पॉल रत्नसामी यांचा जन्म चेन्नईला १९४२ साली झाला. चेन्नईच्या विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्यांनी न्यूयॉर्क येथील क्लार्कसन तंत्रशास्त्र महाविद्यालयात संशोधन केले व पुढे बेल्जियम येथील लिव्हान विद्यापीठात प्रा. फ्रिप्लाट यांच्याबरोबर संशोधन केले. औद्योगिक उत्पादन करताना वापरावी लागणारी उत्प्रेरके (Catalyst) हा या दोन्ही ठिकाणच्या संशोधनाचा विषय होता. परदेशाहून परत येऊन रत्नसामींनी डेहराडूनच्या इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियममध्ये काम केले. तेथे उत्पादने होत असताना अनेक उत्प्रेरके वापरावी लागतात.
उत्प्रेरके वापरल्या जाणाऱ्या या प्रक्रियांचे सुलभीकरण आणि सुरक्षितता यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नंतर याच कामासाठी पॉल रत्नसामी यांना जर्मनीतील म्युनिच विद्यापीठात प्रा. कनोझिर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
त्यानंतर मात्र ते पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करू लागले. १९९५ ते २००२ या काळात ते एनसीएलचे संचालक होते. येथेही त्यांनी उत्प्रेरकावरील आपले संशोधनाचे काम चालू ठेवले. परिणामी आज या विषयातील संशोधन कार्यास एनसीएलला जगन्मान्यता मिळाली आहे. यातून एनसीएलने अनेक पेटंट्स तर मिळवलीच, पण कोट्यवधी रुपयांचा व्यवसायही मिळवला.
झिओलाइट हे निसर्गात मिळणारे खनिज आहे. त्यामध्ये अॅल्युमिनिअम सिलिकेटबरोबर इतर अल्कली मूलद्रव्येही असतात. विशिष्ट रासायनिक गुणधर्मामुळे अशा प्रकारच्या संयुगांचा उपयोग उत्प्रेरक म्हणून करता येतो. पॉल रत्नसामी एनसीएलमध्ये झिओलाइट यांनी बनवायला सुरुवात केली. त्यांनी झिओलाइटमध्ये, मॅग्नेशिअम कॅल्शिअमसारखी मूलद्रव्ये आणि घालून त्याच्या गुणधर्मात बदल घडवून आणले आणि त्याचे उपयोग वाढविले. जगभरातल्या अनेक पेट्रोरसायन कंपन्या एनसीएलची ही उत्प्रेरके नेहमी विकत घेत असतात. पॉल रत्नसामी यांनी आजवर १६० संशोधन निबंध लिहिले, तर त्यांच्या नावावर ३५ पेटंट्स आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्राप्त झाली. अत्यंत अमूल्य संशोधनाने पॉल रत्नसामी यांनी भारताच्या रसायनशास्त्र संशोधन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
Leave a Reply