मिरजेला रोटरॅक्ट क्लबने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी आणि सुधीर नेरुरकर वालचंद तर्फे तर तो आणि अविनाश भोंडवे बी. जे. मेडिकल तर्फे प्रतिस्पर्धी होतो. दोन दिवस स्पर्धा चालली. (होय त्याकाळी वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धा खरंच दोन दिवस चालत. ५० च्या वर स्पर्धक हिरीरीने आणि चुरशीने भाग घेत असत.) ती आमची पहिली भेट आणि मैत्रीची सुरुवात ! साल होतं -१९८०.
मागील वर्षी (२०१९) आमच्या “दिव्य जीवन संघ , पुणे शाखेच्या ” वतीने आम्ही आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून त्याला बोलवावे असे माझ्या मनात आले. डॉ. अविनाश भोंडवेलाही विचारले होते पण आय एम ए चा अध्यक्ष म्हणून त्याला त्याच दिवशी बारामतीला एका कार्यक्रमासाठी जायचे होते. याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला. एवढा कालावधी मागे लोटून त्याने मला पटकन ओळखले.
फोनचे प्रयोजन सांगितल्यावर म्हणाला – ” मसाप ” जवळच्या आमच्या संस्थेच्या कार्यालयात उद्या भेटायला जमेल कां ?
मी गेलो. तासभर जुन्या -पुराण्या गप्पा झाल्या आणि दरम्यान कसं कसं पाणी वाहत गेलंय हे निरखत बसलो. ” तू मुझे सुना , मैं तुम्हे सुनाउ ” टाईप एकमेकांच्या बाबतीत सविस्तर बोललो. त्यादिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने माझ्या उपवासासाठी त्याने साबुदाणा वडा मागविला. त्याच्या कार्याचे वटवृक्ष मला समोर दिसत होते. माझे निमंत्रण स्वीकारून त्याने परीक्षकपदाची जबाबदारी मान्य केली. ती दुसरी भेट !
ठरलेल्या दिवशी तो आला , सुमारे तीसहून अधिक स्पर्धकांचे पाच तास परीक्षण केले. मार्गदर्शनपर मनोज्ञ बोलला. मी जबरदस्तीने त्याच्या खिशात मानधनाचे पाकीट कोंबल्यावर म्हणाला –
” पुढच्या सप्टेंबरमध्ये माझ्या संस्थेत भरवू तुझी स्पर्धा. मध्यवर्ती ठिकाण असल्याने सगळ्यानांच सोयीचे होईल. ”
मी होकारलो आणि म्हणालो – ” मित्रा, अध्यात्माच्या क्षेत्रातही तुझी मुशाफिरी पाहून त्याआधी तुला १४ जुलै २०२० च्या आमच्या “स्वामी शिवानंद स्मृती व्याख्यानासाठी ” बोलवावे असं वाटतंय. ” त्याने मान्य केले. ती आमची तिसरी भेट !
परवा १४ जुलैला – लॉक डाऊन मुळे घरातच सत्संग केला. ” त्याची “आठवण काढली आणि पुढच्या वर्षी “त्याला” नक्की बोलवायचे याची उजळणी केली.
१७ जुलैचा “सकाळ” उघडला आणि ” डॉ. विकास आबनावें यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी कोरोनामुळे दुःखद निधन ” हे वृत्त दिसले, त्याच्या फोटोसकट !
ही चौथी आणि शेवटची भेट !
गेल्या दोन महिन्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्या माझ्या मित्रांची संख्या आता “चार ” झाली आहे.
सुरेश भट म्हणतात तसे-
” ते लोक होते वेगळे , जे घाईत गेले पुढे I
मी मात्र थांबून पाहतो -मागे कितीजण राहिले II ”
श्रद्धांजली मित्रा !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply