नवीन लेखन...

जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे

महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करताना माधवराव चितळे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३४ रोजी औरंगाबाद येथे झाला. नेपाळ, भूतान, बांग्लादेश व पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांबरोबर शांततापूर्ण मार्गाने केलेला पाणीवाटपाचा करार असो, भारताची पहिली राष्ट्रीय जलनीती साकारणं असो, किंवा राष्ट्रीय जलदिन साजरा करण्याची कल्पना राबवणं असो, प्रत्येक टप्प्यावर डॉ. माधवराव चितळे हे नाव, पाण्याशी जोडलेलं आहे.

डॉ. माधव चितळे यांचे शालेय शिक्षण चाळीसगाव येथे झाले. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर माधव चितळे यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हिलची पदवी प्राप्त केली.

माधव चितळे यांनी १९९२ पर्यंत सरकारी नोकरीच्या माध्यमातून आणि निवृत्तीनंतर अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात योगदान दिले आहे. पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी त्यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुढे नगरचा मुळा प्रकल्प, मुंबईचा भातसा प्रकल्प येथेही अभियंता म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर कोयनेच्या भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांची नियुक्ती चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे झाली. पुढे प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूलच्या आंतरराष्ट्रीय व सामाजिक व्यवहाराच्या अभ्यासक्रमासाठी चितळे यांचं नाव सुचवलं गेलं.

१० वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केलेल्या लोकांमधून जगभरातील ४० व्यक्तींची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. चितळे यांची या मुलाखतीतून निवड झाली. प्रिन्स्टनमध्ये त्यांनी ‘सर्वोत्तम पर्विन फेलो’ हा सन्मान पटकावला. त्यापुढील काळात दिल्लीत केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

५ वर्षांच्या या दिल्लीतील नियुक्तीचा काळ संपत येत असतानाच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जलसंपदा मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली. जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असतानाच सामान्य जनतेच्या मनात पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून चितळे यांनी जल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त दिल्लीत साजरा होणारा हा जल दिवस पुढे १९९२ साली भारतभरात १२०० ठिकाणी साजरा झाला. सरकारी सेवेतून निवृत्तीनंतर १ जानेवारी १९९३ रोजी आंतरराष्ट्रीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे सरकार्यवाह म्हणून माधव चितळे यांची नियुक्ती झाली.

जलसंधारण आणि जलसंपदेबाबत जनजागरण या क्षेत्रांमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना १९९३ सालच्या स्टॉकहोम वॉटर प्राईझ या पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलसंधारणाबरोबरच अन्यही अनेक क्षेत्रांत चितळे यांचे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे. औरंगाबाद येथे वाल्मीकि रामायणावर त्यांनी दिलेली ८८ प्रवचने पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली आहेत. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेच्या प्रसारासाठीही ते काम करीत असतात.

माधव चितळे यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. आशा पटवर्धन विद्यार्थीदशेत स्वतः उत्तम खेळाडू, संगीत विशारद व सुवर्णपदक विजेती होत्या. विजया चितळे यांनी त्यांच्या माधव चितळे यांच्या बरोबरच्या सहजीवनावर ‘सुवर्णकिरणे’ या नावाने पुस्तक लिहिले आहे.

संजीव वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..