ज्येष्ठ इतिहास संशोधक, लोकसंस्कृतीचे उपासक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी तळेगाव दाभाड्याजवळील निगडे या गावी झाला.
वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्यावरील आईवडिलांचे छत्र हरपल्यानंतर पुढे त्यांचे संगोपन झाले ते त्यांच्या आजोळी. प्राथमिक शिक्षण पालिकेच्या ८ व ३५ क्रमांकाच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना इंग्लिश स्कूल आणि पूना नाइट हायस्कूलमध्ये असे त्यांचे शालेय विश्व.
सन १९५० मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. या दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषदेची साहित्यविशारद व महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेची हिंदी साहित्य प्रवीण ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले. माध्यमिक शिक्षणाच्या काळात दिवसा छापखान्यात मुद्रितशोधक म्हणून त्यांनी नोकरी केली. ढेरे यांच्या लेखनाचा प्रारंभ झाला तो साधारण १९४८ मध्ये, वयाच्या अठराव्या वर्षी कवितेतून. पुढे दोनच वर्षांत, १९५० मध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तिका प्रकाशित केली.
‘जनाबाई: जीवन, साधना आणि कविता’ आणि ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या दोन पुस्तिकांचे लेखन याच दरम्यानचे. सन १९५५पासून त्यांचे संशोधन आणि लेखन सातत्याने चालूच होते. १९६६ मध्ये ते पुणे विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले, तर १९७५ मध्ये पी.एच.डी प्राप्त केली. १९८० मध्ये त्यांना पुणे विद्यापीठाची डी. लिट. मिळाली.
भारतीय एकात्मतेची पुष्टी करणारी विधायक अध्ययनदृष्टी, आंतरशाखीय अभ्यासपद्धती ही ढेरे यांच्या विचाराची, लेखनाची वैशिष्ट्ये होती. एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे त्यांनी सारे आयुष्य संशोधन, लेखन यांसाठी दिले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला करण्याचे ठरवले. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची ठरतील. त्यांच्या संशोधनाचे संदर्भ जगभरातील संशोधकांना मिळावेत यासाठी www.rcdhere.com ही वेबसाइटही सुरू करण्यात आली आहे. रामचंद्र चिंतामण ढेरे यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आणि मिलिंद ढेरे नावाचा छायाचित्रकार मुलगा आहे.
रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे निधन १ जुलै २०१६ रोजी झाले.
त्यांची साहित्यसंपदा:
अमृतकन्या, श्री आनंदयात्री, आज्ञापत्र, इंद्रायणी, एका जनार्दनी, कथापंचक, करवीरनिवासी श्री महालक्ष्मी, कल्पद्रुमाचे तळी ,कल्पवेल, गंगाजल, श्री गुरूंचे गंधर्वपूर, श्री गुरुदेव दत्त, श्रीगोदे भवताप हरी, महात्मा चक्रधर, चित्रप्रभा, जागृत जगन्नारथ, तुका झाले कळस, श्रीतुळजाभवानी, तेजस्वी धर्मोद्धारक, त्रिभुवनेश्वर लिंगराज, त्रिविधा, दत्त संप्रदायाचा इतिहास, दलितांचा कैवारी भार्गवराम, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, नागेशं दारुकावने, नाथ संप्रदायाचा इतिहास, श्रीनाथलीलामृत, नामदेव : एक विजययात्रा, नामयाची जनी, श्री नृसिंह सरस्वती, श्री पर्वतीच्या छायेत, पुण्याई, प्रवासी पंडित, प्राचीन मराठीच्या लोकधारा, प्राचीन मराठी वाङ्मय : शोध आणि संहिता, बारावे ज्योतिर्लिंग, भक्तिवेडी, बहिणा, भारतीय रंगभूमीच्या शोधात, मंगलमूर्ती मोरया, महाकवीची बखर, महामाया, महाराष्ट्राचा गाभारा, श्रीमहालक्ष्मी, मातापुत्राची जगन्माता, मानसयात्रा, मामदेव, जनी आणि नागरी, मार्तंडविजय, मुक्तिगाथा महामानवाची, मुसलमान मराठी संतकवी, रामराज्याची स्फूर्तिकेंद्रे, रुक्मिणी स्वयंवर, योगेश्वरीचे माहेर, लज्जागौरी (ग्रंथ), लोकदेवतांचे विश्व, लोकसंस्कृतीचे उपासक, लोकसंस्कृतीचे विश्व, लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा, लौकिक आणि अलौकिक,सरदार वल्लभभाई, श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, विराग आणि अनुराग, विविधा, श्रीव्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर, श्री शारदामाता, शिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव, शिवदिग्विजय ,शोधशिल्प, श्रीकृष्ण चरित्र, संत, लोक आणि अभिजन, संतांच्या आत्मकथा, संतांच्या चरित्रकथा, सुभद्रा स्वयंवर, श्री स्वामी समर्थ, ही चिरंतनाची वाट, क्षिप्रेच्या सोनेरी आठवणी, ज्ञानोबा माऊली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply