नवीन लेखन...

मराठी लेखक डॉ. राजन गवस

मराठी लेखक डॉ. राजन गवस यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. राजन गवस यांनी भाऊं पाध्ये यांच्या साहित्यावर पीएच. डी. केलेली आहे. राजन गवस यांनी साधारण ऐंशीच्या दशकात लिहायला सुरुवात केली. कविता, कथा, कादंबरी आणि ललित लेखन अशा मार्गावरून त्यांची लेखणी चालत राहिली. या सा-याच लेखनात राजन गवस यांच्या लेखनाचे तीन पैलू प्रामुख्यानं नजरेत भरतात. त्यांची विश्वजवात्सल्य आणि कारुण्यानं भरलेली आणि भारलेली दृष्टी, निर्णयच नव्हे तर मतही न देता वास्तवाच्या तटस्थ पण कलात्मक दर्शनानं वाचकावर दाखवलेला विश्वा स आणि तिसरं म्हणजे कृषिप्रधान जगण्याकडे एकाच वेळी आतून येणा-या जाणिवेने आणि दूरस्थ तटस्थपणे (क्वचितप्रसंगी आत्मटीकेनेदेखील) पाहण्याची क्षमता. या तीन पैलूंमध्ये उपजतच अंतर्विरोध आहेत, ताण आहेत; पण ते संतुलित करणं हेच राजन गवस यांचं कौशल्य आहे. उदाहरणार्थ, पहिला पैलू कारुण्य आणि विश्ववात्सल्य. म्हणजे गवस आपल्या कथेतल्या वरकरणी खल किंवा चूक वागणार्याल पात्रांचीही टर किंवा खिल्ली उडवत नाहीत, निवेदनकर्त्याला मिळणारा उपजत फायदा घेत अशा पात्रांच्या चुका सव्याज त्यांच्या पदरात टाकत नाहीत. दोनच उदाहरणं घेऊ या. ‘भंडारभोग’ या जोगत्याच्या जीवनावरच्या कादंबरीत सुरुवातीच्या भागात क‘व्वा वगैरे पात्रं अंधश्रद्धेनं अत्यंत अडाणी, चुकीचं आणि अन्याय्य वागत असतानादेखील गवस यांच्यातला निवेदक अशा पात्रांचा उपहास करत नाही.

संपूर्ण तादात्म्यानं आणि सहानुभावानं त्यांचं चित्रण करतो. दुसरं उदाहरण- ‘तणकट’ कादंबरीत गौतम वगैरे पात्रं उघड उघड चुकीच्या मार्गानं आणि अल्पावधीत मोठा लाभ मिळवण्यासाठी गैरमार्गावर जातात, पण गवस यांचा निवेदक कोणतीही बाजू घेत नाही, उलट त्या त्या पात्राला समजून घ्यायचं आवाहनच करतो वाचकाला. हे दुर्मिळ आहे. करुणेबरोबरच आढळणारी ही तटस्थता चकित करणारी आहे. कारण त्यांच्या तथाकथित नायकालादेखील झुकतं माप द्यायचा आक्रस्ताळा उपद्व्याप इथे नाही. शक्यतो मतं बनवण्याचं स्वातंत्र्य वाचकालाच द्यायचं परिपक्व भान दाखवतात गवस. अजून एक अंतर्विरोध म्हणजे कधी राजन गवस यांचा नायक किंवा निवेदक कृषिसंस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो, तर कधी त्या संस्कृतीपासून दूर गेलेल्या, अपराधगंड बाळगणार्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करतो. या दोन्ही भूमिका कित्येकदा एकमेकांविरुद्ध उभ्या असतात, पण गवस यातही आपलं निर्णायक मत लादत नाहीत हे विशेष.

राजन गवस यांनी प्रामुख्याने तीन-चार विषयांवर लिहिलं आहे. सर्वप्रथम म्हणजे ‘देवदासी’ आणि ‘जोगते’ या अनिष्ट रूढींच्या भयावह वास्तवाचं चित्रण. ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’ या कादंब-या आणि ‘खांडुक’, ‘हुंदका’ यासारख्या कथांमधून ते प्रगटतं. दुसरा विषय म्हणजे गावपातळीवर चालणारं पंचायती, सोसायट्या वगैरेमधलं राजकारण आणि त्याला असलेली जातीयतेची डूब. ‘धिंगाणा’, ‘कळप’, ‘तणकट’ या कादंब-या आणि ‘ठराव’, ‘नवाचं तीन चतुर्थांश’ वगैरे कथांतून हे चित्रण प्रभावीपणे आलं आहे. एकूणच गावगाड्याचं प्रभावी चित्रण इथे दिसतं. तिसरं म्हणजे ग्रामजीवनापासून दुरावलेल्या सुशिक्षित माणसांचा अपराधगंड हे आशयसूत्र त्यांच्या अनेक कथांचा विषय झालं आहे, आणि याचबरोबर आत्मनिर्भर होऊ पाहणारी स्त्री हाही त्यांच्या अनेक कथांचा विषय आहे. ‘रिवणावायली मुंगी’, ‘तळ’, ‘घुसमट’ अशा अनेक कथा स्त्रीकेंद्री आशय व्यक्त करतात. एकूणच, हरवत चाललेली मूल्यं, निसर्ग आणि माणूसपण हे त्यांच्या ललित लेखनचे विषय आहेत. बाईचं जगणं मात्र नेहमीच त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे.

भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये आणि रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर राजन गवस यांनी बारकाईनं अभ्यास करून समीक्षात्मक लेखन-संपादन केलं आहे. गवस यांच्या साहित्यात मांडणी आणि अभिव्यक्तीवर कळत-नकळतपणे या साहित्यिकांचा प्रभाव पडलेला दिसतोच. विशेषत: ‘चौंडकं’ आणि ‘भंडारभोग’ या सुरुवातीच्या कादंब-यांनंतरच्या लेखनाबाबत हे विशेष जाणवतं. ‘धिंगाणा’ कादंबरीतलं पहिलं वाक्य ‘आमचा बाप मला उपकाराखातर जेवाय घालतो हा त्याचा समज’ असं आहे. ही मानसिकता नेमाडे यांच्या नायकाची वाटते. या कालखंडातल्या गवस यांच्या कादंब-यांवर या परात्म, हताश नायकाने केलेल्या दंभस्फोटांची गडद छाया आहे. या लेखनाला अनुकरण किंवा प्रभाव यापलीकडे जाऊन बघायला हवं. त्यात एका विशिष्ट वाङ्‌मयीन दृष्टीचा डोळस स्वीकार दिसतो आणि ‘तणकट’च्या निमित्ताने आपली स्वत:ची वाट ओळखण्याचा ठळक प्रयत्नही दिसतो. या दृष्टीनं ‘कळप’ या कादंबरीची अर्पणपत्रिका आवर्जून बघावी अशी आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ संजय भास्कर जोशी

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..