जेव्हा आम्ही प्रवासाला सुरूवात केली तेव्हां सूर्य म्युनिकवर चमकत होता आणि हवा आल्हाददायक होती.
आम्ही निघणार तोच मी ज्या हॉटेलात रहात होतो, त्याचे मालक घाईघाईने आले व मला शुभेच्छा देऊन गाडीवानाला म्हणाले, “रात्र पडायच्या आत ये बरं कां ?
हवा आता छान आहे पण वादळ केव्हां येईल सांगता येत नाही कारण उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांत गारवा आहे.
आजची रात्र कुठली आहे ठाऊक आहे ना ?”
गाडीवान जोहान म्हणाला, “जी मालक.”
मग त्याने गाडी भरधाव सोडली.
मी त्याला थांबवत विचारले, “आजची रात्र कसली आहे ?”
तो म्हणाला, “आज वालपर्गीसची रात्र आहे.” (वालपर्गा नावाची ख्रिश्चन संत स्त्री भुतखेतं, चेटकिणींच्या त्रासापासून सोडवत असे).
मग त्याने खिशातून जुने घड्याळ काढून उशीर होत असल्यासारखा चेहरा केला.
मी पुढे जायची खूण करताच तो जणू वेळ भरून काढण्यासाठी सुसाट सुटला.
मधेमधे घोडे उगीचच माना वर करून संशयाने कसला तरी वास घेताहेत असं वाटत होतं.
मीही सावध होऊन बाहेर पहात होतो.
पुढे गेल्यावर मला एक दरीकडे जाणारा फार वापरांत नसलेला रस्ता दिसला.
त्या बाजूचे दृश्य इतके छान वाटत होते की मी जोहानला गाडी तिकडे घेण्यास सांगितले.
तो अनेक फालतु कारणे देत त्या बाजूला जायला नकार देऊ लागला.
त्यात तो उलटसुलट बोलत होता.
त्यामुळे माझी उत्सुकता वाढली.
तो सावधपणे उत्तरे देत वारंवार घड्याळ पहात होता.
शेवटी मी म्हणालो, “जोहान, मला त्या रस्त्यावरून जायचे आहे.
तुला यायचे नसेल तर तुझी मर्जी पण कां यायचं नाही तें सांग.
उत्तर म्हणून त्याने गाडीतून खाली उडी मारली.
हात पसरून मला विनवू लागला की मी तिथे जाऊ नये.
त्याचं जर्मन आणि इंग्लिश सरमिसळ बोलणं मला जेमतेम कळत होतं.
त्याला मला कांही सांगायचे होते पण सांगायचा प्रत्येक प्रयत्न करतांना कांहीतरी आठवून तोच घाबरत असे.
प्रत्येक वेळी वॉलपर्गीसच्या रात्रीपर्यंत येऊन तो थांबत असे.
मला जर्मन भाषा येत नव्हती.
त्याला इंग्रजीचे कांही शब्दच ठाऊक होते.
तो मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलायला जाई आणि थोड्याच वेळांत मातृभाषेत बोलू लागे मग घड्याळांत पाही.
घोडेही अस्वस्थ वाटत होते.
अचानक त्याने उडी मारली आणि घोड्यांना धरून दुसऱ्या बाजूला वीसेक फूट दूर घेऊन गेला.
मी तिथे जाऊन त्याला विचारले की त्याने तसे कां केले.
तो म्हणाला, ‘ज्या व्यक्तीने स्वतःलाच मारले (आत्महत्या) त्या व्यक्तीला तिथे पुरले आहे.
मला जुन्या प्रथेची आठवण झाली, ‘आत्महत्या करणाऱ्यांना जिथे रस्ते मिळत, तिथे पुरत असत.’
“आत्महत्त्या ? म्हणजे कांहीतरी गोष्ट असणार ?”
पण मला हे कळेना की घोडे कां घाबरले होते ?
तेवढ्यात एक साधारण मोठ्याने हाक मारल्याचा आवाज दुरून आला.
घोडे फारच चुळबुळू लागले.
जोहानला त्यांना शांत करायला बराच वेळ लागला.
तो म्हणाला, “हा आवाज लांडग्याच्या आवाजासारखा वाटतो.
पण आता इथे लांडगे नाहीत.”
मी म्हणालो, “शहराच्या एवढ्या जवळ लांडगे आतां येत नाहीत.”
तो म्हणाला, “जेव्हां बर्फ पडतो, तेव्हां येतात.”
तेवढ्यात आकाशांत थोडे ढग जमू लागले.
थोडा अंधार झाला आणि थंड वाऱ्याचा झोतही आला पण लगेचच सूर्य पुन्हा आकाशांत चमकू लागला.
जोहान म्हणाला, “बर्फाचं वादळ लौकरच येण्याची शक्यता आहे.”
मग तो गाडीत चढला आणि परत जायची तयारी करू लागला.
मी मात्र गाडीत चढलो नाही.
मी म्हणालो, “हा रस्ता कुठे जातो ते मला सांग.”
त्याने हात जोडून मनातल्या मनांत प्रार्थना केली आणि म्हणाला, “ती अपवित्र जागा आहे.”
मी विचारले, “काय अपवित्र आहे?”
तो म्हणाला, “ते गांव.”
मी म्हणालो, “म्हणजे पुढे गाव आहे ?”
तो घाईघाईने म्हणाला, “नाही, नाही. आता तिथे गाव नाही.”
मी करड्या आवाजात विचारले, “आता तर गांव आहे म्हणालास !”
तो म्हणाला, “होतं, पूर्वी होतं ?”
माझ्या “आता ते कुठे गेलं ?” ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तो मला एक लांबलचक गोष्ट सांगू लागला.
मला एवढंच कळलं की शंभरेक वर्षे आधी तिथे गांव होतं.
त्या गांवातली सर्व माणसे मेली आणि त्यांना कबरीमधें पुरण्यांत आले.
परंतु अनेकदा त्यांतून आवाज येत असतात आणि कबरी उघडून पाहिल्यास ती माणसे ताजीतवानी वाटतात व त्यांच्या ओठांना रक्त दिसते.
म्हणून तिथून लौकर पळून साधारण माणसांत जाणे आवश्यक होतं.
हे सर्व सांगतांना त्याच्या मनातली भिती वाढत राहिली, त्याचा चेहरा पांढरा फटक झाला.
त्याचे अंग घामाने ओलेचिंब झाले आणि शेवटी तो रडू लागला.
तो म्हणाला, “आज वालपर्गीस रात्र आहे. चला.”
असल्या अंधश्रद्धा ऐकून माझं इंग्लिश रक्त खवळलं आणि मागे थांबत मी म्हणालो,
“जोहान, तू भ्यालायस. तू घरी जा.
मी एकटा परत येईन.
थोडं चालणं माझ्या फायद्याचं आहे.”
मी गाडीतून माझी फिरायला जातांना घ्यायची काठी घेतली.
मग त्याला पुन्हा म्हणालो,
“जोहान, तू घरी जा. वाॅलपर्गीस रात्र इंग्लिश माणसाला कांही करत नाही.”
घोडे आता खूपच अस्वस्थ झाले होते.
जोहान त्यांना सांभाळता सांभाळता मला मागे न थांबण्याची विनंती करत होता.
मला त्याची दया येत होती आणि हंसूही येत होतं.
तो आता इंग्रजी भाषा पूर्ण विसरून जर्मन भाषेतच मला सांगत होता.
मी घरी जा अशी खूण करून त्या दरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो.
निराश होऊन जोहान घोडे घेऊन परतीच्या रस्त्यावर जाऊ लागला.
तो तिथे जात असतांना टेकडीवर एक उंच आणि किडकिडीत माणूस दिसला.
तो जवळ येतांच घोडे उधळले आणि जोहानला न जुमानतां नजरेआड झाले.
मी त्या परक्या माणसाला पाहू गेलो तर तो परत तिथे दिसेना.
हंसत हंसत मी दरीकडे जाऊ लागलो.
तिथे जाऊ नका म्हणून जोहानने आग्रह करण्यासारखे कांहीच मला तिथे आढळले नाही.
स्थळ काळ याचं भान विसरून मी खूप वेळ फिरलो.
वाटेत ना घर दिसलं ना कोणी माणूस.
एके ठिकाणी थोडी झाडे एकत्र दिसू लागली तेव्हा माझ्या लक्षांत आले जिथून मी आलो त्या वाटेचा एकांतच मोहीत करणारा होता.
मी निघालो तेव्हांपेक्षा हवा आता थंड झाली होती.
मधून मधून निःश्वास सोडल्यासारखे, कुणी ओरडल्यासारखे आवाज येत होते.
मग उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे ढग मला दिसले.
वादळाची चिन्हे दिसू लागली.
मी पुढे जातच राहिलो.
तो परिसर फारच रम्य वाटत होता.
शेवटी घड्याळाकडे पहात मी परतीची वाट शोधायचे ठरवले कारण संधिप्रकाश पसरू लागला होता.
ढगांमुळे येणाऱ्या थंड वाऱ्यांबरोबर तो गाडीवानाने सांगितलेला, लांडग्याच्या ओरडण्यासारखा, रहस्यमय आवाज आता अधूनमधून पण निश्चितपणे ऐकू येत होता.
क्षणभर मी गांगरलो पण मी त्याला ते गांव बघून येईन म्हणून सांगितले होते.
मी परत पुढे जाऊ लागलो.
थोड्या अंतरावर चारी बाजूला डोंगर व मधे असलेलं मोकळं गाव दिसू लागलं.
डोंगरउतारांवर घनदाट झाडी होती.
मी त्या रस्त्याचे वळण कुठे नेतंय हे पहात असतांनाच थंड शिरशिरी हवेत लहरली आणि भुरूभुरू बर्फ पडू लागला.
मी एका झाडाचा आश्रय घ्यायला धांवलो.
आकाश गडद होत होतं आणि बर्फ पडतच होतं.
थोड्याच वेळांत बर्फाचा जाड थर असलेलं सफेद जाजम तयार झालं.
त्याच्या कडा धुक्यात हरवल्या होत्या.
माझ्या पायाखालचा रस्ता बहुदा निसटला असावा.
माझे पाय बर्फातून गवतावर पडू लागले.
मग वाऱ्याने खूपच जोर धरला.
मला धावणं कठीण झालं.
हवा बर्फागत थंडगार झाली आणि मला त्रास होऊ लागला.
बर्फ जाड पडत होता.
मधेच चमकणाऱ्या विजा बर्फाने लगडलेले मोठाले वृक्ष दाखवत होत्या.लौकरच मी झाडांच्यामधे पोहोचलो.
इथे वारा थोडा कमी होता.
आता रात्रीच्या काळोखात वादळाचा काळोख मिसळून गेला होता.
वादळ थांबायला आलं होतं.
मधेच ढग थोडा आवाज करत आणि तो रहस्यमय लांडग्याचा आवाजही परत परत ऐकू येई आणि सर्वदूर त्याचा प्रतिध्वनी आल्यासारखा वाटे.
जसा वारा थांबला तसा मी अधिक चांगला निवारा शोधू लागलो.
मला वाटत होते की आजूबाजूला भग्नावस्थेतले कां होईना पण एखादे घर असावे.
मी एका झाडांच्या छोट्या बनाला वळसा घातला आणि मला तिथून बाहेर नेणारी व एका वास्तुकडे जाणारी वाट दिसली.
तेवढ्यात ढगांनी चंद्र झाकला आणि अंदाजाने मी ती वाट अंधारातच चालून गेलो.
थंडी वाढली होती तरी मी आंधळ्यासारखा पुढे जात राहिलो.
कांही तरी निवारा मिळणार ह्याची मला खात्री वाटत होती.
मी थांबलो.
अचानक सर्वत्र शांतता पसरली होती.
वादळ निघून गेले होते.
क्षणभर मला हायसे वाटले पण क्षणभरच कारण चंद्रप्रकाश पसरला आणि मला दिसले की मी कब्रस्तानांत पोहोचलो आहे.
मला जी वास्तू वाटत होती तें कुणाचे तरी चारी बाजूने संगमरवर बसवलेले मोठे चौकोनी थडगे होते.
आजूबाजूच्या बर्फासारखेच सफेद.
चमकणारे.
चंद्रप्रकाशाबरोबरच पुन्हा वादळाचा मोठा आवाज आला.
हवा एकदम थंड झाली आणि शेकडो कुत्रे किंवा लांडगे ओरडत असावेत असा आवाज ऐकू येऊ लागला.
मी आश्चर्यचकीत झालो आणि मला धक्काही बसला.
गारठ्याने जीव गुदमरू लागला.
नकळत कांहीशा कुतुहलाने चंद्रप्रकाशांत मी ती वास्तु नीट पहायचे ठरवले.
मी तिला वळसा घातला.
वास्तूच्या जुन्या ग्रीक पध्दतीच्या दरवाज्यावर लिहिलं होतं.
“काऊंटेस डोलींजेन ऑफ ग्रात्झ इन स्ट्रीया – साॅट अँड फाऊंड डेथ – १८०१.”
वास्तूच्या मधोमध वरून बाहेर आलेला एक लोखंडी भाल्यासारखा खांब दिसत होता.
मागे रशियन भाषेत लिहिले होते, “मृत प्रवास जलद करतात.”
हे सर्व इतकं चमत्कारिक आणि अस्वाभाविक होतं की मला थकल्यागत वाटू लागलं.
प्रथमच माझ्या मनांत आलं मी जोहानचं ऐकायला हवं होतं.
मला आजची रात्र वॉलपर्गीसची रात्र असल्याचीही आठवण झाली.
अनेकांच्या विश्वासाप्रमाणे ह्या रात्री मृत बाहेर येतात व फिरू लागतात.
मजा करू लागतात.
माझ्या गाडीवानाने सांगितलेलं मृत गांव ते हेच होतं आणि आत्महत्त्या करणारी ती काउंटेसही हीच होती.
गाडीवानाने सांगूनही मी आता तिथे एकटा होतो.
थंडीने गारठलो होतो.
वादळाची चाहूल वाढली होती.
माझे सर्व शास्त्रीय, धार्मिक विचार आणि सगळं तत्त्वज्ञान एकत्र करूनच मला भितीने कोलमडण्यापासून सावरावं लागलं.
आकाशांत एवढा गडगडाट झाला की माझ्या पायाखालची जमीन हादरली.
मग पुन्हा हिमवर्षाव सुरू झाला.
ह्यावेळी नुसतं बर्फ नव्हे तर मोठाल्या गाराही पडत होत्या.
झाडांचा आश्रय कांहीच उपयोगी नव्हता.
प्रथम मी झाडाकडे धाव घेतली पण लगेच परत त्या वास्तूच्या आश्रयाला आलो व त्याच्या पितळी दरवाजाच्या जितकं आत चिकटतां येईल तेवढा चिकटलो.
गारा वास्तुला आपटून उडत होत्या.
मी टेकून उभा असतांनाच ते पितळी दार थोडं किलकिलं झालं.
त्या निर्दय वादळात तो आसराही बरा वाटला म्हणून मी दार ढकलू लागलो.
तोंच विजेचा कडकडाट झाला आणि मला त्या प्रकाशांत तिथे झोपलेली सुंदर काऊंटेस दिसली.
गोबरे गाल आणि लाल ओठ असलेली ती सुंदर स्त्री मी माझ्या डोळ्यांनी पाहिली.
ती शंभर वर्षांपूर्वी गेली असेल असे वाटतच नव्हते.
पुन्हा आकाशात गडगडाट झाला आणि कुणीतरी मला उचलून फेंकून द्यावे तसा मी त्या दरवाजापासून दूर फेंकला गेलो.
मी आश्चर्य करत असतांनाच परत मोठा गडगडाट होऊन पुन्हां गारांचा जोरदार वर्षाव होऊ लागला.
मला सारखे वाटत होते की माझ्याबरोबर कोणीतरी आहे.
ह्यावेळी वीज त्या वास्तूच्या स्तंभावर पडली आणि चकचकटांत ती संगमरवरी वास्तू भस्म होऊ लागली.
क्षणभर आतली ती स्त्री ओरडत उठली पण वीजेच्या ज्वाळांनी तिला लपेटून नाहीशी केली.
मला शेवटचं आठवतंय तें एवढच की गारा मला झोडपत असतांना कुठली तरी शक्ती मला उचलून दूर नेत होती, लांडग्यांच्या ओरडण्याचा आवाज वाढला होता आणि आजूबाजूच्या सर्व कबरींतले मृत बाहेर येऊन मला घेरून सफेद धुक्यांतून जवळ जवळ येत होते.
हळूहळू मला शुध्द येऊ लागली.
मग प्रचंड थकवा जाणवू लागला.
थोडा वेळ मला कांहीच आठवेना.
मग मला माझे दुखणारे पाय, न हलणारं शरीर, मानेपासून सुन्न झालेला पाठीचा कणा जाणवू लागला.
त्यामानाने माझी छाती उबदार वाटत होती.
ते बहुदा दुष्ट स्वप्नच असावं, कारण माझ्या छातीवर कुणीतरी बसल्यामुळे मला श्वास घेणं जड जात होतं.
हा आळशासारखं झोपून रहायचा काळ बराच मोठा होता असावा.
मी झोंपी गेलो असेन.
मग मला जलप्रवासानंतर जाणवतो तसा थकवा जाणवू लागला.
कांहीतरी हालचाल करून आळस घालवावा असं वाटू लागलं.
कशापासून तरी सुटका हवी होती.
पण मी फारशी हालचाल करू शकत नव्हतो.
जवळच एखादा प्राणी असावा असा श्वासोच्छवासाचा आवाज मला ऐकू येत होता.
मग माझ्या खरं काय ते लक्षांत आलं आणि मी भयचकीत झालो.
माझ्या छातीवर कोणी तरी प्राणी बसलेला होता आणि तो अधूनमधून माझा गळा चाटत होता.
मला हालचाल करायची भिती वाटली.
पण माझ्यात बदल झाल्याचे त्याला जाणवले.
मी जरा डोळे उघडून पाहिले तर तो एक मोठा लांडगा होता.
त्याचे लालभडक डोळे, जीभ, दांत व भयानक जबडा मला दिसला.
त्याचा उष्ण श्वास मला तीव्रतेने जाणवत होता.
मग पुन्हां मी ग्लानींत गेलो.
मधले काही मला आठवत नाही.
मला क्रमाक्रमाने त्या लांडग्याचं एकवार हलकं गुरगुरणं आणि एक आरोळी ऐकू येत होती.
मग दूर कुठे तरी “हॅलो, हॅलो” चे आवाज ऐकू येऊ लागले.
आवाजाच्या दिशेने मी पाहू लागलो पण मधे कब्रस्तान असल्याने कांही दिसत नव्हतं.
तो लांडगा त्याच पध्दतीने गुरगुरत आणि ओरडत होता आणि शोध घेणाऱ्याच्या हातांतील दिव्यांचा प्रकाश कब्रस्तानाच्या चारी बाजूनी जवळ येत होता.
मग झाडांच्या दिशेने कांही घोडेस्वार विजेऱ्या घेऊन माझ्या दिशेने येतांना दिसले.
त्यांनीही मला पाहिले.
तो लांडगा उडी मारून कब्रस्तानांत दिसेनासा झाला.
तोपर्यंत एका घोडेस्वारांने आपल्या बंदुकीने त्याला मारण्यासाठी माझ्या दिशेने बार काढला.
त्याच्या सोबत्याने त्याचा हात ऐनवेळी ढकलून त्याचा नेम चुकवला.
गोळी माझ्या डोक्यावरून गेली.
मग काही घोडेस्वार लांडग्याच्या मागे गेले.
पण तो त्यांना चुकवून झाडीतून पसार झाला.
इतर घोडेस्वार माझ्याकडे आले.
मला सर्व समजत होते पण बोलतांही येत नव्हते की हालताही येत नव्हते.
दोन तीन घोडेस्वार खाली उतरले.
एकाने माझे डोके उचलून धरले आणि हात माझ्या छातीवर ठेवला.
तो म्हणाला, “मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. हा अजून जिवंत आहे.”
मग कोणीतरी माझ्या घशात ब्रँडी ओतली.
मला आता डोळे नीट उघडतां आले.
झाडांमागे सावल्या हलत होत्या आणखी माणसे तिथून आली.
पहिला प्रश्न होता, “तो जिवंत आहे ?”
उत्तर मिळताच कोणी म्हणाले,
“चला लौकर. ही थांबण्याची जागा नव्हे, ती सुध्दा आजच्या रात्री.”
कोणीतरी विचारले, “काय आहे आज ?”
उत्तरे गुळमुळीत आणि वेगवेगळी आली.
जणू कुणालाच त्याबद्दल बोलायचं नव्हतं.
एकजण म्हणाला, “तो लांडगा होता, पण सामान्य नव्हे.”
आणखी एक म्हणाला, “बंदूकीची गोळीच त्याला पाहिजे.”
तर एकजण म्हणाला, “आजच्या रात्री आपण इथे आलो, हीच मोठी चूक.”
“त्या तुटलेल्या संगमरवरावर रक्त पडलं होतं.
ते वीजेने नाही आणलं !
आणि हा सुरक्षित आहे कां ?
त्याच्याकडे पहा, त्याच्या गळ्याकडे पहा.
लांडगा त्याच्या अंगावर बसून आणि खरखरीत जीभेने गळा चाटून त्याला सतत ऊब आणत होता. त्यामुळे गळ्यावर जखम झाली आहे.
अधिकाऱ्याने नीट तपासलं.
तो म्हणाला, “हा ठीक आहे.
कुठेही त्याच्या कातडीला जरासाही ओरखडा नाही.
ह्या सर्वाचा अर्थ काय ?
आणि जर तो लांडगा सतत ओरडला नसता तर आपण ह्याच्यापर्यंत पोंहोचलोच नसतो.”
माझं डोकं धरणाऱ्याने विचारलं, “तो लांडगा कुठे गेला ?”
एक खूप घाबरलेला वाटणारा म्हणाला, “तो आपल्या घरी गेला. कब्रस्तानांत पुरेशा कबरी आहेत त्याला झोपायला. चला आता, निघा लवकर.”
अधिकाऱ्याने मला बसतां केलं.
मग त्याच्या आज्ञेने त्यांनी मला घोड्यावर बसवलं.
तोही एका घोड्यावर बसून माझ्या जवळून माझा हात हातात घेऊनच येत होता.
मग मी परत ग्लानीत गेलो.
मी जागा झालो तेव्हां दोन सैनिक मला दोन बाजूंनी सांभाळत होते व मी जमिनीवर उभा होतो.
सूर्योदय जवळ आला होता.
तो अधिकारी सर्वांना बजावत होता, “काय पाहिलं ते सगळं खरं सांगायचं नाही.
फक्त एक इंग्लिश माणूस सांपडला आणि कुत्रा तिथे होता, एवढचं सांगायचं.”
तो भित्रा माणूस मागून म्हणाला, “कुत्रा ? मला वाटते मी लांडगा नीट ओळखतो. तो कुत्रा नव्हता.”
अधिकारी म्हणाला, “मी सांगतो, तो कुत्रा होता.”
तो सैनिक म्हणाला, “कुत्रा ! त्याच्या गळ्याकडे पहा.
हे कुत्र्याचं काम आहे कां ?”
मी माझा हात गळ्याकडे नेला.
माझा गळा दुखला.
मी वेदनेने ओरडलो.
सर्व भोवती जमा झाले.
अधिकारी म्हणाला, “मी ‘कुत्रा’ सांगतो तर कुत्राच सांगा.
खरं सांगाल तर कोणी विश्वास ठेवणार नाही.”
मग आम्ही म्युनिकच्या उपनगरात पोंचलो.
तिथे एक वेगळीच गाडी आली त्यांतून मला माझ्या हॉटेलात नेण्यांत आलं.
सैनिक बराकीत परत गेले.
अधिकारी माझ्या बरोबर आला.
हॉटेलात पोहोचताच मालक धावतच बाहेर आले.
मालक हात धरून मला आत नेऊ लागताच तो अधिकारी जायला निघाला.
मी त्याला थांबवले व माझ्या खोलीवर यायला सांगितले.
मग वाईनचे घुटके घेतांना मी त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना माझा जीव वाचवल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद दिले.
तो म्हणाला की ते तर त्याचं कर्तव्यचं होतं आणि मी सांपडल्याने त्याला खूप आनंद झालाय.
तो पुढे म्हणाला, “हॉटेल मालकांनी पहिल्यांदा शोध मोहिमेसाठी लोक जमा करायची इच्छा व्यक्त केली.
हॉटेल मालक त्यावर हंसले.
अधिकारी आपल्याला काम आहे असं सांगून निघून गेला.
मी हॉटेल मालकांना विचारले, “मला शोधायला सैनिक कां व कसे आले ?”
मालकांनी खांदे उडवले व ते म्हणाले, “मी ह्याच तुकडीत पूर्वी काम केलं होतं.
त्यामुळे कमांडरने माझी विनंती सहज मान्य केली.”
मी विचारले, “पण तुम्हांला कसे कळले की मी हरवलो आहे ?”
हॉटेल मालकांनी सांगितले, “गाडीवान गाडीचा सांगाडा घेऊन परत आला.”
मी म्हणालो, “तरीही तेवढ्यावरून मी हरवलोय असं वाटून तुम्ही एकदम सैनिकांची तुकडी पाठवलीत ?”
मालक म्हणाले, “छे ! छे ! तो गाडीवान यायच्या आधीच तुम्ही ज्याचे पाहुणे आहांत त्या बोयारनी ही तार मला पाठवली होती ना !”
असे म्हणून पाकीटातली एक तार माझ्या हाती ठेवली. मी ती वाचली. ती अशी होती.
बीस्ट्रीट्झ
माझ्या पाहुण्याची चांगली काळजी घ्या.
त्याची सुरक्षा मला महत्त्वाची आहे.
त्याला कांही झालं, तो हरवला तर सर्वप्रकारे प्रयत्न करा आणि त्याला सुरक्षित ठेवा. तो इंग्लिश माणूस आहे.
धाडसी आहे.
हिमवादळ, रात्र आणि लांडगे ह्यांच्यापासून नेहमीच धोका असतो. जरा जरी शंका आली तरी क्षणाचाही उशीर करू नका. तुमच्या उत्साहाला मी माझ्याकडील धनाने योग्य दाद देईन.
ड्रॅक्युला
तार वाचून होताच खोली माझ्याभोवती फिरत्येय असं वाटू लागलं.
मालकांनी मला धरलं नसतं तर मी पडलोच असतो.
ह्या सगळ्यात इतक्या विचित्र गोष्टी होत्या की त्याविषयी कल्पना करणंही कठीण वाटतं.
माझ्या मनांत आलं की एकमेकांविरूध्द असणाऱ्या काही शक्ती माझा खेळ करताहेत.
मी नक्कीच कुठल्यातरी रहस्यमय शक्तीच्या संरक्षणाखाली होतो.
कुठल्या तरी दूरच्या देशांतून आलेल्या तारेमुळे मी बर्फाच्या वादळांत गारठून मरण्यापासून आणि लांडग्यांपासून सुखरूप बचावलो होतो.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा : ड्रॅक्युलाज गेस्ट
मूळ लेखक : ब्रॅम स्टोकर (१८४७ – १९१२)
तळटीप: ब्रॅम स्टोकर ह्या लेखकाची ‘ड्रॅक्युला’ ही कादंबरी खूप गाजली. तीही त्याच्या मृत्यूनंतर. त्याच्या इतरही भूतांवरच्या कादंब-या आहेत. ड्रॅक्युला जेव्हां चित्रपट रूपात लोकांच्या समोर आली त्यानंतर जास्तच लोकप्रिय झाली. प्रस्तुत कथा त्याच्या पत्नीने त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित केली. ही कथा म्हणजे ड्रॅक्युला ह्या कादंबरीचं पहिलं प्रकरण आहे, असं अनेकांच म्हणणं आहे. ड्रॅक्युला जेव्हां प्रसिध्दीसाठी पाठवली तेव्हां पुस्तकाची लांबी कमी करण्यासाठी हे पहिलंच प्रकरण गाळण्याचे प्रकाशकांनी ठरवले व लेखकाने ते मान्य केले. पुढे त्यांत थोड्या सुधारणा करून ती कथा म्हणून प्रसिध्द केली गेली.
ड्रॅक्युलाचा अर्थ ड्रॅक्युल ह्या उमरावाचा मुलगा तो ड्रॅक्युला असा आहे. पंधराव्या शतकांत ट्रान्सिल्व्हानियामधे ड्रॅक्युला राजा होता. त्याचे राज्य दोन मोठ्या राज्यांच्या मधे सांपडल्यामुळे दोघांच्या युध्दात तें भरडले जाई. १४४८ ते १४७६ पर्यंत तो तिथला राजा होता. आतां हा भाग रोमानियामधे येतो. दोनदां त्याचे सिंहासन गेले व त्याला झगडून परत मिळवावे लागले. तो अतिशय क्रूर प्रकारे शिक्षा देत असे व त्याने हजारो बळी घेतल्याचा उल्लेख आहे. परंतु ख्रिश्चॅनिटीचा तो पुरस्कार करीत असे. त्यामुळे व्हॅटीकन त्याच्याविरूध्द बोलत नसे. तो युध्दातच मारला गेला. त्याचे शव जिथे पुरले होते तिथून नाहीसे झाले. नंतर त्याचे अवशेष दुसरीकडे सांपडले ते म्युझियममध्ये ठेवण्यांत आले होते पण तेंही नाहीसे झाले (बहुदा चोरले गेले). ब्रॅम स्टोकरने कादंबरीत ड्रॅक्युला हा एकोणीसाव्या शतकांतला उमरावाच्या रूपांतील भूत म्हणून सादर केला आहे. प्रस्तुत गोष्टीत मात्र तो कथा सांगणा-याची मर्जी सांभाळण्यासाठी सुरूवातीला त्याला मदत करतांना दाखवला आहे. कथेत ड्रॅक्युलाचा तीनदा उल्लेख येतो. प्रथम तो एक उंच किडकिडीत माणसाच्या रूपांत दिसतो व नाहीसा होतो. दुस-यांदा तो काउंटेसच्या कबरीवर वीज पडते तेव्हां लेखकाला तिथून उचलून वाचवतो आणि लांडग्याच्या रूपांत थंडीत त्याचे रक्षण करतो. तिसरा उल्लेख नांवानिशी पत्रांत येतो. गूढ निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष उल्लेख मात्र केलेला नाही.
Leave a Reply