सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचवले अशा डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार यांचा जन्म ३१ जुलै १९३५ रोजी गडहिंग्लज येथे झाला.
पुण्यात भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षणाच्या माध्यमातून सांकृतिक मिलाफ घडवून आणण्याचे काम केले ते डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार यांनी. सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचले. डॉ. एस.बी.मुजूमदार यांचे पूर्ण नाव शांताराम बळवंत मुजूमदार. त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. गडहिंग्लजमध्ये त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापूर आणि पुण्यातून पूर्ण केले.
पुण्यात शिक्षण पूर्ण करत त्यांनी बॉटनीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून पी.एचडी मिळवली. डॉ. एस.बी. मुजूमदार हे फर्ग्युसन महाविद्यालयात बॉटनीचे विभागप्रमुख होते. सुमारे २० वर्षे ते या पदावर होते. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे ५० च्या वर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी जीव शास्त्रावर आधारित काही पुस्तकेही लिहिली आहेत. पण निवृत्तीला १६ वर्षे बाकी असतानाच त्यांनी सिम्बायोसिस संस्था वाढवण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. डॉ.मुजूमदार यांनी त्यांचा बंगला विकून आणि पेन्शनच्या पैशाचा उपयोग करून पैसा गोळा केला. गरीब विद्यार्थ्यांना वाजवी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतून शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय डॉ.मुजूमदार यांनी घेतला.
मैलाचा दगड ठरलेल्या सिम्बायोसिसचा प्रवास १९७१ मध्ये सुरू झाला होता. विशेष म्हणजे यामागची कथाही अत्यंत रंजक अशी आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. एस.बी.मुजुमदार यांनीच हा किस्सा सांगितला आहे. सिम्बायोसिसच्या वेबसाईटवरही त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.
मुजूमदार सांगतात, एकदा मी घराच्या खिडकीत उभा राहून हॉस्टेलकडे पाहत होतो. मी त्यावेळी हॉस्टेलचा प्रमुख होतो. त्यावेळी मला एक विचित्र घटना दिसली. एक मुलगी हॉस्टेलमध्ये एका मुलाच्या खोलीकडे जाताना दिसली. तिने त्या मुलाच्या हातात पटकन काहीतरी दिले आणि लगेचच निघून गेली.
मी अनेक दिवस हा प्रकार पाहत होतो. रोज तसेच घडत होते. त्या दोघांमध्ये अफेयर सारखं काहीतरी भलतंच असल्याचा संशय माझ्या मनात आला. त्यामुळे मी एक दिवस पाहायला गेलो. त्या मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा आतील दृश्य पाहून मी स्तब्ध झालो. आत मॉरीशसचा एक विद्यार्थी बेडवर पडलेला होता. त्याचा चेहरा सुकलेला होता, डोळे खोल गेलेले होते. तो फारच अशक्त दिसत होता. मला काहीही कळत नव्हते. मी त्या मुलाला जेव्हा विचारले तेव्हा त्याने सांगितले, सर मला कावीळ झालेली आहे. त्यामुळे प्रचंड अशक्तपणा आला होता. मला चालताच काय उभेही राहता येत नव्हते. त्यामुळे माझ्या ओळखीची ही मुलगी मला जेवण आणून देते. मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलींना प्रवेश नसल्याने ती मला डबा देऊन लगेच निघून जायची. हे सर्व ऐकून मी स्तब्ध झालो. कारण मला संशय आला तसा काहीही प्रकार (अफेयरचा) नव्हता. मला खूप वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय शोधायला हवे असे मला प्रकर्षाने जाणवले. हीच ती वेळ होती. सिम्बायोसिसचा जन्म झाला होता.
डॉ.एस.बी.मुजूमदार यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने २००५ मध्ये पद्मश्री तर २०१२ मध्ये पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनी गौरवले. महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा पुण्यभूषण आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply