नवीन लेखन...

दुहेरी प्रेमप्रकरण

१.
“धिक् तं च, तां च, इमां च मदनं च मां च” समोरची व्यक्ती जे सांगत होती, ते ऐकून यशवंताना हा जुना संस्कृत श्लोक आठवत होता. संपूर्ण श्लोक असा आहे, “यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता साप्यन्यं इच्छति जनं स जनोऽन्यसक्तः । अस्मत्कृते च परिशुष्यति काचिद् अन्या धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥” ह्याचा अर्थ – राजा म्हणतो, मी जिचा (पिंगलाचा) सतत विचार करतो, तिला माझ्यांत रस नाही, तिला दुसराच कुणी (अश्वपाल) आवडतो, ज्याला तिसरीच (राजनर्तिका) आवडते आणि त्या तिसरीला (राजनर्तिकेला) दुसराच कुणी म्हणजे मीच आवडतो. तिचा, त्याचा, मदनाचा, हीचा आणि माझाही धिक्कार असो. त्यांच्यासमोर एक श्रीमंत व्यक्ती बसलेली आहे. तिचं नांव आहे. राजकुमार मोकाशी. राजकुमार एका खाजगी कंपनीचे अध्यक्ष व मालक आहेत. त्यांचा व त्यांची पत्नी अस्मिता हीचा पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे. त्यांच तिच्यावर आजही तेवढचं प्रेम आहे. दुर्दैवाने अस्मिताचं मात्र आता एका कलाकाराने मन जिंकलं आहे. त्याचं नांव आहे राघव ठाकूर. अस्मिताने राजकुमारपासून हे लपवलेलं नाही. तिने सरळ त्याला सांगून टाकले आहे. मात्र त्या राघवसाठी अस्मिता ही अनेकींपैकी एक आहे, हे सत्य अस्मिताला समजतं नव्हतं. यशवंत शांतपणे राजकुमार मोकाशीची प्रेमकथा ऐकून घेत होते. ह्या प्रेमप्रकरणांत आपला सल्ला घ्यायला कांही हा राजकुमार आलेला नाही, हे त्यांना ठाऊक होतं.

२.
राजकुमार म्हणाला, “मी तुमच्याकडे आता अशासाठी आलोय की काल एक पोलिस अधिकारी मला येऊन भेटून गेले. ते म्हणाले, ‘राजकुमार, तुम्ही खरं काय ते आम्हाला सांगाल तर बरं होईल. नाही तर आम्ही ते शोधून काढूच.’ मी विचारले, ‘आपण कशाबद्दल बोलताय? मी समजलो नाही. काय खरं सांगू? कशाबद्दल?’ पोलिस अधिकारी म्हणाले, ‘वेड पांघरून पेडगांवला जाऊ नका. तुम्ही राघव ठाकूर ह्यांना खूनाच्या धमक्या देतां, अशी तक्रार त्यानी स्वत: आमच्याकडे केली आहे. तुमच्याकडून मेसेजेस आलेले आहेत त्यांना! ते ही त्यांनी दाखवलेत. तेव्हा मी केलं नाही, असं सांगू नका. हे ताबडतोब थांबवा.’ मला काय बोलावं तेंच समजेना. एक तर असं धमकावणं वगैरे माझ्या रक्तातच नाही. बरं केलं तरी मी माझा नंबर वापरून कसा करीन? मी त्यांना परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न केला की मी असं कांही केलं नाही. शेवटी त्यांनी मला सांगितले, “तुमचं समाजातलं स्थान लक्षांत घेऊन दोन दिवसांची मुदत तुम्हाला देतो. त्यानंतरही त्यांना असेच धमकीचे कॅाल वा मेसेजेस आले तर आम्ही त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन तुम्हाला अटक करू.” मग ते निघून गेले. मी विचार करत राहिलो की त्याला जर खरंच धमक्या येत असतील तर कोण देत असेल? त्यांतही माझ्या फोनवरून धमकी कशी पाठवली गेली असेल?’

३.
यशवंत म्हणाले, “पत्नीशी बोललात कां ह्याबद्दल?”. राजकुमार म्हणाले, “तिनेच मला फोन करून जाब विचारला आहे. खूप चिडली आहे. तिची तर खात्रीच आहे की हे मीच करतोय. धुरंधर साहेब मला वाचवा. पोलिसांनी अटक केली तर बदनामी होईल आणि कंपनीवरही परिणाम होईल.” यशवंत म्हणाले, “राघवला कोण खरंच धमक्या देतंय, हे शोधून काढायला हवं.” राजकुमार तिथून निघाले. यशवंतानी आपल्या परिचयातील कलाकारांशी बोलायला सुरूवात केली. सर्वांच म्हणणं एकच होतं की राघवचे अनेक ‘अफेअर्स’ आहेत. तसेच त्याला शत्रुही अनेक आहेत. त्याला अशा धमक्या पूर्वीही आल्या असणार. ह्यावेळी त्यातील एक दोन मेसेजेस ह्यांच्या मोबाईलवरून आल्यामुळे त्याने ह्यांची तक्रार केली होती? ह्यांचा मोबाईल त्यांत कसा आला? यशवंतानी एक फोन आपले मित्र इन्सपेक्टर हिरवेंना केला व अत्यंत थोडक्यात माहिती दिली. यशवंतानी चंदूला राघवच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. चंदू लगेच दुसऱ्या दिवसापासून कामाला लागला होता. यशवंताशी फोनवर संपर्क ठेवून होता. “आता राघव घरांतून बाहेर पडला आहे. बहुदा शूटींगसाठी स्टुडीओत जात असावा. स्वत:च ड्राईव्ह करतोय.” थोड्या वेळाने मेसेज आला “वरळी सी लिंकने तो वेगांत गेल्याने मला आता दिसत नाहीय.” मग बराच वेळ कांही मेसेज नव्हता आणि मग धक्कादायक फोन आला, “मामा, राघव ठाकूरचा खून झालाय. भर रस्त्यांत गाडी थांबलेली आहे. तो बाजूला रक्तबंबाळ अवस्थेत पडला आहे. एक पोलिस आला आहे. त्याने पोलिस स्टेशनला कळवले आहे.”

४.
यशवंतानी लगेच राजकुमारला फोन केला. “कुठे आहात तुम्ही?” राजकुमार म्हणाला, “कंपनीच्या ॲाफीसात. आजही महत्वाची मिटींग आहे.” यशवंत म्हणाले, “मन घट्ट करा. राघवचा खून झालाय. भर रस्त्यावर. हल्लेखोर पळून गेलेत. पोलिस तुमच्यावर संशय घेऊन तुम्हाला अटक करण्याची शक्यता आहे. मी बोललो आहे पोलिसांशी पण कांही सांगता येत नाही.” राजकुमार फोनवरच ओरडले, “अरे देवा!” मग रडवेल्या आवाजात म्हणाले, “माझा खरंच कांही संबंध नाही हो ह्यांत!” यशवंत म्हणाले, “पोलिसांनी प्रश्न विचारले तर सर्वांची खरी उत्तरे द्या. तुम्हाला कांही होणार नाही, ह्याची मी हमी देतो. हा खून कोणी केला आहे, हे आपण नक्कीच शोधून काढू. तुम्ही मला भेटल्यानंतर काय काय केलं; कुठे, कुठे गेलात, हे संगतवार आठवून लिहून काढा आणि मला पाठवा. बाकीचं मी बघून घेईन.” यशवंतनी फोन ठेवला आणि चंदूचा फोन आला. चंदूने रिपोर्ट दिला. “आता पोलिसांचा ताफाच इथे आहे. गर्दी हटवत आहेत. पंचनामा चालू आहे. झटापट झाल्याची कांही चिन्हे नाहीत. राघवचे शव स्ट्रेचरवर आहे. ते पोस्ट मॅार्टेमसाठी नेत आहेत.” मी लोकांत मिसळून कोणी प्रत्यक्ष पहाणारा कांही सांगतोय कां ते पहातोय. परत रिपोर्ट पाठवीन.”

५.
“मी तुमच्याकडून कंपनीच्या मिटींगसाठी निघालो. नेहमीप्रमाणे ॲाफीसमध्ये गेलो. मिटींग महत्वाची होती म्हणून मी तो विचार डोक्यांतून काढून टाकला. केबीनमधे जातानाच माझ्या सेक्रेटरीला विचारले, “संध्या, सर्व पेपर्स तयार आहेत ना?” संध्याने एक फोल्डर दाखवला आणि म्हणाली, “सर सर्व महत्वाचे पेपर्स नंबर घालून ह्यात ठेवले आहेत.” माझी सेक्रेटरी संध्या अतिशय शिस्तबध्द आणि व्यवस्थित काम करणारी आहे. गॅाड ब्लेस हर.” मी केबिनमध्ये गेलो आणि माझा मोबाईल वाजला. मला मिटींगला जायची घाई होती आणि फोन घ्यायला अजिबात वेळ नव्हता. तरीही परत परत फोन वाजतच राहिला. मी तो कोणाचा आहे, हे न पहातांच माझा मोबाईल संध्याकडे दिला आणि मी मिटींगरूममध्ये गेलो. कंपनीच्या रिसर्च विभागाने एक नवीन ड्रग तयार केला होता. सापाच्या विषावर अत्यंत प्रभावी औषध तयार केलं होतं. ते आम्ही मार्केट करणार होतो. बोर्डाने जुजबी माहिती घेऊन प्रॅाडक्टचं मार्केटींग करायला परवानगी दिली. मिटींग संपली. मी परत केबीनमधे आलो. मला मिटींगपूर्वी आलेल्या फोनची आठवण आली. मी म्हटलं, “संध्या कोणाचा होता फोन?” संध्या म्हणाली, “अस्मिताचा फोन होता. तुम्ही मिटींगनंतर फोन कराल, असं मी तिला सांगितलं.”

६.
अस्मिताने पुन्हा तोच विषय काढला, “तू धमक्या देणं बंद करणार आहेस की नाही?” थोड्या बोलाचालीनंतर मी शेवटी ओरडून म्हणालो, “अस्मिता, स्टाप इट. नाही तर मला स्वत:लाच जीव द्यावा लागेल.” मी फोन कट केला आणि स्वीच ॲाफ केला. संध्या ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर विषाद दिसत होता. संध्याला सर्वच गोष्टी माहित होत्या पण आम्ही कधी आपापसांत त्याबद्दल बोललो नव्हतो. आजही ती एव्हढेच म्हणाली, “सर, सांभाळा स्वत:ला! त्या दोघांच्या वर्तनाची शिक्षा स्वत:ला देऊ नका.” तिने मला आधार दिला व खुर्चीवर नेऊन बसवले. मी बेचैनच होतो.

संध्याने मला पाणी दिले. लहान मुलाप्रमाणे ती माझ्या डोक्यावर थोपटत होती. नंतर मी स्वत:ला सांवरले. संध्याच्या मदतीने ॲाफीसचे काम पाहू लागलो. त्यानंतर आतांपर्यंत विशेष कांही घडलं नाही. आता मी पुन्हा ॲाफीसच्या एका महत्त्वाच्या मिटींगसाठी आलो असतांना तुमचा फोन आलाय! धुरंधर साहेब, मी पोलिसांना सत्यच सांगीन पण ते माझ्यावर विश्वास ठेवतील कां?” यशवंत म्हणाले, तुम्हाला अटक होणार नाही पण तुमचे स्टेटमेंट नक्कीच घेतील. तुम्ही कंपनी आणि घर सोडून कुठे जाऊ नका.” यशवंतनी फोन ठेवला. ते आता पोस्ट मॅार्टेम रिपोर्ट काय येतो, ह्याची वाट पहात होते. चंदूही हॅास्पिटलमध्ये त्या रिपोर्टचीच वाट पहात होता.

७.
पंचनाम्यात नोंद केल्याप्रमाणे राघवचा खून भोसकून झाला होता. कांहींच्या म्हणण्याप्रमाणे दोन व्यक्तींनी आपली कार मधे घालून कलाकाराची कार थांबवली होती. त्या कारमधून दोन बुरखाधारी व्यक्ती बाहेर आल्या. एक उंच व एक थोडी बुटकी. बुटकी व्यक्ती कलाकाराला कांहीतरी बोलत होती. कलाकार रागाने कांही बोलला आणि दुसऱ्या उंच बुरखाधारीने दोनदा कांहीतरी कलाकाराच्या पोटांत जोरांत खुपसले. रक्ताची धार लागली. कलाकार जरासाच धडपडला आणि मग जमिनीवर पडला. यशवंत हे परत आठवत असतांना पोस्ट मॅार्टेम रिपोर्टबद्दल चंदूचा फोन आला, “मामा, खून धारदार सुऱ्याने झाला असावा. वार करणारी व्यक्ती डावरी आणि बळकट असावी. मृत्यू लगेचच झाला होता. मृत व्यक्तींचे लीव्हर खराब होते व मरण्याआधीही तो प्यालेला होता.” ह्यांतली महत्वाची माहिती हीच होती की खून करणारा डावरा असावा. बळकट असावा. राजकुमार डावरे नव्हते आणि निरोगी असले तरी बळकट नव्हते. त्यामुळे यशवंताना आता त्यांची काळजी नव्हती. त्यांच्यावर आरोप ठेवायला पुरावाच नव्हता. यशवंताना तरीही खून कोणी केला असेल, ते शोधायची इच्छा होती. त्याला अनेक शत्रु असल्याने ते काम कठीण होते.
८.
यशवंत फोन न करताच राजकुमार ह्यांच्या कंपनीच्या ॲाफीसमध्ये गेले. राजकुमार केबिनमध्ये होते. संध्याने त्यांचे स्वागत केले. ती म्हणाली, “सर तुमच्याबद्दल खूप सांगतात. तुम्ही त्यांना त्या धमकीच्या प्रकरणात वाचवाल, ह्याची त्यांना खात्री होती. आता तर तो दुष्ट कलाकार त्यांना त्रास द्यायला ह्या जगांत राहिलाच नाही.” शेवटच वाक्य उच्चारताना तिचे डोळे किंचित चमकले, असे यशवंताना वाटले. तिने उघडून धरलेल्या दारांतून ते आंत गेले. राजकुमारनी त्यांचे स्वागत केले. राघव परलोकी गेला असला तरी राजकुमार यांच्या पत्नीने त्यांच्यापासून फारकत मागितली होती. राजकुमारनीही त्याला मान्यता दिली होती. संध्याचे आंतबाहेर चालू होतं. यशवंतानी मध्येच तिला विचारले, “संध्या, तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे?” संध्या स्थिर नजरेने त्यांच्याकडे पहात म्हणाली, “सध्या आम्ही तिघे असतो, आई, मी आणि माझा भाऊ.” यशवंत म्हणाले, “अच्छा! आणि तुझा भाऊही तुझ्यासारखा डावराच आहे कां?” संध्या शांतपणे म्हणाली, “हो माझा भाऊ डावराच आहे आणि त्याने आणि मी, आम्ही दोघांनी मिळून राघवचा खून केला. माझा भाऊ परदेशी निघूनही गेला. तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यांत देऊ शकतां.” राजकुमार म्हणाले, “संध्या, तू काय केलंस हे? आणि कां केलंस हे?” आतापर्यंत धैर्याने बोलणारी संध्या रडवेली झाली आणि राजकुमारला म्हणाली, “सर, अस्मिताची तुमच्यासारख्या देवमाणसाशी बेईमानी मला बेचैन करत होती. राघवचं सर्वांना भुलवणं जाचत होतं, माझ्या भावाच्या नियोजित वधूलाही त्याने नादी लावली होती. ह्या सर्वांहून मला तुमच्यासारख्या सच्छील माणसाचे हाल पहावत नव्हते. सर, सर, माझे तुमच्यावर प्रेम आहे सर! फक्त मी कधी व्यक्त नाही केले.” दुहेरी प्रेमप्रकरणाचा दु:खद अंत पाहून यशवंतही दु:खी झाले.

अरविंद खानोलकर.
वि.सू.
ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना काल्पनिक आहेत. कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..