नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांचा जन्म १ जुलै १९६७ रोजी हेबाळ ता.गडहिंग्लज जिल्हा.कोल्हापूर येथे झाला.
यू टर्न, हिमालयाची सावली, मदर्स डे, दुधावरची साय यासह अनेक गाजलेल्या नाटकांची निर्मिती त्यांनी केली होती.
कोल्हापूरच्या गडहिंग्लज येथील लहानशा गावातून गोविंद चव्हाण मुंबईला नशीब अजमवायला आले, पण कलेची आवड अगदी लहानपणापासूनची. गावात मुंबईतील नाटकांचे जे प्रयोग व्हायचे, ते चव्हाण जराही चुकवायचे नाहीत. स्थानिक कलाकारांसोबत छोटय़ा एकांकिका करायचे. त्यात साडय़ांचे पडदे लावण्यापासून पडेल ते काम करायचे. इयत्ता सातवीत असताना त्यांनी कै. विनोद हडप यांच्या बालनाटय़ात काम करून रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत छोटय़ा एकांकिकेचे प्रयोग करून आपली आवड भागवून घेतली. पुढे नोकरी आणि शिक्षणासाठी मोठय़ा भावाकडून १०० रुपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली. डिलाईल रोड येथे ग्रामस्थांच्या खोलीत राहू लागले. चव्हाण नोकरी सांभाळून शाहीर साबळे यांच्या लोककला पथकात तालमीला जायचे. इन्कम टॅक्समध्ये नोकरी लागल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खऱया अर्थाने स्थैर्य आले. मग जमेल तसा वेळ त्यांनी नाटकांची हौस भागवण्यासाठी दिला. नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. विविध स्पर्धांना ते बक्षिसं द्यायला लागले. नाटकांची आर्थिक गणितं, रंगभूमीचे बदलते ट्रेंड, हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवरचे प्रयोग या सगळ्यांचा अभ्यास ते काही वर्षे करत होते.
२००० साली त्यांनी मुलगी सुप्रिया हिच्या नावाने सुप्रिया प्रॉडक्शन ही निर्मिती संस्था सुरू केली. २००१ साली ‘पांडुरंग फुलवाले’हे पहिलं व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आणलं. त्यानंतर ’वन रूम किचन’ आणलं. दुधावरची साय, चॉईस इज युवर्स, जाऊ दे ना भाई, कथा, मदर्स डे, टाईम प्लीज या नाटकांची निर्मिती केली, पण खऱया अर्थाने नाटयक्षेत्रात त्यांचा जम बसला तो आनंद म्हसवेकर लिखित ’यू टर्न’ या नाटकामुळे. फक्त दोन पात्रं आणि फोल्डिंगचा सेट असलेल्या या नाटकाचे सुमारे 650 प्रयोग झाले. अनेक पुरस्कार ’यू टर्न’च्या वाटय़ाला आले. या नाटकाचा हिंदी, गुजराती आणि कन्नड भाषांमध्ये अनुवाद होऊन त्याचे प्रयोग झाले. चव्हाण यांचे ’हिमालयाची सावली’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून अजरामजर झालेले, श्रीराम लागू यांचा अभिनय साज असलेले नाटक रंगभूमीवर आणण्याचे धाडस त्यांनी केले आणि त्यात ते यशस्वी झाले.
गोविंद चव्हाण यांची अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, बोरिवली शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संस्थेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. व्यवसायाबरोबर नवीन कलावंतांचा शोध घेण्यासाठी त्यांनी संस्थेतर्फे एकपात्री अभिनय स्पर्धा काही वर्षे घेतल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याच धर्तीवर अनोख्या एकांकिका स्पर्धा घ्याव्यात असे त्यांच्या मनात आले. ‘वस्त्रहरण’फेम गंगाराम गवाणकर यांना सोबत घेऊन बोलीभाषा एकांकिका स्पर्धा सुरू केली. बोलीभाषेतील नाटकांना अजून व्यावासायिक रंगभूमीवर फारसे महत्त्वाचे स्थान नाही. हे स्थान मिळणे गरजेचे आहे. त्यातून बोलीभाषेचा अधिक प्रसार होईल असे चव्हाण यांचे म्हणणे असायचे. यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष होते. त्यांच्या पश्चात मुलगी सुप्रिया हिने ही स्पर्धा पुढे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच सुप्रिया प्रॉडक्शनचे ‘हिमालयाची सावली’ हे नाटकही सुरू राहणार आहे.
व्यावसायिक नाटय़ निर्माता म्हणून वावरताना चव्हाण यांनी नफातोटय़ाचे गणित कधीच मनात न ठेवता नाटकाचा पैसा नाटकालाच वापरायचा हे धोरण राबवले. त्यातून चांगलं नाटक, चांगला विचार प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या छोटय़ाशा स्वप्नांनी रंगभूमीकडे घेतलेला यू टर्न तमाम नाटय़ रसिकांसाठी अत्यंत सुखद होता, आनंदाची पर्वणी देणारा होता असंच म्हणता येईल.
गोविंद चव्हाण यांचे १३ जुलै २०२० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply