आज मी सतीश चाफेकर आहे…त्याचे श्रेय मिशिगन इंजिनिर्सचे डॉक्टर पटेल याना द्यावे लागेल. कालच त्यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. मी त्यांना माझे ‘गॉडफादर’ समजतो. त्यांच्यामुळे मी टफ झालो, कोणतेही संकट आले तर त्याला तोड देण्यास सिद्ध झालो. आजही मी जे काही असेल चुकीचे असो बरोबर असो स्वतः करतो, स्वतः लिहितो, सोशल माध्यमावर मी दुसऱ्याच्या पोस्ट कधीच फॉरवर्ड करत नाही. अगदी रेअर करतो. तर स्वतः लिहितो, कारण स्वतःच्या प्रयत्नाला जास्त महत्व देतो. जगात काहीच अशक्य नाही हे मी त्यांच्याकडून शिकलो त्यासाठी अचूक टायमिंग आणि अभ्यास असणे गरजेचे असते. आपल्या देशात टायमिंग खूप महत्वाचे. मी जे पुस्तक लिहीत आहे त्याचे नाव, ‘मी सह्याजीराव’ हे असून त्यातील काही भाग देत आहे. डॉकटर पटेल यांची आठवण म्हणून.
कंस्ट्रक्शन कंपनीमधील साईटवरची नोकरी म्हणजे कुठेलच बंधन नसायचे, फक्त हुक आणि क्रूक काम करणे आणि कंपनीचे कमीतकमी नुकसान करणे. तेथे हे माझे काम नाहीं हा रुबाब नाही. रुबाब केला की संध्याकाळी घरी बसा, हल्ली सरकारी खात्यात, बँकेमध्ये हे माझे काम नाही सांगितले की मोकळे, अरे आपण दहजारो रुपये दिवसाला कमवतो याचाही कुणीही विचार करत नाही आपल्याला जी ऑर्गनायझेशन पगार देते तितके आपण काम करतो का ह्याचा विचारही केला जात नाही. फक्त सवलती हव्यात त्यामुळेच हे पब्लिक सेक्टर घाट्यात गेले आणि खाजगीकरणाचे वारे सुरु झाले.
परंतु कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये हे चोचले कधीच नसतात. मला आठवतंय आमचे काम चेंबूरच्या माहुल गावातील समुद्रात चालले होते, मांडीभर चिखलात पायलिंग करून टॉवर उभारण्याचे काम चालू होते, ओहोटी आल्यावर मांडीभर चिखलात उतरावे लागणार होते मी हाफ चड्डी घालून इतरांबरोबर चिखलात घुसलो, घट्ट चिखल असल्यामुळे चपला, गमबूट घालणे अशक्यच. पायाला खाली खेकड्यांचा आणि बोचऱ्या कातळाचा स्पर्श होत होता, तितक्यात मी मागे पाहिले आमचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. पटेल पण चिखलातून येऊ लागले, मी म्हणालो, “साब आप,” तशी माझ्यावर खेकसले, “तू, तू जा सकता, मै क्यू नाही, आगे चल…” मी चूप. डॉ. पटेल भडकले की त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नसत.
डॉ. पटेल आपल्यावर भडकावेत म्हणून अनेक प्रयत्न करत असत, कारण ते ज्याच्यावर भडकले की त्याचे खऱ्या अर्थाने कल्याण होत असे कारण तो माणूस त्यांच्या लक्षात रहात असे आणि पगारवाढ वगैरे पुढे आलीच. आमच्या इथे एक कॉन्ट्रॅक्टर होता, त्याने काही चूक केली तेव्हा डॉक्टारांनी त्यांना असा एकदाच हाणला, त्याचा दातच पडला, पण त्याला पुढे डॉक्टरांनी सोन्याचा दात लावून दिला, तो अभिमानाने तो प्रसंग सोन्याचा दात दाखवून सर्व कथा सांगत असे. तो कंपनीचा लाईफ मेंबर झाला. आता कुठे आहे ते माहित नाही.
आमच्या डॉ. पटेल यांच्यामुळे मी एकच शिकलो ते म्हणजे जगात काहीही अशक्य नाही आणि आज मी जो काही आहे, ती जिद्द माझ्याकडे डॉक्टर पटेल यांच्याकडून आली, त्याचे वडील शेतकरी होते, पण ते खूप हुशार, बस एक प्रसंग त्याच्या आयुष्यात असा घडलं आणि यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले, डायरेक्ट मिशीगन विद्यापिठात गेले आणि डॉक्टरेट घेऊन तेथे न रहाता, भारतात आले आणि स्वतःचा व्यवसाय जिद्दीने सुरु केला आणि यश मिळवले, आणि दुसरे म्हणजे त्यांच्याकडे परफेक्ट ‘ टायमिंग ‘ होते. त्यांच्याकडे एखादी गोष्ट करण्याचे टायमिंग होते. ते बरोबर टायमिंग साधून कंपनीमध्ये, त्याच्या कारभारामध्ये वाढ करत असत. त्यांनी कधी खोटी कामे केली नाहीत, क्लायंटला फसवले नाही. क्लायंट त्यांच्यावर खुश असे कारण काम चोख होत असे. त्यांच्याकडून जिद्द आणि टायमिंग मी शिकलो.
दोन वर्षांपूर्वी माझे बॉस अनिल परुळकर यांच्या मुलीच्या लग्नात भेटले दोन वर्षांपूर्वी, तेव्हा डॉ. पटेल यांच्याबरोबर हिंमत करून सेल्फी काढला होता.
कालच डॉ. एम.एन. पटेल ह्यांचे निधन झाले. खूप वाईट वाटले माझा खडतर काळ डोळ्यासमोर आला. त्यांनी मला मी नोकरी सोडताना सांगितले होते ‘फिरसे जॉब करना हो तो मेरे पास आना.’ ह्या आश्वासना मी निर्धास्त पणे अनेक चॅलेंज स्वीकारत गेलो, यश मिळत गेले. त्याच्या दोनच करणे होती अभ्यास आणि टायमिंग.
डॉक्टरसाब गुड बाय…
— सतीश चाफेकर.
Leave a Reply