नवीन लेखन...

डॉ. जयंत नारळीकर – परिपूर्ण विज्ञान कथाकार

वाचकाला कळायला सहजसुलभ, मानवकेंद्री, नव्या दमाची आणि नव्या मनूची विज्ञान कथा लिहिणारा लेखक म्हणून डॉ. नारळीकर यांची ओळख आहे. त्यांनी केवळ विज्ञान कथा लिहिल्या नाहीत, तर विज्ञान कथा कशी असावी, याचा वस्तुपाठ घालून दिला; आणि त्याचबरोबर तिची समीक्षा कशी करावी, याचे निकषही सांगितले. डॉ. नारळीकरांच्या ललित विज्ञान लेखनाचे पैलू उजेडात आणणारा हा लेख…

— डॉ. बाळ फोंडके


जयंत नारळीकर हा एक सव्वीस वर्षांचा तरुण १९६४ मध्ये इंग्लंडहून भारत भेटीसाठी आला होता. त्यावेळी ठिकठिकाणी त्याला व्याख्यानाची आमंत्रणं होती. मुंबईतही टाटा मूलभूत संशोधन संस्थेत एक व्याख्यान आयोजित केलं होतं. त्याला तुफान गर्दी झाली होती. ते व्याख्यान आपल्याला समजलं, असं शपथेवर सांगणं किती जणांना जमलं असेल, याची शंकाच होती. तरीही एक मराठी माणूस विश्वाची उत्पत्ती कशी झाली, याविषयी काही मौलिक संशोधन करतो आहे; आणि त्याची सार्‍या जगानं दखल घेतली आहे, वाखाणणी केली आहे, एवढी माहिती मराठी माणसाला आपली छाती फुगवायला पुरेशी होती. पण, तेव्हा नारळीकरांची खरी ओळख मराठी जनतेला झाली होती, असं म्हणता आलं नसतं. ती होण्यासाठी आणखी दहा वर्षं जावी लागली. ती झाली तीही एका अनपेक्षित मार्गानं.

वैज्ञानिक परिषदा सहसा धीरगंभीर वातावरणात पार पडतात. आपलं संशोधन समानशीलांच्या पुढं सादर करण्याची ती अनोखी संधी असते. ती साधण्याची धडपड केली जाते आणि आपलं म्हणणं श्रोते लक्ष देऊन ऐकतील, याची खबरदारी घेतली जाते. तरीही काही अपवाद असतातच. त्यांचं व्याख्यान कंटाळवाणं ठरतं. अशाच एका, श्रोत्यांनाच नव्हे, तर सत्राच्या अध्यक्षांनाही जांभई आवरणं मुश्कील करणार्‍या व्याख्यानातून मराठी साहित्याला वेगळी वाट सापडली; आणि साहित्यिक नारळीकरांची ओळख मराठी रसिकांना झाली. गेली पंचेचाळीस वर्षं ती अधिकाधिक दृढ होत आली आहे. आता तर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळाल्यानं त्यावर कळस चढला आहे.

त्या कंटाळा आणणार्‍या व्याख्यानाचा नारळीकरांनी सदुपयोग केला. समोरचं पॅड पुढ्यात ओढून त्यांनी एक विज्ञान कथा लिहायला सुरुवात केली. त्यांचे गुरू फ्रेड हॉएल यांनीही काही उत्कृष्ट विज्ञान कथा लिहिल्या होत्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेत आपणही त्या क्षेत्रात थोडी मुशाफिरी करावी, अशी इच्छा काही वर्षांपासून नारळीकरांच्या मनात झंकारत होतीच. बीज पेरलं गेलं होतं. त्याला अंकुर फुटण्यासाठी योग्य वेळ यायला हवी होती. ती त्या व्याख्यानानं मिळवून दिली. मराठी विज्ञान परिषद आयोजित करत असलेल्या वार्षिक विज्ञान कथा लेखन स्पर्धेतून त्याला खतपाणी मिळालं.

त्यांच्या ‘कृष्णविवर’ या कथेला त्या स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला; तोही नारळीकरांनी आपली खरी ओळख लपविण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही! पुरस्काराची घोषणा झाल्यानंतरच नारळीकर प्रकट झाले. तेव्हापासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर त्यांनी गारूड केलं आहे.

नारळीकरांनी विपुल विज्ञान लेखन केलं आहे; मराठीतून आणि इंग्रजीतूनही. त्यांनीच एके ठिकाणी विज्ञान लेखनाच्या सहा पायर्‍या असल्याचं नमूद केलं आहे. सर्वात पहिल्या पायरीवर असतं, विशिष्ट विज्ञान शाखेतील शोधनिबंधाचं लेखन. पुढं क्रमाक्रमानं विविध विज्ञान विषयातील परीक्षणे, एखाद्या खास मुद्द्यांवरील शोधनिबंधांचा चिकित्सक आढावा घेणारे समीक्षा लेख, विज्ञान माहितीकोश, वर्तमानपत्र आणि तत्सम नियतकालिकांमधील विज्ञान लेख. आणि शेवटच्या पायरीवर असतं, ललित विज्ञान साहित्य; त्यात कथा, कादंबरी, कविता, नाट्य यांचा समावेश होतो. या पायर्‍या चढत जाताना त्या लेखनातलं विज्ञानाचं प्रमाण कमी-कमी होत जातं हे खरं; पण प्रमाणच, महत्त्व नाही. कारण, तसं होताना विज्ञानातल्या तर्कसंगतीला वा अचूकतेला कुठंही धक्का बसणार नाही, याची दक्षता घेतली जाते. पहिल्या पायरीवरचं लेखन विज्ञानप्रचुर असतं हे निर्विवाद; पण, त्याचा वाचकवर्ग मर्यादित असतो. त्या विशिष्ट क्षेत्रातल्या संशोधनात मग्न असणार्‍या समानशीलांसाठीच त्याचं प्रयोजन असतं; पण, जसजशा लेखनाच्या पायर्‍या चढल्या जातात, तसतसा वाचकवर्ग वाढत जातो. विशेष तज्ज्ञांकडून तो सर्वसामान्यांकडे पोहोचू लागतो. जनसामान्यांना विज्ञानाची गोडी लावण्यात ते लेखन कळीची भूमिका बजावतं. आजवर नारळीकर ते निष्ठापूर्वक करत आले आहेत.

नारळीकरांच्या विज्ञान लेखनाचा आवाका मोठा आहे. विद्यार्थीवर्गाच्या अंगभूत कुतूहलाला प्रोत्साहन देणार्‍या ‘पोस्टकार्डावरील विज्ञान’पासून ते अखिल मराठी रसिकांचं अवकाश वृद्धिंगत करणार्‍या ‘आकाशाशी जडले नाते’पर्यंत, त्यांनी वाचकांच्या विविध गटांसाठी लेखणी चालवली आहे. तरीही मराठी मनाला नारळीकरांची ओळख आहे, ती मुख्यत्वे विज्ञान कथाकार अशीच. मराठीत आधुनिक विज्ञान कथेची रुजुवात त्यांनीच केली. आणि तेव्हापासून तिला जी ऊर्जा मिळाली, त्यापायी मराठी भाषेतील विज्ञान कथेचं दालन असं काही समृद्ध होत गेलं, की आज इतर कोणत्याही भारतीय भाषांपेक्षा मराठी विज्ञान कथांचा प्रवाह संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही दृष्टीने, सर्वात सरस आणि जोमदार राहिला आहे.

नारळीकरांच्यापूर्वी मराठीत विज्ञान कथा लिहिल्या जात नव्हत्या, असं नाही. भालबा केळकर, भा. रा. भागवत, द पां खांबेटे, नारायण धारप, द चिं सोमण यांनी तोवर काही उत्तम विज्ञान कथा लिहिल्या होत्या. त्यात ‘चंद्रावरची स्वारी’, ‘अदृश्य माणूस’, ‘झपाटलेला प्रवासी’ यांसारख्या काही दर्जेदार पाश्चात्त्य कथांचा अनुवादही समाविष्ट होता. ज्यूल व्हर्न किंवा एच. जी. वेल्स यांसारख्या नावाजलेल्या लेखकांच्या साहित्यकृतींचे ते तितकेच सरस अनुवाद होते. काही स्वतंत्र कथाही त्या काळात लिहिल्या गेल्या होत्या; पण, त्यांची गणना बालसाहित्यात केली गेली. ते अयोग्य होतं असंही नाही. कारण, एक तर त्या कथांची शैली आणि भाषा बालवाचकांना डोळ्यांसमोर ठेवून निश्चित केली होती. शिवाय, त्यांच्यावर अद्भुतरसाचा पगडा होता. त्यापायी त्या कथा एक प्रकारच्या परीकथा असल्यासारख्याच वाटत. त्यामुळं त्यांना इतर वाचकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्या धाटणीत नसलेल्या काही कथाही लिहिल्या गेल्या होत्या. पण, एकंदरीतच विज्ञान साहित्याची उपेक्षाच झाली. तो प्रवाह कुंठित झाला.

नारळीकरांची विज्ञान कथा यापरती वेगळी होती. ती माणूसकेंद्री होती. अद्‌भूतरसाला त्यात फारसा वाव दिला गेला नव्हता; त्यामुळं ती अधिक विश्वासार्ह झाली होती. वाचकांना ती आपलीशी वाटत होती. विज्ञान कथेला त्यांनी एक नवंच परिमाण दिलं होतं; त्यामुळंच वाचकांचंच नाही, तर ख्यातनाम समीक्षक, संपादक यांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं होतं. एक वैज्ञानिक म्हणून नारळीकरांच्या नावाला जी प्रतिष्ठा लाभली होती, त्याचाही या साहित्यप्रवाहाला नवी दिशा देण्यात काही वाटा होता, हे निश्चित. नारळीकरांची कथा कथाविषयाचे सारे निकष पाळणारी होती, म्हणूनच त्यांचं नाव गुप्त असतानाही, त्यांच्या कथेला पुरस्कार मिळाला होता.

तेव्हा नारळीकरांना आधुनिक मराठी विज्ञान साहित्याचा जनक म्हणावयास प्रत्यवाय नाही. पण त्यांचं साहित्यातलं योगदान त्यांनी या नव्या अवतारातल्या विज्ञान कथा लेखनाचा श्रीगणेशा केला, एवढ्यापुरतं  सीमित नाही. विज्ञान कथा ही कथासाहित्याच्या मुख्य प्रवाहाचाच एक भाग आहे; किंबहुना, ती उद्याची कथा आहे, भविष्यातल्या वास्तवाचा परिचय करून देणारा तो कथेचा अधिक उत्क्रांत अवतार आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. दुर्गाबाई भागवतांसारख्या प्रतिभावंत विदुषीला साहित्यविचारातील हा नवप्रवाह ‘पॅरॅडाईम शिफ्ट’ पटला; आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरूनच त्यांनी त्यांच्या नेहमीच्या रोखठोकपणे ते सांगूनही टाकलं. मग इतरांनीही या नव्या प्रवाहाची दखल घ्यायला सुरुवात केली. समीक्षकांनी जरी तिच्याकडे कानाडोळा केला असला, आणि आजही करत आहेत; तरी संपादक, प्रकाशक आणि मुख्यत्वे वाचक यांचा भरघोस प्रतिसाद आज विज्ञान कथेला लाभला आहे. त्याचं श्रेय नारळीकरांकडेच जातं.

नारळीकरांनी विज्ञान कथेची वैचारिक बैठकही प्रस्थापित केली आहे. विज्ञान कथा का लिहाव्यात? याविषयी त्यांनी शोधनिबंधाइतक्याच तर्कसंगतरीत्या आणि काटेकोरपणे विवेचन केलं आहे. ते म्हणतात, ‘लेखन करताना लिहिणार्‍याच्या डोळ्यांपुढे काही ना काही उद्दिष्ट असतंच. म्हणून ते साहित्य निकृष्ट दर्जाचे ठरत नाही. त्या लेखनाला गालबोट लागण्याचे कारण नाही. उलट, अमुक एक संदेश वाचकासमोर पोहोचवायचा हेतू पुष्कळदा लिखाणाला अधिक जोर, अधिक जिवंतपणा देऊ शकतो.

विज्ञान कथा लिहिताना लेखकासमोर एक विशिष्ट हेतू असू शकेल. त्याला एखादी मनोवेधक वैज्ञानिक कल्पना वाचकापर्यंत आणावयाची असेल; पण, एखाद्या पाठ्यपुस्तकाच्या शैलीत नव्हे. उलट, ती कल्पना कथेच्या रूपात मांडता आली, तर वाचक ती सहजगत्या आत्मसात करू शकेल, अशी भावना लेखकाला प्रेरित करते. एखादी कडू गोळी गिळायला त्रास होतो; पण ती साखरेच्या आवरणात, रंगीबेरंगी अवगुंठनात दिली, तर सहजगत्या घशाखाली उतरते. हे उदाहरण देण्यामागे विज्ञानाला कुरूप किंवा कडू म्हणण्याचा उद्देश नाही, तर त्याच्याकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन कसा असतो, त्यावर भर देण्याचा आहे. शाळाकॉलेजात ज्या अनाकर्षक तर्‍हेने गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जातात, त्यापायी विज्ञानाबद्दल जनमानसात एक प्रकारची अनाठायी भीती वा अनास्था निर्माण झाली आहे.’

विज्ञान शिकवण्याच्या हेतूनं आपण विज्ञान कथा लिहितो, या नारळीकरांच्या विधानाचं कोलीत करून समीक्षकांनी एकूणच विज्ञान कथेला, ‘हे साहित्यच नव्हे’, असं म्हणत वाळीत टाकण्याचे प्रयत्न केले आहेत. पण, तसं करताना त्यांच्या विधानाचा संदर्भरहित आणि सोयीस्कर वापर त्यांनी केला आहे. कारण, विज्ञान कथा ही कथाच असावी, ललित लेखनाच्या यच्चयावत निकषांवर ती खरी उतरायला हवी, हेही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे, याकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं आहे.

केवळ तसं सांगून नारळीकर स्वस्थ बसलेले नाहीत. आपल्या कथांमधून त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला आहे; अगदी पहिल्यावहिल्या कथेपासून. त्यांची ‘कृष्णविवर’ ही कथा कृष्णविवराच्या गुणधर्मांची माहिती जरूर देते; पण, कथेच्या परिपोषासाठी आवश्यक तेवढीच. त्यातली जटिलता आणि गणिती समीकरणं, भाषा संपूर्णपणे टाळून. तो ललित अंगानं लिहिलेला का होईना, पण विज्ञान लेख नाही, याचं भान त्यांनी कुठंही सुटू दिलेलं नाही. म्हणून ती कृष्णविवराची कथा होत नाही, तर त्याच्या गुणधर्मांपायी दोन मित्रांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामांचा वेध घेत, त्यांच्या भावजीवनात निर्माण झालेल्या आवर्तांचा तळठाव ती कथा घेते. त्यातलं व्यक्तिरेखाटन ठसठशीत आहे. त्या दोन मित्रांच्या कुटुंबांची पार्श्वभूमी ठळक आहे. ती कथा माणसांची आहे, यंत्राची नाही. आपल्या परिसरातच कदाचित हे दोन मित्र वास्तव्य करून असतील, त्यांची आणि आपली गाठभेटही पडू शकेल, असा विश्वास कथा वाचकाच्या मनात उत्पन्न करते.

त्यानंतरच्या ‘उजव्या सोंडेचा गणपती’ या कथेनं तर त्यांची विज्ञान कथेसंबंधीची भावना अधिकच प्रकर्षानं पुढं आली. विशिष्ट संस्कार केलेल्या, मूलकणांच्या झोताच्या प्रभावात सापडलेल्या वस्तूचं, तिच्या आरशातल्या प्रतिबिंबात रूपांतर होतं, ही वैज्ञानिक कल्पना. ती मध्यवर्ती असल्यामुळं तिची ओळख वाचकाला त्यांनी करून दिली
आहे; पण, कथा फुलवण्यासाठी आवश्यक तेवढीच आणि तीही व्यवहारातले काही दाखले देत, सुबोध प्रासादिक भाषेत.

पण, ती कथा त्या मूलकणांची नाही. त्यांच्या प्रभावापोटी उजव्या हातानं गोलंदाजी करणार्‍या क्रिकेटपटूचं डावखुर्‍या खेळाडूत रूपांतर झाल्यामुळं, त्यानं गाजवलेल्या त्याच्या अखेरच्या सामन्यातल्या पराक्रमाची आहे. त्याच्या या नव्या रूपापायी प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंची कशी भंबेरी उडते आणि तो आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून देऊन, आपल्या कारकिर्दीची कशी देदिप्यमान सांगता करतो, याची ती कथा आहे. त्या गोलंदाजाच्या मनातील वादळाचा अचूक वेध घेत ती कथा फुलत जाते. वाचकाच्या मनाचा ठाव घेते. त्या गोलंदाजाची ती करामत हा अद्भुत चमत्कार वाटत नाही. त्याचा तो पराक्रम विश्वासार्ह वाटतो. तो गोलंदाज हाडामांसाचा माणूस आहे, कोणी यंत्रमानव नाही, याचा विश्वास वाटतो. कारण, आपल्या कारकिर्दीची अखेर विजयी स्तरावर व्हावी, ही त्याची इच्छा तुमच्या-आमच्यासारख्या माणसाची आहे. त्याचीच ती कथा आहे. उद्या-परवा तो गोलंदाज शिवाजी पार्कवर सराव करताना दिसला, तर आश्चर्य वाटणार नाही, याची खात्री पटते.

विज्ञानातील संशोधनांमुळे होऊ शकणार्‍या काही अनिष्ट परिवर्तनांची दखल घेत, तिच्याबद्दल सावधानतेचा इशारा देण्याचं कामही नारळीकरांची कथा करते. ‘पुत्रवती भव’ ही कथा त्याची प्रचिती देते. मुलगाच हवा, या ध्यासापायी आपल्या समाजात ज्या काही अनिष्ट प्रथा प्रभावी झाल्या आहेत, त्यांना खतपाणी घालण्याचं काम काही विज्ञान संशोधनापायी होऊ शकेल, याची जाणीव नारळीकरांच्या दूरदृष्टीला होते. त्यापायी धोक्याची घंटा वाजवणं, हे विज्ञान कथाकाराचं कर्तव्य आहे, यावर नारळीकरांचा ठाम विश्वास आहे. तेच काम ते करतात, पण कथेच्या माध्यमातून. त्यामुळं त्यांचा इशारा अधिक परिणामकारक होतो, यात शंका नाही.

त्यांच्या ‘हिमयुग’, ‘धूमकेतू’ यांसारख्या कथांमधून आणि ‘वामन परत न आला’, ‘अंतराळातील स्फोट’ यांसारख्या कादंबर्‍यांमधूनही हे प्रकर्षानं जाणवत राहतं. नारळीकरांच्या कादंबर्‍यांनी त्यांच्या कथेइतकी मराठी रसिकांची पकड घेतलेली नाही. त्यांच्या कादंबर्‍या प्रदीर्घ कथाच आहेत. कादंबरीचा रूपबंध कथेच्या रूपबंधापेक्षा वेगळा असतो. नारळीकरांच्या कादंबर्‍यांची जडणघडण मुख्यत्वे कथेसारखीच झाली आहे. नारळीकरांची जनमानसातली ओळख ही विज्ञान कथाकार अशीच आहे, त्याचं हेही एक कारण आहे.

विज्ञान कथेमध्ये भविष्यातील काही संभाव्यतांचं वर्णन केलेलं असतं. ते खरोखरीच प्रत्यक्षात उतरेल का, या प्रश्नाचं उत्तरही नारळीकरांनी दिलेलं आहे. अशी वास्तविकता लाभलेली विज्ञान कथांची उदाहरणं कमी नाहीत. एच. जी. वेल्सच्या ‘अदृश्य माणूस’ या कथेतली संकल्पना, आज जी रडारला हुलकावणी देणारी म्हणजे स्टेल्थ विमानं तयार झालेली आहेत, त्यांच्यातून प्रत्यक्षात उतरलेली दिसून येते. ज्यूल व्हर्न या एकोणिसाव्या शतकातल्या विज्ञान कथाकारानं केलेलं चंद्रावरील स्वारीचं वर्णन, विसाव्या शतकात ‘अपोलो ११’ या यानातून केलेल्या प्रत्यक्ष चंद्रसफरीशी बरंच साम्य दाखवतं. ‘पुत्रवती भव’मध्ये प्रसूतीपूर्व गर्भलिंग चाचणीच्या तंत्रज्ञानाच्या अवैध दुरुपयोगापायी उद्भवू शकणार्‍या सामाजिक अरिष्टाची दखल घेतली गेली आहे. ते आज भयकारी अवस्थेत आपल्यापुढं उभं ठाकलं आहे. विज्ञान कथा अशा रीतीनं भविष्यवेधी असावी, पण ती भविष्यद्रष्टी ठरली नाही म्हणून ती निकृष्ट होत नाही, हेही नारळीकर आवर्जून सांगतात.

किंबहुना, कोणती विज्ञान कथा उत्कृष्ट मानावी आणि कोणती निकृष्ट, यासंबंधीचे निकषही त्यांनी स्पष्ट केले आहेत. ते म्हणतात, ‘उत्तम विज्ञान कथेच्या गाभ्यात जे विज्ञान असतं, ते सध्याच्या माहितीप्रमाणे बिनचूक तर असतंच; शिवाय भविष्यात ते कुठं गेलेलं असेल, याचीही माहिती देणारं असतं. अर्थात, हे भविष्यातले आडाखे बिनचूक असतीलच असं नाही, पण ते सध्याच्या माहितीशी विसंगत नसावेत. माझ्या लेखी विज्ञान कथेची क्षमता विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांवर ती किती भाष्य करते, यावर देखील अवलंबून असावी.’

विज्ञान कथेमागचं विज्ञान कथेच्या ओघात अलगदपणे यावं, यावरही त्यांचा कटाक्ष आहे. त्यासाठी ते ज्यूल व्हर्नच्या ‘अराऊंड द वर्ल्ड इन एटी डेज’चा दाखला देतात. सतत पूर्वेकडे जात जगाला प्रदक्षिणा घालताना एका दिवसाचा कसा लोप होतो, हे त्या कथेचा गाभा असणारं तत्त्व, एखाद्या उत्कृष्ट रहस्यकथेच्या थाटात शेवटी उलगडून दाखवत, कादंबरी वाचकाला आश्चर्याचा धक्का देते. त्याच सहजतेनं विज्ञान कथेमधून विज्ञान वाचकासमोर आलं पाहिजे, असा दंडकच नारळीकरांनी घालून दिला आहे. त्यांनी स्वतः तर तो पाळलाच आहे.

विज्ञान कथेतील विज्ञान आणि कल्पित यांच्या मर्यादाही त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. विज्ञान कथेतील विज्ञान आजच्या प्रस्थापित विज्ञानाच्या कांकणभर पुढं गेलेलं असलं तरी चालतं; किंबहुना, तसं ते असायलाच हवं. नाहीतर ती कथा होत नाही, असा त्यांचा आग्रह आहे. पण, त्याचबरोबर ते प्रस्थापित विज्ञान अचूक आणि आहे तसंच असावं; त्यात कोणताही बदल करण्याचा अधिकार लेखकाला नाही, याचीही जाणीव ते करून देतात. म्हणून तर पोएटिक लायसेन्स, काव्यात्म स्वातंत्र्याच्या नावाखाली मिथ्य विज्ञानाचा प्रसार करणं, त्यांना अक्षम्य वाटतं. अशा कथा विज्ञानवृक्षाला मारकच ठरतात, असं त्यांचं मत त्यांनी अतिशय परखडपणे मांडलेलं आहे.

याच कारणास्तव ‘स्टार वॉर्स’ किंवा ‘इंटरस्टेलर’ या चित्रपटांना विज्ञान कथा मानणं त्यांना मंजूर नाही. त्यातील अंतराळयानं, विचित्र जीवजंतू, महाभयंकर शस्त्रास्त्रं यांचा मुलामा काढला, तर ते कोणत्याही देमार चित्रपटापेक्षा वेगळे वाटत नाहीत, हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. अशा विज्ञान कथेतलं विज्ञान एक अनाकलनीय, पण भीतीदायक विषय आहे; अशीच वाचकाची किंवा प्रेक्षकाची भावना होते, याबद्दल शंका नाही. खरं तर आजमितीला कितीतरी अतिसंहारक शस्त्रांचा साठा जगात आहे. त्यांच्यापासून असणारा धोका विशद करणार्‍या उत्तम विज्ञान कथा लिहिल्या जाऊ शकतात. त्यांना उत्तम एवढ्यासाठी म्हणायचं, की त्यांच्यामध्ये तर्कशून्य भीतीला वाव नसतो. त्यांच्यापोटी होऊ शकणार्‍या विनाशकारी संहाराचं प्रत्ययकारी चित्रण करताना, कुठंही तर्कसंगतीला सोडचिठ्ठी दिली जात नाही, की संयत भाषेचा त्याग केला जात नाही. नारळीकरांची ‘पुत्रवती भव’ ही अशा प्रकारची एक उत्कृष्ट कथा आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सेच्या दुरुपयोगामुळं संभवणारी समाजहानी विशद करणारी त्यांची भाषा चित्रदर्शी असली, तरी ती कुठंही आक्रस्ताळी होत नाही. म्हणूनच ते जेव्हा म्हणतात, ‘ज्या विज्ञान कथेत तर्कशून्य विधानं आढळतात, तिला सर्वात निकृष्ट विज्ञान कथा म्हणावं’ तेव्हा विज्ञान कथेच्या मूल्यमापनाचे तत्त्वच ते सांगून जातात.

नारळीकरांनी विज्ञान कथेची समीक्षा कशी करावी, हेही सांगून टाकलं आहे. विज्ञान कथेची समीक्षा कोणत्या रूपबंधांनुसार करावी, असा प्रश्न विचारणार्‍या समीक्षकांची अडचण सोडवत, त्यांनी अशा समीक्षेचा वस्तुपाठच घालून दिला आहे. या समीक्षेसाठी त्यांनी षट्‌सूत्री आखून दिली आहे. कोणतीही कथा वा कादंबरी यांच्या बाबतीत लावायचे निकष वापरून लेखनाचं मूल्यमापन कसं होतं? विज्ञानाचा कथानकात कितपत भाग आहे? यांसारखे सहा प्रश्न समीक्षकांनी विचारावेत; आणि त्यांच्या उत्तरांच्या संदर्भात त्या साहित्याचं एकत्रित समालोचन करावं, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

विज्ञान कथेच्या सर्व अंगांचा, सर्व पैलूंचा सखोल आणि तर्कबद्ध विचार नारळीकरांनी केलेला आहे. आपल्या लेखनातून त्याचा साक्षात्कारही घडवला आहे. म्हणूनच त्यांना परिपूर्ण विज्ञान कथाकार म्हणण्यास प्रत्यवाय
नाही.

— डॉ. बाळ फोंडके

— मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने 
`पत्रिका’ या मासिकातून

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..