीज वाहत असताना १८ ते २० टक्के विजेचा नाश होतो म्हणजे ती वाया जाते. तसे न होऊ देण्यासाठी विकसित होत असलेल्या शास्त्राला सुपरकंडक्टिव्हिटी म्हणतात. ऑक्साइड सेमिकंडक्टर शास्त्र हे प्रा. राव यांच्या संशोधनाचे फलित म्हणायचे.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
Leave a Reply