वामन शंकर तावडे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९५० रोजी चेंबूरला झाला. त्यांचे वडील रत्नागिरीचे तर आई कोल्हापूरची, चेंबूरला ते रेल्वे स्टेशनजवळ ज्या बराकी होत्या त्याला पुढे लेबर कॅम्प म्हणत तेथे रहात होते. तेथेच त्यांचा जन्म झाला. सातवी पर्यंत सरकारी शाळेत त्यांचे शिक्षण झाले आणि त्यानंतरचे शिक्षण चेंबूर हायस्कुलला झाले. त्यावेळी तेथे जातींचे प्राबल्य होते त्यामुळे जातीप्रमाणे लोक विखुरलेले होते. त्यांचे वडील लेबर वेलफेअरचे ऑफिस सांभाळायचे . त्यांच्याइथे चेंबूरला लांजा , कोकण विभागातून नमन , खेळे येत असत ते वामन तावडे आवडीने बघत. हळूहळू त्यांची अभिरुची वाढत गेली. त्यांच्या विभागात रवळनाथ म्हणून एक क्रीडा मंडळ होते तेथे १९५२ पासून शिवजयंती साजरी होत असे. त्या शिवजयंतीला लालबाग-परळ विभागातून आलेली कामगारांची नाटके ते बघत. नाटकांच्या तालमी ते बघत असत, नट मंडळीशी दोस्ती करायची , कुणाला पान -तंबाखू- सिगरेट आणून देणे , जेणेकरून नाटक , नट यांच्याशी ओळख होईल कारण नाटक या विषयाचे त्यांना आकर्षण वाटत असे . हायस्कुलमध्ये जी नाटके व्हायची त्याचे ते बॅकस्टेज सांभाळायचे . नाटकाच्या संबंधित जे काही असायचे त्यात त्यांची आवड-अभिरुची निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांना एक जाणवले की कामगारांची नाटके वेगळी असतात , शिवाजी मंदिरची नाटके वेगळी असतात.
त्यांनी एक नाटक लिहावयास घेतले . अभिनेता सुशील गोलतकर त्यांचा शाळेतला मित्र होता. सुशील गोलतकरमुळे ती आवड वाढली. यावेळी चेंबूरला पु. ल. देशपांडे यांची बहीण रहात होती मीरा दाभोळकर त्यांचे नाव होते. मीराताईनी ‘ यशोमंदिर ‘ नावाची एक नाट्यसंस्था स्थापन केली होती. तेथे ते नाटक असले की बॅकस्टेजचे काम करायचे , तालमीला हजर रहायचे मीराताईची मुलगी होती उषा दाभोळकर त्या दोघी नाटकाविषयी चर्चा करायला लागल्या की वामन तावडे मध्येच काही बोलायचे , ह्याकडे दोघींचे लक्ष होते मग एक दिवशी म्हणाल्या तूच नाटक लिही आणि तूच लिहू शकशील असे आम्हाला वाटत आहे. कारण तू बरोबर नाटकातले पॉईंट काढतोस , तूच लिही .
त्या आधी वामन तावडे यांच्याकडे एक न्यूनगंड होता तो म्हणजे सर्वजण इतके शिकलेले आपले शिक्षण कमी परंतु हा न्यूनगंड त्यांचा मित्र सुशील गोलतकरने घालवायचा आधीच प्रयत्न केला होता. वामन तावडे यांनी त्यावेळी अण्णाभाऊ साठे यांची ‘ फकिरा ‘ वाचलेली होती त्याचा खुपसा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. ते ज्या भागात रहात होते त्या भागात अण्णाभाऊ साठे यायचे तेव्हा हे अण्णाभाऊ साठे मोठे शाहीर आहेत असे सांगितले गेले म्हणून त्यांनी ती कादंबरी ग्रंथालयातून घेतली होती. वामन तावडे यांनी ‘ फकिरा ‘ डोक्यात ठेवून एका दरवडेखोरावर नाटक लिहिले. साधरणतः एक वर्ष लागले. त्या नाटकाचा मुहूर्तही केला. सगळ्यांना ते नाटक आवडले होते. तो मुहूर्त त्यावेळचे रंगमंच कलाकार श्री. जोगळेकर यांनी केला. आणि काय कुणास ठेऊन आपण दुसऱ्यांची नाटके बघीतली पाहिजेत म्ह्णून त्यांनी पाहिले व्यावसायिक नाटक ‘ वाहतो ही दुर्वांची जुडी ‘ हे नाटक पाहिले ‘ त्यांना जरा वेगळे वाटले त्यांनी त्याची तुलना मनातल्या मनातआपण लिहिलेल्या नाटकाशी केली केली तेव्हा त्यांना काहीतरी जाणवले. त्यानंतर त्यांनी ‘ काळे बेट लाल बत्ती ‘ हे नाटक पाहिल्यावर त्यांना त्यांचे लिहिलेले नाटक कुठेतरी फसले आहे असे जाणवले आणि त्यांनी जेव्हा तिसरे नाटक ‘ अवध्य ‘ पाहिले तेव्हा जाणवले आपले हे नाटक काही खरे नाटक नाही त्यांनी ते नाटक फाडून टाकले. त्या नाटकांचे नाव होते ‘ आशीर्वाद ‘. कारण त्यांना वाटले आपले नाटक बरोबर नाही , फालतू आहे . हे त्यांचे आत्मपरीक्षण आपल्या स्वतःच्या नाटकाबद्दल होते. आपला हा प्रांत नाही असे त्यांना वाटले , परंतु मन स्वस्थ बसू देईना . नोकरीपण लागली होती , मग त्यांनी १९६९ साली म्युन्सिपल नाट्य स्पर्धेत त्यांनी एकांकिका लिहिली त्यात त्यांना उतेजनार्थ बक्षीस मिळले. त्या नाटकाचे नाव होते ‘ सुतक ‘ . लोकांना कुतूहल होते एका कामगाराचा मुलगा नाटक लिहितो हे महत्वाचे. वयाच्या २५ व्या वर्षी काही घटना घडलेल्या पहिल्या. एका मुलाने आत्महत्या केली त्याआधी त्यांनी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता . तर दुसरीकडे एक वेगळी घटना घडली आणि त्यांनी त्या दोन घटना एक दोन अंकी नाटकात घेतल्या . त्या नाटकाचे नाव होते ‘ छिन्न ‘ . दोन वर्षे ते नाटक एक संस्थेकडे होते .
त्यानंतर एकदा सदाशिव अमरापूरकर सूर्याची पिल्ले नाटकासाठी मुंबईत आले असताना त्याच्या वाचनात ते नाटक आले . त्यांनी ते स्पर्धेसाठी घेतले , ते नाटक १९७८ ला नाशिक केंद्रातून पहिले आले. त्या नाटकाच्या वेगळ्या विषयाचा गवगवा झाला आणि ते नाटक आय. एन . टी . ने करण्याचे ठरवले त्यावेळी नाटकात तीन अंक असत. मग अमरापूरकर यांना वामन तावडे म्हणाले मी सगळे करतो, तेव्हा तावडे म्हणाले मी व्यवस्थित करतो त्यासाठी अमरापूरकर त्यांना नगरला घेऊन गेले. त्यावेळी स्मिता पाटील यांनी काम केले , स्मिता पाटील यांना ते नाटक सुभाष अवचट यांनी वाचायला दिले होते . त्या हिंदी चित्रपटात बिझी असूनही त्यांनी त्यात काम करण्याचे स्वीकारले. ‘ छिन्न ‘ सारखेच नाटक अजूनही झाले नाही असे अनेक जाणकार सांगत. या नाटकात सदाशिव अमरापूरकर , स्मिता पाटील, सुशील गोलतकर , आशालता , दिलीप कुलकर्णी काम करत होते. ह्या नाटकांचे १०० प्रयोग झाले तर गुजराथीत ५०० प्रयोग झाले. गुजराथीत निकिता शहा , तरला महेता , मुकेश रावल काम करत होते. त्या गुजराथी नाटकाचे दिग्दर्शक होते सुरेश राजदा.
पु..ल. देशपांडे वामन तावडे यांच्यावर या नाटकामुळे खूष झाले तसे ते त्यांना आधीपासून ओळखत होते. छिन्नच्या प्रयोगाच्यावेळी त्यांनी एक प्रकाशकांची स्वतः त्यांच्याजवळ जाऊन सांगितले होते ‘ हे ह्या नाटकाचे लेखक ‘ त्यांचे पुस्तक तुम्ही छापा. त्यांच्या आयुष्यात मिळणाऱ्या यशामुळे त्यांच्या आयुष्यात चढउतार आले . पण अत्यंत शांतपणे त्यांच्या मित्रांनी, घरच्यांनी त्यांना सांभाळले.
वामन तावडे यांनी खऱ्या अर्थाने पहिली एकांकिका लिहिली ‘ दि कंन्स्ट्रक्शन ‘ . ती एकांकिका कामगारांच्या आयुष्यावर होती. ती एकांकिका जिथे जिथे झाली तेथे त्या एकांकिकेला बक्षिस मिळाले. ती एकांकिका मराठी , हिंदी, गुजराथी , कानडी भाषेत झाली . त्याच्या ‘ चौकोन ‘ या वेगळ्या विषयावरील नाटकात अश्विनी एकबोटे होती. वामन तावडे यांची नाटके , एकांकिका सर्वच चाकोरी सोडून होत्या त्यामुळे त्याच्या लिखाणाला महत्व आले , विशेषतः त्या त्या वेळची प्रयोगशील तरुण पिढी त्यांच्या लॆखानाचा स्वीकार करत असे. अजूनही त्यांचे लिखाण चालू आहे.
‘ मी घोडा हुसेनच्या चित्रातला ‘ , ‘ पिदी ‘ या एकांकीका लिहिल्या. पिदीच्या वेळेला प्रकाश बुद्धीसागर त्यांच्याबरोबर होते आणि स्वाती चिटणीस यांच्या आयुष्यातली ती पहिली एकांकिका होती. रायाची रापी या एकांकिकेला दूरदर्शनचा पुरस्कार मिळाला. वामन तावडे यांनी आक्रन्दन , इमला, यमुना , अआई , चौकोन , माऊली , कॅम्पस (तुम्ही आम्ही) , जिप्सी , नादखुळ्या , वंदे मातरम या एकांकिका लिहिल्या. या सर्व एकांकिकांना राज्य शासनाची पारितोषिके मिळाली. महेंद्र तेरेदेसाई बरोबर त्यांनी लक्ष्मण झुला टेली फिल्म केली . दूरदर्शनसाठी विनय आपटे वामन तावडे यांची मालिका केली. अगदी शेवटी शेवटी ते एक नाटक लिहीत होते, त्यासाठी ते ठाणा कोर्टात जात असत, केसेस कशा चालतात, वकील , जज , आरोपी सगळ्याचे निरीक्षण करत, ते दिवशी जवळजवळ बहुतेक कथानक फोनवरून तासभर मला सांगत होते. एकदा असेच सकाळी गडकरी रंगायतनला भेटले, म्हणालो काका घरी चला चहा प्यायला . मी गप्पा मारता मारता मी त्यांना म्हणालो काका तूमच्याबद्दल बोला आधी नाही म्हणाले पण मी खूप आग्रह धरला आणि माझ्या मोबाईलने ती मुलाखत शूट केली. आज ती वामन तावडे यांची एकमेव मुलखात उपलब्ध आहे अर्थात माझ्या माहिती प्रमाणे.
वामन तावडे हे उत्तम चित्रकार होते , तसेच उत्तम माणूस .ते माझ्या डोंबिवलीच्या स्वाक्षरी संग्रहालयात आले आणि भितीवर माझे त्यांनी स्केचही काढले. त्याचप्रमाणे ते माझ्या स्वाक्षरीच्या मुलुंड मधील प्रदर्शनाला आलें होते.
वामन तावडे यांचे अल्पशा आजाराने 7 मे 2019 रोजी निधन झाले
— सतीश चाफेकर.
Leave a Reply