MENU
नवीन लेखन...

“स्वप्नं प्रत्यक्षात उतरविणारा दुर्दम्य आशावादी” डॉ. रघुनाथ माशेलकर.

यशाच्या क्षितिजाला शेवट नसतो. माणसें स्वतःच्या कर्तुत्वाला मर्यादा घालून चौकटीत रहाणं पसंत करतात,वर्तुळात राहणं पसंत करतात ,पण वर्तुळाला छेद देऊन एखादा असामान्य उत्तुंग शिखर गाठतोच, त्यापैकी एक व्यक्तीमत्व म्हणजेच डॉ. रघुनाथ माशेलकर.

केवळ क्षमता वापरून यश मिळत नाही तर क्षमता पणाला लावल्याशिवाय यश मिळत नाही. प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःतून स्वतः उमलता यायला हवं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हरायचं नाही त्यातूनही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढण्याची अंगभूत सवय व सकारात्मक वृत्ती हीच माशेलकरांची ओळख आहे. सुधा मूर्ती म्हणतात ‘निराशा वाटलीच तर माशेलकरांना फोन करा त्यांच्या सकारात्मक गोष्टी व अत्यंत आशावादी विचार यामुळे तुमच्या मनातील निराशेचन मळभ दूर होईल’.

सागर देशपांडे यांनी दहा वर्षापासून अथक परिश्रम घेऊन ५०पेक्षा अधिक लोकांना भेटून, चर्चा करून यातले काहीजण परदेशातलेही आहेत,याबद्दलची सखोल आणि सविस्तर माहिती घेऊन, माशेलकरांच्या जीवन प्रवासातील अनेक टप्प्यावरची दुर्मिळ छायाचित्रें मिळवून ग्रंथ अधिक आशय पूर्ण व देखणा केला आहे, यात स्मिता देशपांडे यांचाहीअनुवाद व संपादन करण्यात मोलाचा वाटा आहे. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेशी टक्कर देऊन डॉ. माशेलकर यांनी यशश्री खेचून आणली, त्यामुळे आजच्या तरुणांचे वैश्विक आदर्श ते ठरतात. ज्याप्रमाणे त्यांना आईने प्रेरणा दिली त्या प्रमाणात शाळेनेही प्रेरणा दिली. अध्यापनाची श्रीमंती असलेल्या शिक्षकांची ‘युनियन हायस्कूल’ ही शाळा होती, तिथले शिक्षक महान होते हे त्या शाळेतील माजी विद्यार्थी यावरूनच लक्षात येते. शिक्षणाचा हात ज्यांनी ज्यांनी धरला त्यांनी दारिद्र्यावर मात केली हेच माशेलकराकडे पाहून लक्षात येतं.

लहानपणीच्या तीन सवयींनी माशेलकरांना समद्ध केलं, एक भरपूर वाचन, दुसरं म्हणजे भरपूर लिखाण, तिसरं म्हणजे वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा मधून बोलणे व त्यात बक्षीस मिळवणं. वक्तृत्वस्पर्धा साठी तयारी करताना फक्त शाळेत जे जे शिकवतात ते ते पुरेसं नसतं, त्यासाठी बाहेर जाऊन माहिती शोधून तयारी करावी लागतें, ते ती करायचे, बाकीची मुलं जे काही बोलत नाहीत ते आपण बोलायचं असं ठरवून ते शोधून वाचत असत व तयारी करत, अशा रीतीने त्यांची जडणघडण झाली या तपश्चर्यामुळेच आज त्यांचं भाषण ऐकायला हजारो लोक येतात.

त्यांच्याबद्दल कोण काय म्हणलेलं आहे यावरून त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. अब्दुल कलाम म्हणतात’ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी अखंड परिश्रम घेत औद्योगिक, विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत राष्ट्राच्या जडणघडणीत आपले बहुमूल्य योगदान दिले आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे’. अटल बिहारी वाजपेयी म्हणतात ‘डॉ. माशेलकर हे भारतातील नुसतेच आघाडीचे वैज्ञानिक नसून त्यांनी एक समर्थ विज्ञान प्रशासक म्हणून ही स्वतःला सिद्ध केले आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली सी. एस. आय .आर. ने तिची पूर्वीची प्रतिष्ठा आणि गतिमानता परत एकदा मिळविलीतर आहेच शिवाय आर्थिक स्वातंत्र्याची आणि जागतिकीकरणाची जी आव्हाने आहेत तीही उत्तम तऱ्हेने पेलली आहेत.’

डॉ.मनमोहन सिंग म्हणतात ‘माशेलकरांनी आपल्या देशासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी केलेले काम उल्लेखनियआहे , त्यांचे काम तंत्रज्ञानाच्या पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे आहे’. भारतरत्न डॉ सी.एन. आर. राव म्हणतात ‘एका मोठ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे ते नेते आहेत त्यांच्यापुढे आलेले कोणतेही काम पुरे झाले असे त्यांना वाटत नाही आणि एखाद्या कामात किती यश मिळाले तरी त्यात अजून काय करता आले असते अशी एक असमाधानाची भावना त्यांच्या मनात सतत असते. जग हे अशा असमाधानी माणसांनी व्यापले आहे, खरे म्हणजे विज्ञान हा एक विषय नसून ती एक जीवनशैली आहे. विज्ञान जीवनापासून वेगळे करताच येणार नाही.माशेलकरांनी विज्ञानाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे’.

दुःखं उगाळत न बसता संघर्षावर मात केली की समृद्धी मार्ग आपोआप खुला होतो हे त्यांच्याकडे पाहून कळतं. एवढं यश मिळवूनही त्यांची नाळ जमिनीशी पक्की आहे. पुनर्जन्म मिळाला तर याच मातीत यावा व तिच आई,तिच पत्नी,तीच माणसें संघर्षात साथ देणारी हवीत ही इच्छा जीवनाशी प्रामाणिक व सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन देते. विविध पद,गौरव सन्मान पुरस्कार त्यांच्या पायाशी अक्षरशः लोळन घेतात.४५ डी.लिट.,१६ माशेलकर समित्या, विविध देशांचे बहुमान, F.R.S.अजून काय हवं?

संतुलित भारत, सुसंस्कारित भारत ,सुविध्य भारत, समृद्ध भारत, सुशासित भारत, सुरक्षित भारत, स्वानंदी भारत ही त्यांची सप्तसुत्री सर्वांनीच अमलात आणावी अशी आहे. समाजातील प्रत्येकाला ज्ञान मिळवण्याचा समान हक्क असायला हवा. त्यांच्या मते ‘everyone is someone’ सुप्त गुण ओळखणारी यंत्रणाच आमच्या शिक्षण व्यवस्थेत नाही व तिला पोषक वातावरण ही मिळत नाही, त्यामुळे प्रत्येकातलें सुप्तगुण ओळखून त्यांची मशागत व्हायला हवी.जे राष्ट्र असा ज्ञानाधिषटित समाज निर्माण करणार नाही ते काळाच्या ओघात विस्मृतीत जातील, हे त्यांचे विधान किती अर्थपूर्ण आहे.

कल्पनांना जेव्हा घुमारे फुटतात, तेव्हा त्यांना मुक्त आकाश हवं,कल्पनांच्या पंखांना पसरायला ना इंधन लागतं, ना त्यांना उडायला कोणत्या दिशेचं बंधन असतं. एखादा कवी सूर्यालाही न दिसणाऱ्या गोष्टी पाहू शकतो तर मग शास्त्रज्ञ का नाही? त्या क्षणी वेगवेगळे शोध लागतात हाच सृजनशील नवनिर्मितीचा आत्मा आहे. कर्मयोगावर माशेलकरांचा प्रचंड विश्वास आहे. तुमचें जन्मदाते पालक कोण आहेत, तुमच्या जन्म कुठे आणि कोणत्या तारखेला झाला यावर तुमची ओळख ठरत नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रारंभ कसा केला आणि पुढची सारी वाटचाल कशी केली यावरच तुमची खरी ओळख समाजासमोर येत असतें, सकारात्मक विचार करणं, आत्मविश्वास, केवळ स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी आयुष्यभर कार्यरत राहण्यासाठी कृतार्थता त्यांच्यामध्ये आहे. मुंबई गिरगाव चौपाटी जवळ महापालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारा एक शाळकरी मुलगा व त्याला इथल्या समाज घटकांनी दिलेलं अपार प्रेम व आधार याची कथा अत्यंत अचूकपणे सुंदर पद्धतीने सागर देशपांडे यांनी चरित्रात मांडली आहे.सागर देशपांडे यांनी केवळ विविध घटनांचं संकलन केलं नाही तर खोलात जाऊन अभ्यास केला. कला शाखेचे विद्यार्थी असूनही माशेलकरां कडून सर्व घटना समजून घेतल्या व मगच लिहिल्या. पुस्तकातला प्रत्येक शब्द माशेलकरांच्या नजरेखालून साकारला आहे.

माशेलकरांचे शिक्षक हयात नसले तरीही त्यांच्या मुलाकडून, नातवाकडून, त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन शाळेतील चित्रं मिळविले व त्यांच्याशी आठवणी बाबत चर्चा करून मगच पुस्तकात त्याच्या उल्लेख केला. माशेलकरांनी शाळेत असतांना क्रिकेट विषयी लिहिलेलं समालोचन हस्तलिखित असलेलं तेही या पुस्तकात आहे. सोळाशे पानांची माहिती ५७६ पानात संकलित करण्याचं काम सागर व स्मिता देशपांडे यांनी केले आहे. हे पुस्तक केवळ नेटवरून घेतलेली माहिती नाही तर नेटानं केलेलं एक संशोधन आहे, जे पुढच्या पिढीला निश्चित उपयोगी पडणार आहे.हा केवळ चरित्र ग्रंथ नाही तर संशोधनाचा नाविन्यपूर्ण ग्रंथ आहे.काही ग्रंथ पारायण करण्यासारखीच असतात त्यापैकीच हा एक. र्दम्य आशावादी : डॉ रघुनाथ माशेलकर

डॉ. सागर देशपांडे
सह्याद्री प्रकाशन पुणे.
पृष्ठे ५७६. किंमत:९९९

-डॉ. अनिल कुलकर्णी
९४०३८०५१५३
Email : anilkulkarni666@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..