डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. “Contribuiton of Women writers in Marathi Literature” या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. “समाज-शिक्षण माला” हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले.
नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ.सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता.
अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
गालात हासून, ओठात बोलून…
हातानं खेळीत, काय ग म्हणालं…
जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं …
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं…
रांगत रांगत, हअम डौलात…
गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं …
फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून…
कारंजं उडवीत, कसं ग रागावलं…
झेप झेपावून, तोल सावरून…
नाचून नाचून, पाय खुळखुळलं…
काजळ तितीट, बाळाच्या मुठीत…
माझ्या जीवाचं, सुख दाटलं…
Leave a Reply