आज सकाळी सकाळी माझ्या एका घरकामच्या मदतनिसेचा फोन आला, ‘ताई, आज सकाळी पासून डोकं लई दुखतंय, मी आज काही कामाला येणार नाही.’ वाक्य तसं साधंच आहे, पण ते ऐकण्यात जास्त मजा होती,कारण हे वाक्य तिने शक्य तितक्या दुःखी आणि कष्टी आवाजात उच्चारलं. ही तिची खासियत आहे, जेंव्हा तिला सुट्टी घ्यायची असते, तेंव्हा ती शक्य तितक्या दुःखी आणि कष्टी आवाजात फोन करते, फोनवर बोलतांना सुद्धा जर आपण तिला एखादं वाक्य जास्त बोलायला लावलं तर असं वाटतं आता हिला रडूच फुटेल. दुसऱ्या दिवशी कामाला आली ना की, काल फोनवर बोलणारी हीच का ती, एवढी शकां यावी, एवढी ती नॉर्मल असते. ???आता एवढे वर्ष कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करतांना एवढं नक्कीच समजायला लागलं आहे, की कोण खरंच आजारी आहे आणि कोण आजाराचे सोंग घेऊन बुट्टी मारायची तयारी करतंय. मला गम्मत वाटते ती त्या “नाटकीय आवाजाची” जो आपण अगदी सहज काढतो.
परवा एक नातेवाईक (ज्यांना नातेवाईक म्हणणे ना इलाज आहे) तिचा फोन आला. काहीच गरज नसतांना माझ्याबद्दल तिला किती आत्मीयता आहे हे ती तिच्या आवाजातून जाणवून देण्याचा प्रयत्न करत होती. सारखं एक पालुपद तिच्या वाक्याच्या शेवटी डोकावत होतं की, “बाकी काही नाही ग, तुमची काळजी वाटली म्हणून विचारलं”. मला बोलतांना समजत होतं, पण हल्ली मी असे ” नाटकीय आवाज” तेवढ्याच “नाटकीय भाषे” सकट एन्जॉय करायला लागले आहे.
आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक काकू राहायच्या. आता म्हातारपणा मुळे, रिकामपण होतच, पण त्यांचा मुळ स्वभाव पण त्याला कारणीभूत आहेच म्हणा. त्यांना ना आपल्या सोसायटीतल्या प्रत्येकाच्या घरात काय चाललं आहे, हे जाणून घ्यायची फारच इच्छा (खरं ह्या ठिकाणी दुसरा शब्द अपेक्षित आहे ? )असायची. पण असं सरळ कसं विचारायचं ना, तर त्या आपल्या आवाजात “नाटकीय स्वभावीकता / सहजता” आणून विचारायच्या, “काल उशीर झाला का ऑफिस मधून यायला?, नाही तुझ्या हॉल चा लाईट उशिरा लागला ना म्हणून. किंव्हा “सगळं ठीक आहे ना ग?, नाही परवा जरा मोठ्या आवाजात कोणाशी तरी बोलतं होतीस??, किंव्हा ‘अग त्या शेजारच्या साठे काकू आहेत ना, त्यांचा कडे काल पाहुणे आलेत, दुपारी २ वाजता’ पण ही सगळी वाक्य त्या स्वाभाविक नाटकीयते ने पूर्ण. आधी आधी हसू यायचे, मग चीड यायला लागली आणि आता खरं सांगायचं तर त्यांची कीव येते.
माझ्याकडे वर्षातून ३-४ वेगवेगळ्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने मी माझ्या सगळ्या शेजारीणी, नातेवाईक आणि मैत्रिणींचा जमावडा जमवत असते. ती संध्याकाळ, त्याच्या आधीचे तयारीचे दिवस आणि नंतर आठवणींचे दिवस फार मजेचे असतात. बरेचदा असं पण होतं, की मैत्रिणी नातेवाईक म्हणतात, अग तुझं हे हळदीकुंकू कधीच आहे? म्हणजे मी आधीच विचारून ठेवते. तर मुद्दा असा की अश्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये कोणीतरी असे असतातच की जे इतर सगळे म्हणताहेत म्हणून तुमची तारीफ करतात पण अतिशय “नाटकीय गोड आवाजात”. मग हल्ली हल्ली मी पण सुरू केलं, “अरे वा, तू म्हणतेस ना मग माझी खात्री पटली” असं म्हणून ती “नाटकीय गोड तारीफ” स्वीकारायला.
हल्ली प्रशिक्षण (म्हणजेच training) वर्गांमधून आम्ही बरेचदा हे सांगायचा प्रयत्न करतो की आवाजाचे “आरोह-अवरोह” किती महत्वाचे आहेत. हे आपल्याला शिकवावे लागते आणि शिकावे सुद्धा लागते, पण ही नाटकीयता आपण किती सहज शिकतो.
सहज मनात आलं, लहान मुलं ज्यावेळी अशी नाटकीयता आपल्या आवाजात आणून, चेहरा बदलून काही बाही बोलतात, त्यावेळी घरातले सगळे टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करतात आणि त्याला प्रोत्साहित करतात, हे तर मुळ नाही ना त्याचे?
तुम्हाला काय वाटतं?
— © सोनाली तेलंग
०७/०९/२०१८
Leave a Reply