रमाकांत आचरेकर यांचा जन्म ३ डिसेंबर १९३२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे गावात झाला.
रमाकांत विठ्ठल आचरेकर यांना क्रिकेटचा वारसा जन्मापासूनच मिळाला. त्यांचे वडील, काका आणि भाऊ या साऱ्यांनाच क्रिकेटचे प्रचंड वेड. मालवणच्या टोपीवाला स्कूलच्या मोठ्या मैदानावर आचरेकर त्यांच्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या वर्गांतल्या खेळाडूंचे सामने आयोजित करायचे. अगदी शेतातही ते क्रिकेट खेळायचे.
पुढे ते मुंबईत आले. त्यांचे वडील धनराज मिलमध्ये होते आणि त्या मिलच्या क्रिकेट टीमचे कॅप्टनही होते. त्यांनी नंतर न्यू हिंद क्लबचेही प्रतिनिधित्व केले. घरातच बाळकडू मिळाल्यामुळे आचरेकरांची क्रिकेटची आवड अधिकच जोपासली गेली. त्यांनीही पुढे न्यू हिंद क्लबकडून खेळायला सुरुवात केली. यंग महाराष्ट्र क्लबकडूनही ते खेळले.
नामवंत क्रिकेटपटू पी. के. कामथ यांच्याकडून त्यांनी क्रिकेटचे धडे घेतले. भारताचे माजी खेळाडू दत्तात्रय उर्फ दत्तू पराडकर यांच्या खेळाचाही प्रभाव त्यांच्यावर होता. वेगवेगळ्या क्लबकडून खेळल्यानंतर पुढे ते स्टेट बँकेत नोकरीला लागल्यावर त्या बँकेच्या संघाकडूनही ते खेळले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ अनेक सामने जिंकला. पुढे भारतीय संघाचे कॅप्टन झालेले अजित वाडेकर हे स्टेट बँकेतले त्यांचे सहकारी खेळाडू होते. ‘आचरेकर म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमधील डॉन ब्रॅडमन होते,’ असा गौरव वाडेकर यांनी केल्याचा उल्लेख पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे. मोइन उद दौला क्रिकेट स्पर्धेत त्यांना स्टेट बँकेच्या संघाकडून हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळता आले. तो त्यांचा एकमेव प्रथम श्रेणी सामना ठरला.
ते उत्तम फलंदाज आणि यष्टिरक्षक होते. पुढे त्यांनी १९६८च्या सुमारास प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली आणि प्रशिक्षक म्हणून स्वतःला वाहून घेतले. भारतीय क्रिकेटचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे, तर विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अजित आगरकर, रमेश पोवार, लालचंद राजपूत, बलविंदर संधू, सुलक्षण कुलकर्णी, समीर दिघे, पारस म्हांबरे असे त्यांचे अनेक खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले. नरेश चुरी, विशाल जैन, श्रेयस खानोलकर, मनोज जोगळेकर, नितीन खाडे, संदेश कवळे, विनायक सामंत, अमित दाणी, किरण पोवार असे त्यांचे कित्येक विद्यार्थी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले.
आचरेकर सरांनी स्थापन केलेला क्लब सध्या त्यांची कन्या कल्पना मुरकर आणि जावई दीपक मुरकर चालवतात.
आचरेकर सरांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारकडून त्यांना १९९० मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला. तसेच २०१०मध्ये त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले होते.
सचिनच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘आचरेकर सर आता स्वर्गातला खेळ समृद्ध करतील…!’
रमाकांत आचरेकर यांचे २ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply