डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी झाली असे आज अभिमानाने सांगितले जाते.
वडील शांताराम यांच्या नोकरीच्या निमित्ताने कोटणीस कुटुंबीय नंतर सोलापुरात स्थायिक झाले, मात्र त्या कुटुंबाचे वेंगुर्ल्याशी असलेले ऋणानुबंध मात्र कधीच तुटले नाहीत. वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर रोडलगतच असलेले“कोटणीस हाऊस” हे डॉ.कोटणीस यांचे मूळ घर. हे घर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात “काँग्रेस हाऊस”म्हणून ओळखले जाई. त्या काळात महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे अनेक प्रमुख नेते या “कोटणीस हाऊस”मध्ये मुक्कामाला येत असत.
डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे काका काही वर्षे वेंगुर्ले नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते. डॉ.कोटणीस यांच्या पत्नी डॉ.को-चिंग-लान यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ल्याशी ऋणानुबंध उत्तमरित्या जपले होते. वेंगुर्ले आणि एकूणच परिसरातील सार्वजनिक आरोग्याची दैनावस्था पाहून त्या सद्-गतीत होत. ही दैनावस्था दूर करण्यासाठी आपण काही तरी केले तरच आपल्या पतीच्या ऋणातून आपला देश(चीन) काही प्रमाणात मुक्त होईल असे त्यांना वाटे. डॉ.कोटणीस या महान माणसाच्या सेवाभावी वृत्तीचे गोडवे आजही चीनमध्ये गायले जातात. १९३६ मध्ये त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना या महायुद्धात जपानने चीनवर केलेल्या हल्ल्यात चीनच्या जखमी सैनिकांचे खूप हाल झाले. चीन सरकारच्या विनंतीवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनच्या मदतीसाठी पाच डॉक्टरांचे मदत पथक पाठविले होते. या मदत पथकाचे प्रमुख होते डॉ. द्वारकानाथ कोटणीस. डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली.वैद्यकीय क्षेत्रातले त्यांच्या हाताचे कौशल्य मात्र चीनच्या भूमीवर जखमी झालेल्या प्रचंड चीनी सैनिकांच्या शुश्रुषेसाठी उपयोगी पडले.
कित्येक सैनिकांना औषधपाणी केले, कित्येकांच्या वेदना दूर केल्या तर अनेकांना मृत्यूच्या दाढेतून त्यांनी आपल्या शल्य कौशल्याने ओढून आणले. हे सर्व करीत असताना सैनिकांना वाचविण्याची पराकाष्ठा, अतिश्रम, दूषित हवामान, खाण्यापिण्याची आबाळ आणि वेळ काळ न पाळल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. परंतु त्याही अवस्थेत स्वतःकडे लक्ष न देता आपले कर्तव्य पार पाडण्यात कोटणीस गुंतलेले होते. कोटणीसांनी तेथील चिनी नर्सिंग प्रशिक्षिका को चिंग लान यांच्याशी विवाह केला.
चीनच्या हेबेई प्रांतात कुटाँग खेडे आहे. तेथे डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीरूपात जुने हॉस्पिटल जतन केले आहे. त्यांची खोली जतन केली आहे. या खेड्यात प्रवेश केल्यानंतर चौकातच डॉ. कोटणीसांचा अर्धपुतळा आहे. त्यांच्या कृतज्ञतेसाठी चीनमध्ये आजही त्यांचे भव्य स्मारक उभे आहे. डॉ. कोटणीस यांनी देश जाती, धर्म याबंधनाच्या पलीकडे जात मानवतेची खऱ्या अर्थानं पूजा केली असं म्हणनं काही वावगे ठरणार नाही. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी १९४६ साली “डॉ.कोटनीस की अमर कहाणी” हा हिंदी चित्रपट तयार करून डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या चीनमधील मानवतावादी कार्याचा साऱ्या भारतवासियांना परिचय करून दिला. हा चित्रपट जगभर गाजला.
डॉ. कोटणीसांचा जीवनप्रवास ‘काळी आई’ हा माहितीपट पण अतिशय सुंदर आहे. चिनी भाषेत डॉ. कोटणीसांना काळी आई असे संबोधले जाते. त्यावरूनच माहितीपटाला नाव दिलेले आहे. देवदूत’ ही डॉ. संजीव शहा यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावरील चरित्रपर कादंबरी लिहिली आहे. सरळ साध्या शैलीतील ही कादंबरी वाचनीय आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे ९ डिसेंबर १९४२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply