डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म १४ डिसेंबर १९४८ रोजी कानपूर येथे झाला.
पं. पलुस्कर परंपरातील पं. शंकरराव बोडस यांच्या त्या कन्या. संगीताचे मार्गदर्शन त्यांना पं. बोडस, बंधू काशिनाथ, तसेच पं बलवंतराय भट्ट, पं. वसंत ठकार, पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडून मिळाले. कथक नृत्यही त्या शिकल्या होत्या. पंडित गजाननराव जोशी यांचे त्यांच्या गायनावर संस्कार होते. ख्याल गायिकी आणि भजनगायनासाठी त्या ओळखल्या जात होत्या. पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठात १९८५ ते १९९० या काळात त्यांनी संगीत अध्यापनाने काम केले. या विद्यापीठात त्या संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी अनेक शिष्य घडविले. त्यामध्ये प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांचा समावेश आहे. संगीताबरोबरच संस्कृत आणि इंग्रजीतील पदवीही कानपूर विद्यापीठातून प्राप्त केली होती. त्यानंतर ‘संगीत अलंकार’ ही पदवी मिळविली होती.
उत्तम मैफिल कलाकार तसेच अध्यापन, वाग्गेयकार म्हणूनही त्या लोकप्रिय होत्या. ख्याल, तराणा, ऋतुसंगीत आणि भजन ही त्यांची वैशिष्ट्ये होती. संगीत नाटक अकादमी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले होते. हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रचंड व्यासंग असलेली गायिका म्हणून त्यांचा लौकिक होता. ग्वाल्हेर घराण्याचे धडे गिरवल्यानंतर त्यांनी जयपूर आणि किराणा घराण्याची शैलीही आत्मसात केली होती. ख्याल, ऋतुसंगीत, भजन गायकीवर त्यांची हुकूमत होती.
वीणा सहस्रबुद्धे यांना २०१३ मध्ये राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. ऑस्ट्रेलिया, युरोप, आखाती देश, तसेच उत्तर अमेरिकेसह विविध देशांत त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले होते.
डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे दि. २९ जून २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply