२६ जानेवारी २०१४ ला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचा जन्म १९४९ साली सातारा जिल्ह्यातील ‘मसूर’ला झाला. नंतर ते कराडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून बीएस्सी करून मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियांत्रिकीत बीई, एमई व पीएच.डी. झाले. त्यानंतर त्यांनी तेथेच अध्यापनाचे काम सुरू केले.
२००४ ते २००९ या काळात ते संस्थेचे संचालक होते. रसायन अभियांत्रिकी या शास्त्रातील गेल्या ३५ वर्षांतील त्यांच्या संशोधनातून त्यांनी नानाविध प्रक्रियांची कारणमीमांसा शोधून काढली. उपलब्ध संयंत्रात सुधारणा केल्या, त्यातील वीज व इंधन बचत करून प्रक्रिया सोप्या आणि स्वस्त केल्या.
उत्पादनास लागणाऱ्या निरनिराळ्या टप्प्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून उत्पादनास लागणारा वेळ व येणारा खर्च क़मी करणे हा त्यांच्या संशोधनाचा मूळ उद्देश असतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी त्याचे गणिती प्रारूप मांडावे लागते, ते काम डॉ. जोशी सातत्याने करीत असतात. यासाठी त्यांना जागतिक कीर्ती मिळाली आहे.
डॉ. जोशी ज्या ज्या गोष्टींचे गणिती प्रारूप मांडतात, त्या गोष्टी ते प्रायोगिक पद्धतीने सिद्ध करून दाखवतात. द्रव, घन आणि वायू या तिन्ही रूपांतील रसायनांवरील प्रक्रियेत घडून येणाऱ्या प्रवाहितेबद्दल संशोधन करून त्यात येणाऱ्या अडचणींवर त्यांनी उपाय शोधून काढले आहेत. यासाठी ते गणिताबरोबर संगणकाचाही उपयोग करतात.
दोन रसायनांच्या मिसळण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ होण्यासाठी लागणाऱ्या संयंत्रांच्या अनेक रचना त्यांनी शोधून काढल्या. प्रक्रियेतील मिसळण्याचा मोजण्यासाठी त्यांनी लेझर रसायने वेग प्रणाली वापरली. रासायनिक प्रक्रियांचा वेग, तापमान व दाब मोजण्याचे अचूक तंत्र त्यांनी शोधून काढले. ऊर्जानिर्मिती व ऊर्जाबचत यात त्यांना विशेष रस आहे. सुधारित चुली, उष्णतेची बचत, सौरऊर्जेवर चालणारे शीतीकरण, पवनशक्तीचा वापर यावर त्यांचे संशोधन चालू आहे.
त्यांच्या हाताखाली ५७ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली व ५६ विद्यार्थ्यांनी एमएस्सी केले. आजवर ४००० पेक्षा जास्त अभ्यासकांनी, डॉ. जोशींनी लिहिलेले निबंध वापरले आहेत.
Leave a Reply