डॉक्टर शिवराम कारंत म्हणजे कोटा शिवराम कारंत यांनाच जन्म १० ऑक्टोबर १९०२ रोजी कर्नाटक मधील उडपी जिल्ह्यात कोटा येथे झाला. त्यांच्या कुटूंबात कानडी भाषा बोलली जायची. त्यांच्या वडिलांचे नाव शेषा कारंत आणि आईचे नांव लक्षमाम्मा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंडपुरा आणि मंगलोर येथे झाले. महात्मा गांधी यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले होते आणि ते कॉलेजमध्ये असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. ते त्यांचे शिक्षण पुरे करू शकले नाहीत आणि त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला . १९२७ पर्यंत खादी आणि स्वदेशीचा प्रचार करत होते. त्याआधी कारंथ यांनी आधीच लिहावयास सुरवात केली होती .
जीवनाचे सर्वागीण आणि यथार्त दर्शन घेण्याच्या सततच्या प्रयत्नामधूनच साहित्य आणि विज्ञान , संगीत आणि नृत्य , चित्रकला आणि स्थापथ्य अशासारख्या ज्ञान , कलांच्या भिन्न-भिन्न क्षेत्रातही त्यांनी आपल्या बुद्धीवैभवाचा ठसा उमटवला .
त्यांनी शब्दकोश , विश्वकोश, यंत्रावृत्त , संगीत रूपक निबंध , कथा आणि एकांकिका अशी दोनशेच्यावर त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. काही पुस्तकांची अनेक भाषांत भाषांतरेही झाली आहेत.
कर्नाटकच्या अमलीन लोकनृत्यनाट्याला ‘ यक्षगान ‘ ला संजीवन देण्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
समाजाचे प्रामाणिक विचारचिंतन , अविचल सत्यनिष्ठा , मानव जीवनाविषयी अपार सहानुभूती आणि कल्पनांना त्यांनी धाडसाने शब्दरूप दिले आहे. दुष्ट्चक्रात पिळून निघणाऱ्या स्त्रीच्या बाबतीत त्यांना खूप वाईट वाटते, त्यांच्या भाव-भावना-वेदना त्यांनी आपल्या साहित्यात आणून लोकांसमोर ठेवले आहे. डॉक्टर कारंथ यांनी १९३० ते १९४० या दरम्यान पुस्तक छपाईचे वेगळे तंत्र वापरून स्वतःची काही पुस्तके छापली परंतु त्यात त्यांचे खूप आर्थिक नुकसान झाले. ते उत्तम चित्रकार होते. त्यांनी अणुऊर्जा आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम ह्याबद्दल अभ्यासही केलेला होता.
वयाच्या ९५ व्या वर्षी डॉक्टर कारंत यांनी पक्षांवर ‘ बर्डस ‘ पुस्तक लिहावयास घेतले होते. ते लिहूनही पूर्ण झाले होते परंतु ते त्यांच्या मृत्यूनंतर २००२ साली प्रकाशित झाले. डॉक्टर कारंत यांनी सर्वच क्षेत्रात विपुल लेखन केले. त्यांनी ४७ कादंबऱ्या , ३१ नाटके , चार लघुकथा संग्रह , त्यांची ६ पुस्तके निबंधाची आणि स्केचेसची आहेत , १३ पुस्तके कला ह्या विषयावर आहेत तर २ खंड कवितांचे आहेत , ९ शब्दकोश त्यांनी लिहिले आणि १०० च्या वर वेगवगेळ्या समस्यांवर लेख लिहिले आहेत. त्यांनी १२ पुस्तके मुलांसाठी लिहिली असून प्रवासावरची ४ पुस्तके आहेत. ४ कानडी चित्रपट त्यांनी केले आहेत. त्यांच्या चोमन दुडी , मरळि मण्णिगे, कुडियर कूसु , अलिदा मेले , मूकज्जिय कनसुगळू, मई मनगळ सुळियल्ली , बेट्टद जीव , धर्मनारायण संसार या कादंबऱ्यांचे भाषांतर मराठीत झालेले आहे. त्यांनी जी काही पुस्तके , कादंबऱ्या , कथा लिहिल्या त्यात केंद्रस्थानी नुसता माणूसच नव्हता तर भोवतालचे वातावरणही होते आणि त्याचे पडसाद सतत मानवी आयुष्यावर कसे पडतात हे वाचताना जाणवते.
खूप वर्षांपूर्वी ते ठाण्यात हनुमान व्यायाम शाळेच्या मागील छोट्या पटांगणात भाषणाला आले असताना त्यांचे विचार ऐकायला मिळाले आणि त्यांची स्वाक्षरीही मिळाली, मुख्य म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघायचे होते .
डॉक्टर कारंत यांच्या ‘ मुकज्जी ‘ ह्या सुप्रसिद्ध कांदबरीला १९७७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे , संगीत अकादमी फेलोशिप , संगीत नाटक अकादमी फेलोशिप , पदमभूषण , साहित्य अकादमी अवॉर्ड , कर्नाटक स्टेट साहित्य अकादमी अवॉर्ड , तुलसी सम्मान , दादाभाई नौरोजी अवॉर्ड , नॅशनल फिल्म अवॉर्ड , नॅशनल फिल्म अवॉर्ड त्यांना मरणोत्तर देण्यात आले , असे त्यांना खूप सन्मान मिळालेले आहेत.
आपल्या देशाचे नाव उज्वल करणाऱ्या डॉ. कारंत यांचे ९ डिसेंबर १९९७ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply