आयुष्यातली एखादी घटना वा दुर्घटना महत्त्वाच्या संशोधनास उद्युक्त करते, असे म्हणत. तिच्याही बाबतीत नेमके हेच घडले. तिचे तिच्या आजोबांवर विलक्षण प्रेम होते. परंतु ती पंधरा वर्षांची असतानाच तिच्या आजोबांचे कर्करोगामुळे अचानक निधन झाले. आपल्या लाडक्या आजोबांच्या निधनाचा धक्का ती सहन करू शकली नाही. काही दिवस तिने दुःखातच काढले. मात्र एक दिवस तिला वाटले, कर्करोगासारख्या असाध्य आजारावर आपणच खात्रीशीर इलाज का शोधू नये? या प्रेरणेतूनच तिने संशोधन केले व कर्करोगावर उपाय शोधून काढला. तसेच हृदयविकार व पोटातील वायुविकारासंबंधी महत्त्वाचे संशोधन करून त्यासंबंधीची औषधे विकसित केली. त्याबद्दलच तिला १९८८ मध्ये शरीर-विज्ञानासंबंधीचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. हे नोबेल मिळविणारी संशोधिका होती जरट्रड बेले एलियन व नोबेलचे तिचे भागीदार होते जेम्स ब्लॅक आणि हिचिंग.
रसायनशास्त्रात मोलाचे संशोधन करणाऱ्या एलियनचा जन्म २३ जानेवारी १९१८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. लहानपणापासूनच ती फार चिकित्सक होती. त्यातच कर्करोगामुळे झालेल्या तिच्या आजोबांच्या आकस्मिकनिधनाचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. रसायनशास्त्रात ‘एमएस’ ही पदवी मिळविल्यानंतर तिने काही काळ वेलकम रिसर्च लॅबोरेटरीजमध्ये काम केले. तेथे कर्करोगावर महत्त्वपूर्ण संशोधन केले व खात्रीशीर औषध ( ६ एमपी) शोधून कळले. त्यास पुढे मान्यताही मिळाली. हिचिंग्जबरोबर काम करीत असतानाच १९८८ मध्ये हृदयविकार व पोटातील वायुविकारावरील औषधांचा शोध लावला. तसेच एड्ससारख्या असाध्य रोगावर प्रथमच औषध तयार करण्याचा बहुमान तिच्याकडे जातो.विवाह केल्यास आपल्या संशोधनकार्यात अडथळे निर्माण होतील हे ओळखून तिने अविवाहित राहणेच पसंत केले. फावल्या वेळेत गाणी ऐकणे, छायाचित्रे काढणे आणि पर्यटन करणे हे तिचे आवडते छंद होते.
अनेक विज्ञान संस्थांची सदस्या असलेली एलियन अमेरिकेतील राष्ट्रीय कर्करोग संस्थेची सल्लागार होती. अनेक आंतराष्ट्रीय संस्थांनी पुरस्कार देऊन तिच्या कार्याचा गौरव केला होता.
Leave a Reply