मामा वरेरकर म्हणजे भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांचा जन्म आणि शिक्षण मालवणला झाले. त्यांचा जन्म २७ एप्रिल १८८३ रोजी झाला. त्यांनी वीस वर्षे पोस्ट खात्यात नोकरी केली. मामा वरेरकर हे मूक जमान्यापासून चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनी आळतेकर, मनोहर दीक्षित, नायामपल्ली, पी. जयराज, नंदू खोटे अशा सुशिक्षित तरुणांना चित्रपटसृष्टीत जायचा सल्ला दिला. वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात होणाऱ्या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना भा.वि. वरेरकरांनी ’ नवीन रासक्रीडा ’ नावाचे नाटक लिहिले. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले तरी आपण नाटक लिहू शकतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणार्या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला.
मामांनी काही वर्षे ‘पूर्णिका’ नावाचे सिनेसाप्ताहिक संपादित केले होते. १९२८ साली त्यांनी ‘इंपिरियल फिल्म’ कंपनीसाठी ‘जगद्गुरू शंकराचार्य’ हा चित्रपट लिहून दिला होता. त्यांनी पुढे त्याच कंपनीसाठी ‘ जुगारी धर्म ‘ आणि ‘ गोरीवाला ‘ असे चित्रपट लिहिले. ‘पुण्यावर हल्ला’ हा मूकपट निर्माण करून त्याचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारलेला ‘महात्माज मिरॅकल’ हा अनुबोधपटही निर्माण केला होता.
मामा वरेरकर यांनी पहिल्यादा मराठी भाषेतील संपूर्ण लांबीच्या पहिल्या सामाजिक बोलपटाचे कथा-संवाद आणि गीतलेखनही केले. त्या चित्रपटाचे नांव होते ‘ विलासी ईश्वर ‘, हा चित्रपट त्यांनीच दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट मा. विनायक यांनी केला होता. पुढे त्यांनी दादासाहेब तोरणे यांच्या ‘ ठकसेन राजपुत्र ‘ या चित्रपटाचे लेखनही केले होते. ‘ आवारा शेहजादा ‘ या नावाने तो चित्रपट हिंदीतही आला होता. दुर्गा खोटे यांच्या ‘ नटराज फिल्म्स ‘ चा ‘ सवंगडी ‘ हा चित्रपट १९३८ साली आला होता त्यासाठी त्यांनी मामांची मदत घेतली होती. पुढे मामांनी याच कथेवरून ‘ मलबार हिलच्या टेकडीवरून ‘ ही कादंबरी लिहिली. बाबुराव पेंढारकर यांच्या ‘ विजयाची रूपे ‘ ह्या १९३६ च्या बोलपटात मामांनी चित्रपटाची कथा, संवाद, गीतरचना आणि दिग्दर्शनही केले होते. हंसा वाडकर यांचा हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट खूप गाजला. ‘ सत्तेचे गुलाम ‘ हे मामांचे गाजलेले नाटक त्यावर केशव तळपदे यांनी ‘ कारस्थान ‘ हा चित्रपट तयार केला.
इ.स. १९०८ साली त्यांनी ‘कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक रंगभूमीवर ७ सप्टेंबर १९१८ रोजी आलेले ‘ हाच मुलाचा बाप ‘ हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली आणि लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते. त्यांच्या नाटकांचे भारतातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले.
वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ‘ ललितकलादर्श ’चे लोकप्रिय नाटककार होते. मामा वरेरकरांनी विपुल साहित्य लिहिले. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय अनेक कथा कांदंबर्या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत. त्याचप्रमाणे ६० ते ६५ अनुवादित कादंबऱ्या आहेत. नाटककार आणि साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. संसद सभासद म्ह्णून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. या साहित्यिकाला माणसांची आणि गप्पागोष्टींची अतोनात आवड होती. त्यांच्यासारखा दर्दी साहित्यिक विरळाच!. त्यावेळी अत्रे आणि फडके जसा वाद होता त्याचप्रमाणे आचार्य अत्रे यांच्या ‘ कऱ्हेचे पाणी ‘ आत्मचरित्रात्मक ग्रंथामध्ये मामांबद्दल अत्रे काय धमाल बोलत होते ते वाचून कळते की मामा वरेरकर काय आणि कशी व्यक्ती होते ते कळते.
मामा वरेरकर यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला. त्याचप्रमाणे संगीत नाटक अकादमीची फेलोशिप त्यांना मिळाली होती. धुळे येथे झालेल्या १९४४ साली झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, त्याचप्रमाणे १९३८ साली पुण्यात भरलेल्या २९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. मामा वरेरकर यांच्याबद्दल खूप काही लिहिता येईल. मामांचा गप्पा मारण्याचा स्वभाव आणि त्यातून निर्माण होणारे वाद हे त्यावेळच्या सभांमधून, वृत्तपत्रातून गाजत असत. उदाहरणार्थ ‘ नेहरूंची सिगरेट आणि मामांची विडी ‘ ह्याबद्दल अत्रे धमाल बोलत असत. काहीही असो मामा साहित्यातील दर्दी होते हे मान्यच करावे लागेल.
मामा वरेरकर यांचे ३ सप्टेंबर १९६४ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
मामा वरेरकर यांनी पर्ल बक च्या द गुड अर्थ चं भाषांतर केलं आहे का?