पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक होते डॉ. के. वेंकटरामन! त्यांचा जन्म चेन्नईचा! तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२३ साली ते रसायनशास्त्रात एम.ए. झाले. नंतर मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी आणि डीएससी केले. १९२७ साली ते भारतात परत आले आणि एक वर्ष बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. १९२८ ते १९३४ या काळात ते लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत. त्या वेळी त्यांनी ‘ए सिंथेसिस ऑफ फ्लेवर एट रूम टेम्परेचरा’ हा शोधनिबंध ‘करंट सायन्स’ या मासिकात प्रसिद्ध केला. त्याच वेळी याच विषयावरचा शोधनिबंध बेकर नावाच्या संशोधकाने ‘जर्नल ऑफ केमिकल सोसायटी’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध केला. त्यामुळे हे संशोधन ‘बेकर-वेन्कटरामन ट्रान्सफर्मेशन’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही प्रक्रिया वापरून आजही रसायनशास्त्रज्ञ ‘फ्लेवोंस’ तयार करतात.
वेंकटरामन यांच्या उच्च दर्जाच्या संशोधनामुळे त्यांना १९३४ साली मुंबई विद्यापीठाने इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये प्रपाठक (रीडर) म्हणून बोलावले. त्या वेळी या संस्थेचे संचालक डॉ. आर. बी. फोस्टर होते. ते १९३८ साली निवृत्त झाल्यावर वेंकटरामन पुढील १९ वर्षे या संस्थेचे संचालक होते. त्यांच्या कारकिर्दीत ही संस्था चांगलीच भरभराटीला आली.
या कारकिर्दीत वेंकटरामन यांनी ‘फ्लेवोनाइड’ जातीच्या रंगांवर संशोधन तर केलेच, पण त्याचबरोबर त्याची संरचना, ते वापरण्याच्या पद्धती इत्यादी वस्त्रोद्योगांना लागणाऱ्या विविध प्रक्रियांवरही त्यांनी संशोधन केले. त्यांची आठवण म्हणून मुंबईला ‘इंडियन डायस्टफ इंडस्ट्रीज लिमिटेड’ या संस्थेची स्थापना झाली. त्यांचे ‘केमिस्ट्री ऑफ सिंथेटिक डाय एंड एनेलिटिकल केमिस्ट्री ऑफ सिंथेटिक डाय’ हे आठ भागांचे पुस्तक आहे. विषयातील या प्रसिद्ध सल्लामसलतीसाठी त्यांना देश-परदेशातून निमंत्रणे येत. १९५७ साली त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली. तेथून ते १९६६ साली निवृत्त झाले. त्यांच्यामुळे पुण्याच्या या संस्थेत नामवंत रसायनशास्त्रज्ञ जमा झाले. त्यांनी पीएचडीच्या ८५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे २५० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
Leave a Reply